वेडे
*****
त्या वेड्यांनी उगा वेचले आयुष्य देशासाठी आपले
चूड लावूनी घरदाराला
उगाच फासावरती चढले ॥१
बलिदानाची गोड फळे ती
खात आहेत भुजंग विषारी
रक्तावरही जे घेती टक्के
होऊन बनेल सत्ताधारी ॥२
उगाच करती आवाज मोठा
गोळा करूनी चिल्ली पिल्ली
बिनकामाचे सैन्य जमवती
मने पेटली द्वेष आंधळी ॥३
प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा
पैसा देव ज्याला त्याला
लुटा प्रजेला लुटा देशाला
इकडेतिकडे खुशाल उधळा ॥४
आम्ही आपले बिळात लपतो
जगतो केवळ उगाच जगतो
घाणीच्या या डम्पिंग मध्ये
कपडे फक्त आपले जपतो ॥५
आणि काही उरात कढले
अश्रू डोळ्यामधील पुसतो
खंत खरी असते तरीही
हळहळीतच आपुल्या मरतो ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .