डॉ रजनी जगताप सेवापूर्ती निमित्त
********
तुम्ही जर एकदा रजनीला भेटला
तर तिला विसरूच शकत नाही
तिचे वागणे बोलणे असणे वैशिष्ट्यपूर्ण आहे
कारण ती एक हटके व्यक्तिमत्व आहे
तिची मते ठाम आहेत त्या मता मागे
एक वैचारिक आणि अनुभवाचा पाया आहे
दुसऱ्याचे मत ती स्वीकारतच नाही असे नाही
पण स्वतःची मते सहसा बदलत नाही
केवळ जग चालते म्हणून ती चालत नाही
कदाचित रजनी सर्वांनाच पचनी पडत नाही
सर्वांनाच रुचत नाही पण
एकदा का तुम्हाला तिची केमिस्ट्री कळली
की तिच्या एवढी साधी व्यक्ती कोणीच नाही
रजनीची मते आणि स्वभाव हा मूल्याधारित आहे
ती न्यायप्रिय आहे स्वातंत्र्यप्रिय आहे
त्यात मांगल्याच स्पर्शही वात्सल्याचा अंश आहे
तिच्यातील कठोरता करूणेतून आलेली आहे
तरीही तिला जगाचे छक्के पंजे फारसे कळत नाहीतअसेच कधी कधी वाटते.
सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे राजकारण तिला उमजत नाही
कारण ती एका नदीसारखी आहे
ती पुढे जात राहते समोर येणारे सारे खड्डे भरत
खडकांना फोडत वाळूची खेळत
ती कड्यावरून झेपावते वळणांना मोडते
तर कधी संथपणे वाहत राहते
कड्यावरून झेपावतांना मस्ती करताना दिसते
तिच्यातील न लोपलेले बालपण
ते संथपणे वाहताना दिसते
तिने जाणलेले जगलेले जीवन
ते तिचे वळणे घेताना दिसते
तिने भोगलेले टाळलेले कडवट क्षण
ती एक नैसर्गिक योद्धा आहे
धाडसीपणा हा तिचा अंगभूत भाव आहे
तिने असंख्य घाव झालेले आहेत
आणि आत्मबलाने त्यांना बरेही केले आहे
अनेक दृष्ट अदृष्ट शत्रूंना तोंड दिले आहे
आणि सर्वांना पुरून ती उरली आहे
ती हळुवार मनाची संवेदनशील व्यक्ती आहे
दुसऱ्याच्या दुःखाने विरघळणारी
ते मनापासून दूर करण्याचा प्रयत्न करणारी
ती कर्तव्यनिष्ठ आहे
कामात परफेक्ट होण्याचा प्रयत्न ती करते
ती प्रामाणिकता तिच्यात आहे
म्हणून कर्तव्य टाळाटाळ करण्याची लोक
तिला आवडत नाहीत
खरंतर रजनी या शब्दाचा शब्दशः अर्थ
रात्र असा आहे अन रात्र सदैव गूढ असते
तसेच रजनी खूपशी गूढ आहे
रजनीत दिसत असतात
असंख्य तारे अनेक ग्रह उपग्रह नक्षत्र
तसेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत
काही कळतात काही कळत नाही
तरीही अल्हाद देतात
आणि रात्री उमलतात अनेक फुले
मोगरा जाई जुई प्राजक्त निशिगंध
जे शुभ्रता आणि सुगंध यांनी भारलेली असतात
तद्वत रजनीत ही शुभ्र सद्गुनाची सुमने
भरलेली आहेत
काही लोक रात्रीला घाबरतात
कारण रात्र त्यांना नीट कळलेली नसते .
जे खरोखर रात्र पाहतात जाणतात
त्यांनाच रात्र आवडते
तिथे जमलेल्या सारे त्यामुळेच भाग्यवान आहोत
आपण रजनीला जाणतो तिला ओळखतो .
तिच्या निगूढतेवर आणि चांदण्यावर प्रेम करतो
ती जीवन रसाने भरलेले सळसळते जीवन आहे
तिच्या सेवापूर्ती निमित्त हिला खूप खूप शुभेच्छा
अशीच आनंदी रहा हसत रहा
आणि मुख्य म्हणजे गाणे गात रहा .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .