गुरुदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुरुदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० जुलै, २०२५

गुरुदेव

गुरुदेव
*****
एक वारी दक्षिणेला एक जाय उत्तरेला 
तोच शोध अंतरात फक्त दिशा बदलला ॥

एक वारी गुरुपदी एक वारी देवपदी 
तोच ओघ सनातन धावत असे मूळपदी ॥

गुरु देव दाखवतो देव गुरु भेटवतो 
तेच शब्द बदलून मायाधीश खेळवतो ॥

तोच देव तोच गुरु असे देह देहातीत 
नभी चंद्र सूर्य तारे पाऊले ती प्रकाशात ॥

कुठे कृष्ण डोळीयात कुठे दत्त अंतरात 
स्वामी साई गजानन एकरूप विठ्ठलात ॥

बहुरूपी बहुवेशी खेळ खेळतो अनंत
साऱ्या दिशा मनाच्याच आकलना असे अंत ॥

धरुनिया दिशा एक मनाच्या या गावा जावे 
भेटेन ते श्रेय मग जयासाठी जग धावे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 
 

गुरुवार, २८ मार्च, २०२४

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी
***********
स्वप्न हरखले डोळीया मधले 
स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१
नभात लक्ष दीप उजळले 
अन चांदण्याचे तोरण जाहले ॥२
कणाकणातून स्फुरण उठले 
खुळ्या अस्तित्वाचे भान हरपले ॥३
गिळून मीपण मीपण उरले
स्थळ काळाचे या भानही नुरले ॥४
ऐशिया प्रीतीने मजला व्यापले 
श्रीपादाची सखी अनन्य मी झाले ॥५
जगत दाटले या मनामधले 
मन हरवता मनास कळले ॥६
तोच तो विक्रांत तेच ते जगणे 
क्षितिज सजले दिसते वेगळे ॥ ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

निरोप

निरोप
******

धुणीचा निरोप समिधास आला 
वन्ही धडाडला आकाशात ॥१

वाजे पडघम तुतारी सनई 
मिलनाची घाई बहू झाली ॥२

उधळली फुले रांग तोरणाची 
रंन्ध्र  सुगंधाची घर झाली ॥३

झगमगू आले सप्तरंगी दीप 
अरूपात रूप मावळले ॥४

जरी घडीभर विरह वेदना 
किती जीवघेणा काळ वाटे ॥५

विक्रांत पिकल्या फळा देठ झाला 
पडला राहिला कुणा ठाव  ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

गुरुवार, २ जुलै, २०२०

गुरुदेव

गुरूदेव
******
ऊर्जेचे वहन 
घडे ज्या देहातून 
वदती तयास 
गुरुदेव म्हणून ॥

सत्याचे अवतरण 
घडे ज्या वाणीतून 
वंदती तयाच 
गुरुदेव म्हणून ॥

चैतन्य स्पंदनं 
अवतरे कृपेतून
नमिती तयास 
गुरुदेव म्हणून ॥

देह काळ ओघी 
जाय की निघून
उरे ते चैतन्य 
गुरुदेव म्हणून ॥

दिप दिपा पेटवी 
प्रकाश होऊन 
स्मरती तयास 
गुरुदेव म्हणून ॥

पेटविल्या विण 
न ये चि घडून
भेटते तत्व 
गुरुदेव म्हणून ॥

विक्रांत पडून 
पद रज होऊन 
जाहला पावन  
गुरुदेव भजून ॥

*****-
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...