रविवार, ३० सप्टेंबर, २०१२

तू


तू चैतन्य या घरातले
तू स्फुरण माझ्या गाण्यातले
तू चांदणे माझ्या मनातले
तू स्वप्न पूर्णत्व पावले
तू उर्जा मम कार्यातील
तू आस्था या घरातील
तू रक्षा कणा कणातील
तू प्रेमा या जीवनातील 

विक्रांत  

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

घेवूनी हातात बंदुका


घेवूनी हातात बंदुका
जग बदलत नाही
बदलली जरी सत्ता
सत्ताधारी बदलत नाही

तेच नाटक तेच थियेटर
जातात फक्त नट बदलत
आम्हीही तेच प्रेक्षक
राहतो अन टाळ्या पिटत

मान्य आम्हालाही आता
शब्दात नुरली काही ताकद
अन साहित्य झाले आहे
कपाटातील पिवळे कागद

पण आग होऊन जळलेल्यांचे
ऐकतो वा वाचतो वचन
आत विझल्या राखेमध्ये
चमकून उठतात अग्निकण

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

ती येते अन मुद्दाम

ती येते अन मुद्दाम
मला न भेटताच जाते
तिला कदाचित माझी
का स्वत;ची भिती वाटते

काय अजूनही डोळ्यातून
माझ्या प्रेम आहे झरते
का अजूनही तिला तिचा
नकार आहे दु:ख देते

खूप वर्ष झाली आता
सार विसरायला हवे ते
समजावया हवे तिला 
की वय वेडे होते ते

तेव्हा तर तिला मी
सरळ विचारले होते
नकारातील अश्रूत तिच्या
अन प्रेम वेचले होते

नंतर पण व्रत मैत्रीचे
तरीही पाळले होते
आता ही व्रत माझ्या
मनात दृढ आहे ते

जाळला अंकुर प्रत्येक
प्रीतीची स्मृति तीही
भिती मग कसली तिला
कळेना मज अजूनही

तसे न भेटणे तिचे
स्वीकारले आहे जरी
जाणे तिचे असे परी
टोचते आहेच उरी

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

अलिकडे रोज सकाळी



अलिकडे रोज सकाळी
पाखरांची गोड चिवचिव
मला ऐकू येतेय
आणि माझी सकाळ
सुरमयी होतेय
गाड्यांच्या आवाजाच्या
मधील निस्तब्धतेत
मनावर जणू तरंग उमटतात
रिक्ष्यांचे केकाटणारे आवाज
जेव्हा पार्किंगला स्थिरावतात
नाक्यावरून गाड्या जेव्हा
विना हॉर्न जातात
वाटते जणू आपण बसलोय 
कुठल्यातरी उद्यानात
एक दिवस ती गोड पाखरे
नीट पहावीत म्हणून
मुद्दाम राहिलो गच्चीत बसून
लक्षात आले आवाज येतात
शेजारच्या गच्चीतून
पाहता तिथे डोकावून
दिसला मोठा पिंजरा
ठेवलेला पाखरे भरून
त्यांना तसे पाहून
गेलो मी विषण्ण होऊन
कळले मला माझी ती  
प्रभातही आहे कृत्रिम
तरीपण
त्या पक्षांचे गाण
होते इतके सुंदर की
पिंजरा भिंती अन
ध्वनिप्रदुषण भेदून
माझ्या हृदयात येवून
बसले घर करून
कैद्याच प्राक्तन
आपले स्वीकारून
फुलत होते जीवन
रडणे नाकारून 

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

भांडी घासतांना





तू परवा परगावी गेलीस
सगळी आवर आवर करून
अर्धी अधिक जेवणाची सोय करून
आज तू परत येणार म्हणून
तुला खुश करायला
एक कविता टाकावी करून
असे ठरवून बसलो खरा पण
काही सुचेना मग उठलो अन
सगळी भांडी टाकली घासून
तशीच ठेवा म्हणून
तू गेली होतीस बजावून
पण कविते ऐवजी भांडी घासून
मला आले उमजून
तू रोज माझ्यासाठी ,या घरासाठी
कविताच लिहीत असतेस
सकाळ पासून रात्री पर्यंत
लग्नापासून आत्तापर्यंत
मी समजायचो त्याला
ते फक्त काम आहे म्हणून


विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१२

म्युन्सिपाल्टी ड्यूटी




एका नाईट ड्युटीला
आमच्या काही स्टाफला 
दूध संपल्या मुळे
चहा नाही मिळाला
त्यामुळे त्यांचा
संताप संताप झाला
इन्चार्ज उगाचच
शिव्यांचा धनी झाला
त्याचं रागावण साहजिक होत
कारण कुणीही त्यांची
काळजी घेत नव्हत
कुणीच अथवा
फिकीर करत नव्हत
स्टाफच्या वाटणीच दूध
दुसरीकडे वापरल गेल
देणाऱ्यांनी बिनद्दिकत दिल
घेणाऱ्यांनी बिनद्दिकत घेतलं
रात्री बोंबाबोंब होणार
त्यांना जरूर माहित होत
पण त्यावेळी आपण ड्यूटीवर नसणार
हे हि त्यांना माहित होत
म्युन्सिपाल्टीत नोकरी करतांना
अशीच न्यायची वेळ मारून
आले होते सारेजण
जणू आईच्या पोटात शिकून
किंवा मुन्सिपाल्टीच आई झाली
अन बाळांना केले तयार
काहीही न घेता अंगावर
ड्यूटीतून व्हायचे पसार
त्या क्षणी
जो तिथे हजर असतो
तोच बळीचा बकरा बनतो
वेळ काढण्यात जर वाकबगार असला
तरच वाचतो नाहीतर मरतो
कधी बसतो थोडा मार
कधी खापर सार डोक्यावर
पण त्याला नाईलाज असतो
कारण तो कुणीही असला
तरी तिथे हजर असतो
हाच त्याचा जणू गुन्हा असतो
म्हणून प्रत्येक जन इथे
वरती बाजूला बोट दाखवत
खांदे आपले असतो उडवत
नेहमी राहतो अंग चोरत .
बाजुवाल्यावर आपला
अंमल चालत नाही
वरचा कधीच काही
आपल ऐकत नाही
जू घेवून पाठीवर
ओझ वाहत रहायचं
त्याच ठराविक साच्यात
काम करीत रहायचं
अस म्हणतात की चार
पुण्यवान लोकामुळेच तर
शेषाच्या डोक्यावर
पृथ्वी अजून आहे स्थिर
तोच नियम इथे लागू आहे

स्थळ आणि काळ

याप्रमाणे फक्त
पुण्यवान बदलत आहे
नाहीतर काही खर नव्हत
मूळ मुद्दा दुधाचा
तो तर तसाच राहिला
रात्री साऱ्या स्टाफला
कोरा चहा प्यावा लागला
अन पुढच्या वेळेला
जर दूध देणारा चुकला
तर त्या रात्रपाळी इन्चार्जला
लागतील बोल ऐकायला
त्याने ते ऐकायचे
रिपोर्ट मध्ये लिहायचे
पुढच्या वेळी तरी दुधाचे
लचांड न उरावे म्हणून
गेटजवळील देवाला विनवायचे
बाहेर पडताच गेटमधून
सारे सारे विसरायचे
बस्स इतकेच हातात असते

होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...