रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

राजा लागतो आम्हाला






वेडा असो शहाणा असो
राजा लागतो आम्हाला
जयजयकार करीत त्याचा
डोई घेवून नाचायला

राजा नसला तर त्याची
लेक-नातही चालते आम्हाला
शेवटी काय एक दगड
हवा असतो डोक ठेवायला

उसना चालतो दत्तक चालतो
किंवा कुठून आयात केलेला
कपाळावर कुंकू आमच्या
नाव हवे एक घ्यायला

खाईल पैसा खाऊ दे तो
विकेल देशा विकू दे तो
बेहोशीला आमच्या पण
मस्त डोस एक असतो तो

कुण्या जातींचा असो कुत्रा
गल्लीतला वा महालातला
पाय चाटल्या वाचून का
कधी बरे वाटते त्याला

विक्रांत प्रभाकर

शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

वेड मन



आज काल वेड मन
एकट कधी नसतं
जिथ तिथ तूच सवे
तुझ्या भोवती फिरतं

गर्द सावळया डोहात
सदा डुंबत असतं
वाऱ्याच्या झुळकीवर
बट होत लहरतं

तुझं हसणं कानात
तुझं बोलणं मनात
तुझा स्पर्श ओझरता
पाखरागत घुमत

भारावले खुळे क्षण
कळल्या वाचून रीत
जाता दूर पण सखे  
कळले तूच ती प्रीत


विक्रांत प्रभाकर

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

तडतड पाऊस..






वाऱ्याच्या वारुवर धुरळा उडवित
तडतड तडतड पाऊस आला
जसा अचानक पाहुणा यावा
तशी तारांबळ करता  झाला
आई धावली वाळवण उचलायला
बाबा सरपण घरात आणायला
बांधुनी बकऱ्या घरात खाटेला
ताई धावली कोंबड्या शोधायला
घालून धपाटा पाठीत म्हणाली 
लाग रे उनाडा थोडा कामाला
हवे होते काही कारण मजला 
पावसात त्या उगा भिजायला
थोडे सरपण थोडे वाळवण
करीत करीत पाऊस झेलला
आवरा आवर करतो आम्ही
तोवर पावसाने कहर केला
आंब्याचा सडा परसात पाडून
फांद्यांना हिसके देत राहिला
गोठ्याच्या छपरी धिंगाणा करीत
पेंढयाच्या घड्या उडवत बसला
पत्र्याच्या शेडचा पत्रा ठोकून
पार खिळखिळा करून टाकिला
आणि तरीही हासत बाबा
म्हणत होते आला रे आला
कपाळावरील त्यांच्या रेषा तो
अलगद जणू पुसून गेला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४

दु;खाचे छप्पर



दु;खाचे छप्पर
जेव्हा अचानक
पडते कोसळून  

वेड लावणारा
पाऊसही जातो
नकोसा होवून

आपणच लावलेले
रंग चिखलागत
येतात ओघळून

भरपूर प्रकाशाची
आपली हाव हसते
मोठ्याने गडगडून

आपले टीचभर
सामान उरी येते
मणभर होवून

सुन्न हवालदील  
आपण जातो
पसारा होवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...