वाऱ्याच्या वारुवर धुरळा उडवित
तडतड तडतड पाऊस आला
जसा अचानक पाहुणा यावा
तशी तारांबळ करता झाला
आई धावली वाळवण उचलायला
बाबा सरपण घरात आणायला
बांधुनी बकऱ्या घरात खाटेला
ताई धावली कोंबड्या शोधायला
घालून धपाटा पाठीत म्हणाली
लाग रे उनाडा थोडा कामाला
हवे होते काही कारण मजला
पावसात त्या उगा भिजायला
थोडे सरपण थोडे वाळवण
करीत करीत पाऊस झेलला
आवरा आवर करतो आम्ही
तोवर पावसाने कहर केला
आंब्याचा सडा परसात पाडून
फांद्यांना हिसके देत राहिला
गोठ्याच्या छपरी धिंगाणा करीत
पेंढयाच्या घड्या उडवत बसला
पत्र्याच्या शेडचा पत्रा ठोकून
पार खिळखिळा करून टाकिला
आणि तरीही हासत बाबा
म्हणत होते आला रे आला
कपाळावरील त्यांच्या रेषा तो
अलगद जणू पुसून गेला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा