नवकविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नवकविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

उद्दाम


उद्दाम
******

सुटलेला रस्ता चुकलेली चाल 
तुटलेले झाड मोडलेली वेल 

विझलेला जाळ जमलेली राळ 
मोडलेली पेटी तुटलेला टाळ 

संपले कीर्तन उरले नर्तन 
उतरली नशा तरीही झिंगणं

आडोशाचे पाप प्रेमाचे लिंपण
जळती देहात आवेश बेभान

लाटावर लाटा उठती अनंत 
थंडगार खोल तळ शांत शांत

शिव्यांनी भरले जीवन हे कोडं
तरीही जिवास जगण्याचे वेड 

विक्रांत मातीने बहरले झाड 
आटला पाऊस उद्दाम हे खोड

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

रविवार, १९ जानेवारी, २०२०

वाहवा




वाहवा
********

काल वाहवा करणारे  
गेले आज निघून आहे
कंटाळले काही कुणाचे       
गेले काम सरून आहे

तरीही मी लिहितो आहे
गातो मनापासून आहे
अटळ प्रवास अवघा हा
चालणे बाकीअजून आहे

खरतर ही स्वप्नदुनिया
मनात या विखरूनआहे
शब्द सोहळे उगा मांडले
बघे जात डोकावून आहे

येतील काही नवे आणिक
नवी वाहवा मिळणार आहे
खोटी नसेल जरी ती ही
किंमत त्यांची जाणून आहे



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

दत्त खुळी



दत्त खुळी

अनवाणी पावलांनी 
तंद्री लागलेल्या मनानी 
ती भटकते पाऊस पांघरुनी
कृष्णेच्या काठावरती 
उंच उंच घाटावरती 

उभी राहते 
पादुकांसमोर ठाण मांडूनी
पाय रोवूनी 
ओरडणाऱ्या
सुरक्षा रक्षकांकडे 
चक्क दुर्लक्ष करुनी
हट्टी मुलीसारखी 
डोळ्यात पाणी आणूनी

आणि बोलत राहते भरभरुनी
महाराजांविषयी 
शब्दात जीव ओतूनी
तेव्हा तिच्या त्या शब्दातून 
डोळ्यातून 
अन स्वरातून 
ओसंडत असते 
विलक्षण श्रद्धा अन प्रेम 
तो कैफ लागताच
आमच्या रुक्ष पणाला 
या मनाच्या बाभळीही
जातात चंदनी होऊनी 

तशी ती पक्की व्यवहारी 
नीटस संसारी 
पण इथे आली की जाते होऊनी 
आत्ममग्न संन्यासिनी 
अन् मला सारखं वाटत राहते 
तिच्या भोवती 
महाराज नक्कीच आहेत म्हणूनी  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


गुरुवार, २० जुलै, २०१७

प्रकाशाची आभा



प्रकाशाची आभा
************

तू प्रकाशाची आभा होवून हसतेस जेव्हा
मी तारकांच्या जगात होतो आकाश तेव्हा

तू खळखळता झरा तू आकाशीचा वारा
मी होवून पाचोळा म्हणतो सांभाळ जरा

तुझे मुक्त वाहत जाणे रूप सरिता होणे
मी तरतो तुझ्यात तुझे होवूनिया जगणे

तू फुल ग चाफ्याचे मदिर मधुर गंधाचे
दरवळती मनात क्षण तुझ्या सोबतीचे

तू हृदयी सजले गाणे धुंद संगीत तराणे
जणू मनात जागले स्वप्न रेखीव देखणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, १६ जुलै, २०१७

अद्वैतला भार न व्हावे




अद्वैतला भार न व्हावे
 ******************

तुझ्यामधले माझेपण
मजला मागे तुझेपण
तुझ्यातल्या माझेपणावर
गेलो असा की मी भाळून
तुझेपण ते देही मिरवून
चंद्र घेतला मनी गोंदून
पण विरहाची आग मिटेना
आषाढीही मन भिजेना
का रे असा हा जीव लावला  
पाऱ्या मधला तूच तुला
कुणी मिटावे जरी ना ठावे
अद्वैतला भार न व्हावे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
  



शुक्रवार, १२ मे, २०१७

हे झाड बहरून आलय




फांदिफांदीवर फुटलाय धुमारा
हे झाड बहरून आलय आता
देही उसळला ऋतूचा सोहळा
सारे वाटत सुटलय ते आता

फुलणे हा झाडाचा धर्म असतो
आणि फळणे हीच कृतकृत्यता
ते भाग्य तया भेटलेय आता
त्याला सुखे हिंदोळू द्या आता  

तसे फार काही नाही त्याच्याकडे
गंधाने व्यापलेले मुठभर आकाश
आणि रंगांत विखुरलेले हे इवलाले
तुमच्या आमच्या सुखदु:खाचे भास

त्या गंधाला मोल असेल वा नसेलही
त्या फुलांनी घर सजेल न सजेलही
पण असे बहरता येते कणाकणातून
कळेल या जगाला हे ही कमी नाही

सर्वांगाने फुलणे म्हणजे गाणे असते
मी माझ्या गाण्यात बहरलोय आता
घेणे न घेणे तुमच्या हातात असले तरी
न देणे माझ्या हातात उरले नाही आता

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...