बुधवार, ३० एप्रिल, २०१४

मदांध सत्ता ...


तोंडामध्ये पान चघळत
अजस्त्र देह धडधाकट
पुढे येती सरसावत
याचे त्याचे नाव सांगत
कुणाकुणाच्या नावाचा
टिळा कपाळी लावलेला
डोळ्या मध्ये बेदरकार
सत्तेचा मद भरलेला
तोंडामध्ये उग्र भाषा
उग्र वासात मिसळली
परीटघडीच्या पेहारावी
गुंडगिरी सजलेली
आम्ही झोडू आम्ही मोडू
आडवे याल तर झोडू
भले बुरे कळल्या वाचून
समोरच्याला पार गाडू
होते दानव काय वेगळे
यवनांनीही हेच केले
बाहुच्या मदात मातले
परि शेवटी मातीत गेले
नियती फिरवे गरागरा
तीच वर्तुळे पुनःपुन्हा
सत्ता मद अविचार अंत
कळूनी सारा घडे गुन्हा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, २८ एप्रिल, २०१४

द्रां बीज हृदयी





द्रां बीज हृदयी
रुजे खोलवर
झालो वृक्षाकार
औदुंबर ||
वाचून फुलांच्या
फळलो मनात
बहर रुखात
प्रेम फुटे ||
करुणा तयांची
मागितल्यावीन  
ओघळून घन
तृप्त झालो ||
देवाचाही देव
कृपाळू होवुन
आला उतरून
गिरनार ||
मिळाले अवघे
जाहले कल्याण
धन्य निरंजन
दत्त पदी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, २७ एप्रिल, २०१४

भांडी घासा धुणे धुवा





भांडी घासा धुणे धुवा
झाडू काढा लादी पुसा
रांधा वाढा उष्टी काढा
सोडू नका थोर वसा

दिनरात तेच तेच
आयुष्याचा होतो वेच
कुठलीच शुद्ध नाही
घरदार सुख हेच

कधीतरी स्वत:साठी
जगायला धीर नाही
पिंजऱ्याचे सुख पक्ष्या
पंख आठवत नाही

आभाळाची भीती मोठी
असे खरी असे खोटी
मनातल्या सावल्यात
शिकाऱ्यांची असे दाटी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २६ एप्रिल, २०१४

जार फुलांचा गंध






ओढाळ पक्षाची
ओढाळ गाणी
ओढाळ गाण्यात
जीवाची राणी |
जीवाची राणी
दूरच्या गावी
एकल्या राती
झुरते मनी |
झुरते मनी
जळते पापणी
देहात वादळ
शिंपिते पाणी |
शिंपिते पाणी
विझेना वन्ही
कावरी बावरी
पाहता कुणी |
पाहता कुणी
खुलते कळी
भ्रमर मातला
धावतो वनी |
धावता  वनी
सुखाची धनी
गुपित दडते
हिरव्या रानी |
हिरव्या रानी
फुलते कुणी
जार फुलांचा
गंध होवुनी |
गंध होवुनी
निवता मनी
पुण्यांची लंका
जाते जळूनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...