प्रेमकविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमकविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

भेट

भेट
****
पुन्हा एका वळणावर 
भेटलोच आपण 
अर्थात तुझ्यासाठी त्यात 
विशेष काही नव्हतं 
एक मित्र अवचित 
भेटला एवढंच 
माझंही म्हणशील तर 
तसंच काही होतं 

फार काही उरलं नाही 
मिळवायचं आयुष्यात 
आहे संतुष्ट बऱ्यापैकी 
जे काही मिळालं त्यात 
जर तर चे तर्क काही 
नाही उमटत मनात 
तर आता  फक्त एक
औपचारिकता तुझ्यामाझ्यात

अन त्या कवितांचं म्हणशील 
तुझ्यासाठी लिहिलेल्या 
होय आहेत अजून 
त्या माझ्या जुन्या डायरीत 
आज बघेन म्हणतो त्यांना मी 
पुन्हा एकदा शोधून 
माझी खात्री आहे 
त्या तिथेच असतील अजून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

स्मृति

स्मृती
***
तुझ्या स्मृतीचे तुषार 
खिळलेल्या मनावर
कोरड्या ऋतूत साऱ्या 
हिरवळ देहावर ॥१
आकाशाचे वैर जरी 
वाहते प्रारब्ध शिरी 
मोजून सुख एकेक
ठेवले भरुनी उरी ॥२
जरी अट्टाहास नाही 
पुन्हा चिंब भिजायचा 
भरुनिया घेतला मी 
स्पर्श तुझ्या असण्याचा ॥३
अस्तित्वा ठाऊक नाही 
मुळे किती खोलवर 
त्याही पलीकडे कुठे 
जीव धावे अनावर ॥४
नसणेही तुझे होते 
असणे हे माझ्यासाठी 
पानोपानी चित्र तुझे 
दिठिविना देखे दिठी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, ९ जून, २०२५

पुन्हा

पुन्हा
****
पुन्हा तुझिया केसात 
अडकले प्राण माझे 
पुन्हा तुझिया श्वासात 
हरवले भान माझे ॥

पुन्हा ती नजर गेली 
सोडूनिया चित्त माझे 
झालो पुन्हा फकीर मी 
लुटवून सर्व माझे ॥

माझे माझे म्हणता मी 
झाले हे सारेच तुझे 
हरवून आज गेले 
द्वैतातले ओझे माझे ॥

असे वेड जीवास या
नकळे लागले कसे 
सदैव स्मृतीत तुझ्या
फिरते हे मन माझे ॥

पुन्हा या गात्रात वीज 
लख्ख अशी झंकारते 
उमलूनी कणकण 
गीत  मोहरते माझे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ७ जून, २०२५

जादू

जादू
*****
तुझ्या लोभस चेहऱ्यात
काय जादू आहे ते कळेना 
माझी नजर होते पाखरू 
खिळते तिथे भिरभिरतांना 

तुझ्या निर्मळ डोळ्यात 
काय भूल आहे कळेना 
मी हरवून जातो त्या डोहात 
युगायुगांची होऊन तृष्णा 

मज कळते ती तूच आहेस 
माझा विसावा दिन मावळतांना 
सुखावतो मी हास्याची तुझ्या 
लक्ष लक्ष नक्षत्रे वेचतांना 

अन दृष्टी वरती पडदा माझ्या 
जग रहाटीचा पडतांना 
मी ठेवतो खोचून हृदयात
हलकेच त्या अमूल्य क्षणांना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २२ मे, २०२५

प्रेम

प्रेम
****
एकदा प्रेम झाल्यावर 
जे विसरलं जातं 
ते काय प्रेम असतं 
एकदा दिवस उजेडला की 
सारं जग प्रकाशाचं असतं 
तिथं माघारी फिरणं नसतं 

कुठल्यातरी वेलीवर 
कळीचं आगमन होतं 
तेव्हा तिचं फुल होणं 
जसं निश्चित असतं 
तसंच प्रेमाचं असतं 

ते त्याचं सुगंधानं बहरून जाणं 
रंगानं आकाश मिठीत  घेणं 
हे जसं निश्चित असतं 
तसंच प्रेमाचं असतं 

प्रेमाचं  खरं खोटंपण कळण
फारच सोपं असतं 
मागीतल्या वाचून जे 
फक्त देतच असतं 
प्रकाश अन् सुगंधागत 
वर्षाव करीत राहतं 
तेच खरंखुरं प्रेम असतं 

अपेक्षांच्या बुरख्यात 
जे भुलवत राहतं
ते काहीतरी वेगळंच असतं
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २२ मार्च, २०२५

दरवळ उपक्रमासाठी

दरवळ (उपक्रमासाठी )
******************
तो दरवळ तुझ्या स्मृतीचा 
असतो वाहत माझ्या सभोवत 
तुझ्या सहवासातील ते इवले क्षण 
राहतात माझ्या मनी झंकारत 

आता तर तू हाकेच्या पलीकडे 
करून बंदिस्त स्वतःला दुसऱ्या जगात 
आणि माझे असणे जगरहाटी 
चाललेय त्याच त्याच आवर्तनात 

भेटशील तू कधी वा न भेटशील 
धरणात तुझ्या तू बंद  राहशील 
पण हा दरवळ पूरे आहे मला 
माझी उरलेली वाट चालायला 

तो पाऊस तेव्हा कोसळलेला 
तो वसंत तेव्हा फुललेला 
वसतो आहे माझ्या रंध्रा रंध्रात 
अन् मी आहे त्यांना धन्यवाद देत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

चांदणे

चांदणे 
****
भिरभिरणारे खुळे हरिणीचे काळे डोळे
डोकावता तयामध्ये मन झाले चिंब ओले ॥१

एक थवा पाखरांचा उंच मेघापार गेला 
अन शब्द हरवला मूक माझ्या ओठातला ॥२

 उतरले हसू मग जीवनीत थबकले 
खळाळला झरा अन नाद जळी तरंगले ॥३

असे कसे कुणासाठी भान उगा अडखळे 
मातीलाही वादळाचे स्वप्न पडे वाहुटले ॥४

तोच चंद्र तीच प्रभा ओंजळीत चांदणे ही 
मिटू जाता बोटे परी मुठीमध्ये येत नाही ॥५

अगा दिसे स्वप्न कसे जागेपणी डोळीयात 
क्षणभर भ्रम पडे कुठे रे मी जगण्यात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

रविवार, १२ जानेवारी, २०२५

मैत्री पलीकडची मैत्री

मैत्री पलीकडची मैत्री
*****************
मैत्री पलीकडची मैत्री असते 
कधी कधी कुणाची 
त्या मैत्रीला खरंतर शब्द नसतात 
मैत्री शिवाय
म्हणूनच तिला म्हणावे लागते मैत्री 
व्यवहाराच्या कुठल्याही व्याख्येत 
न बसणारी ती मैत्री 
जगाला अन रूढीला सहजच 
मान्य नसणारी ती मैत्री 
स्त्री आणि पुरुषाची जीवश्च कंठश्च मैत्री 

त्यात देह सुखाची अभिलाषा नसते 
स्वामित्वाची अपेक्षा नसते
एकमेकांची मुले पती-पत्नीचा आदर करणारी
आपल्या भाव विश्वात सामावून घेणारी
सुखदुःख वाटणारी जिव्हाळा बाळगणारी 
अकृत्रिम असते ती मैत्री 

पण अशी मैत्री खुपु लागते जगाच्या डोळ्यात 
संशयाच्या शेकडो नजरा येऊन डसू लागतात 
मग उभे राहते भीतीचे सावट 
भीती घरटे मोडायची निरर्थक बदनामीची 
आणि मग ती मैत्री  
एक व्यवहारिक निर्णय घेते
अन एकमेकांना दूर सारते
हृदयात तीच आस्था व प्रेम बाळगचेही ठरवते

पण खरं तर ती मैत्री मग मैत्री उरत नाही 
कारण भीतीची लागण होताच 
असुरक्षितेची हवा लागतात 
ती मृत होते

कुणी म्हणेल हे तर प्रेमच आहे 
प्लुटोनिक प्रेम म्हणा हवे तर 
स्त्री पुरुषात दुसरे काय होते ?

पण सारेच खरेखुरे मित्र 
एकमेकांशी कशाने जोडलेले असतात ?
दारू मौज मस्ती गप्पा टप्पा
असतीलही मैत्रीच्या काही उथळ बाबी
 पण मैत्रीतील ही आत्मियता उत्कटता 
सुंदरता प्लुटोनिकच नसते का ?
प्लुटोची सौंदर्याची परिभाषा 
वेगळी काय आहे?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

तुज स्मरता

तुज स्मरता
*******
तुज स्मरता स्मरता माझा सरला एकांत 
स्मृती एकेक लाघवी आली फुलून मनात 

झाले आकाश कुसुंबी रूप भरले दिशात 
किती न्याहाळू कुणाला मन विखुरे कणात 

तूच चंद्र सूर्य तारे तूच तेज गंध वारे 
स्पर्श रोमरोमी निळे माझे अस्तित्व थरारे 

शुभ्र पुनवेची रात्र कृष्ण झावळ्या नाचऱ्या 
पाना पानावर किती तुझ्या मोहक सावल्या 

लाटा मंथर पाण्यात रव इवला खळाळ
ओली पाऊले वाळूत आणि थांबलेला काळ 

नुरे अस्तित्व हे माझे गेले विरून तुझ्यात 
गूढ तृप्तीचा हुंकार माझ्या उतरे देहात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २४ जुलै, २०२४

बस थांब्यावर


थांब्यावर
*******
एक दिवस अचानक ती
हायवेच्या बस थांब्यावर 
दिसली मला उभी रस्त्यावर
 घेऊन बॅग खांद्यावर 
थोडी  दिसत होतीअस्वस्थ 
बेचैनीही होती चेहऱ्यावर 
पुन्हा पुन्हा तिची नजर 
जात होती घड्याळावर

काही क्षण मनात भिरभिर 
थांबावे की जावे पुढे 
काय म्हणावे काय सांगावे
कळल्या वाचून द्विधा मी होवून
परंतु का न कळे
 पाय नाहीच पडले ब्रेकवर 
अन हात राहिले एक्सीलेटरवर 
गतीवर त्या होऊन स्वार 
गेलो थोडा मी दूरवर 
मग  डाव्या बाजूचा मिरर 
पाहणे टाळीत गाडी हाकीत
तसाच आपल्या ड्युटीवर

किती छान ती दिसते अजून
 ड्रेस सेन्स नसल्या वाचून
 केस तसेच पिंगट काळे 
चष्म्या मागील घारे डोळे
 पण लाली हसऱ्या गाली 
थोडी फिकट होती झाली 

गेले होते धागे सुटून
गाठी काही बसल्या वाचून  
जखमाही गेलेल्या भरून 
व्रणही ते केव्हाच मिटून 
कथा सुरू झाल्या वाचून 
गोष्ट गेली होती संपून

पण तरीही दुसऱ्या दिवशी 
त्या थांब्यावर
का गाडीची गती मंदावली 
खुळी नजर जरा विखुरली 
हातालाही कळले नाही 
पायालाही कळले नाही 
उरी श्वास  का जडावले 
मनाला या वळले नाही .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २ जून, २०२४

मोगरा

मोगरा 
****
रणरणत्या उन्हाळ्यात 
मोगरीला आली चार फुलं 
पांढरीशुभ्र टपोरी 
आकाशातील तारकांशी
स्पर्धा करणारी 
आणि मग मला तुझी 
हटकून आठवण आली

या मोगऱ्याचं आणि तुझं 
असं  नातं आहे की
मोगरा पाहिला की 
तू आठवतेस .

तुझ्या शुभ्र धवल कांतीवर 
रुळणारे चमकदार केस 
आणि त्यात माळलेला मोगरा 
गंधित झालेले वातावरण 
आणि उल्हासित मन

सांगितल्या वाचून 
मागितल्या वाचून
बहरून यायचे असे क्षण 
आणि त्या क्षणात मी 
जायचो माझेपण हरवून
 
तो सुगंध श्वासात दरवळतो 
आणि मनात तू दरवळतेस 
तेच अकृत्रिम स्नेहमय 
हसु गालावर ओठावर घेवून

खरतर मोगरा आणि तू 
यात सुंदर कोण हा प्रश्न 
लाख वेळा मनात आला 
आणि मोगरा प्रत्येक वेळी हरला 

जणू आपली हार मान्य करून 
माझ्या मनात तुझ्या जागेवर 
अलगद येऊन बसला
मग तू मोगरा झालीस 
तुझ्या स्मृती गंध झाल्या 
अन् या मनाचं आकाश 
झालं चांदणं कोजागिरीचं 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २८ मे, २०२४

बंदीवान


बंदीवान
*******
तुझ्या संभ्रमाची वेल 
तुला बुडवते खोल 
मी होऊनिया खिन्न 
ऐके उदासीन बोल 

तू घेतेस ओढवून 
उगा वृथाचे वादळ
होत कस्पट नशीब
मज गिळते आभाळ 

तुझे बिंब प्रतिबिंब 
वाद घालते स्वतःशी 
माझा हरवे आकार
जातो कुठल्या मितीशी 

तुला वेढून अमृत 
परी डोळ्यात तहान 
माझ्या ओंजळीचे पाणी 
जाते फटी झिरपून 

सुख सुंदर विखारी 
तरी नाही सोडवत 
तुझ्या डोळ्याचे गारुड 
माझा जन्म बंदीवान

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ६ मे, २०२४

फोटो

फोटो
*****

क्षणभर वाटले ठेवावा तुझा तो फोटो 
सेव्ह करून गॅलरीत 
किंवा पाठवावा क्लाउड वर
पहावा उगाचच कधी मधी

तशीच दिसतेस तू अजून 
तेच पिंगट लांब केस 
तेच राखाडी डोळे 
सुंदर कमानदार भुवया 
मोठाले कपाळ 
त्यावर मध्ये मध्ये येणाऱ्या बटा 
तेच तुझे गूढ मधुर स्मित 
सडपातळ तनु आणि 
चांदणे पांघरून यावे
तशी नितळ कांती 

तस तुला कुठे कळणार आहे 
हे माझे सेव्ह करणे
म्हणजे कोणालाही कळणार नाही 
मग काय हरकत आहे
 
तुला तर तेव्हाही कळले नव्हते 
आताही कळणार नाही 
इतक्या वर्षानंतर कळणे न कळणे 
सारे व्यर्थ आहे म्हणा 
पण शेवटी का न जाणे 
मी ते सारेच फोटो डिलीट केले 
वाऱ्याने अचानक उघडलेली खिडकी 
बंद करावी तसे 
आपला आतला विस्कटलेला
निवांतपणा ठीकठाक करावा तसा 
मी आलो वर्तमानातील कठोर वास्तवात 

आश्चर्य वाटत होतं 
मनात खोलवर दडलेल्या पुरलेल्या 
विसरलेल्या वेड्या स्वप्नांचे मूर्ख आकांक्षांचे
त्या अजूनही जिवंत आहेत 
मेंदूच्या कुठल्यातरी पेशीत 
आपली जागा अडवून 
जणू शिलालेख होऊन 
कदाचित जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
 न पुसली जाण्याची जिद्द धरून !
असू देत . .
तशी मेंदूत 
बरीच जागा असते रिकामी पडलेली 
असे शास्त्रज्ञ म्हणतात .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १ मार्च, २०२४

जातेस तू

 जातेस समोरून
*************
तू जातेस समोरून अन
श्रावणातील घननिळा मेघ 
घेतो मला लपेटून 
ती शामलता जाते 
माझा कणकण रंगवून
माझ्या अणूरेणूतून 
गहन यमुना होऊन 

कळत नसते तुला 
प्रत्येक तृणाचे आसुसलेपण 
दिसत नसते तुला
हात उभारून फडफडणारे
वृक्षावरील प्रत्येक पान 

जेव्हा झंकारून उठते 
तुझे नाव प्रत्येक पेशीतून 
स्थळकाळ जातात हरवून
उरते फक्त तुझेच गुंजन 

डोळे पाहत असतात 
तुला पाहून न पाहून 
दुराव्याच्या धूसर काचेतून 
ठेवतात कैद करून 
तुला न दिसणारे 
तुझे प्रतिबिंब होवून 

तरीही जातेस तू
पुन्हा पुन्हा निसटून 
फक्त एक सावळे
आषाढ स्वप्न देऊन 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .
 

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

माहीत आहे


माहीत आहे
**********
एकमेका वाचूनही जगू शकतो आपण 
तशी इथे अनेक कारणं जगण्याला आहे
तुलाही माहित आहे मलाही माहित आहे ॥

वर्षा ऋतू सरून गेलाय आकाश रिते आहे 
सरला वेग वादळाचा माळरान निशब्द आहे 
तुला माहित आहे मलाही माहित आहे ॥

प्रत्येक मेघ पावसाचा पाणी होत नसतो काही 
जया अंत नसतो कधी अश्या गोष्टी अनंत आहे
तुलाही माहित आहे मलाही माहित आहे ॥

आम्ही पाऊस पाहिला आहे थेंबथेंब झेलला आहे 
देह वस्त्र सुकले आता तरीही खोलवर ओलआहे 
तुलाही माहित आहे मलाही माहित आहे ॥

नवा ऋतू येईल कधी तुला मला ठाऊक नाही 
भेटशील तू नव्या जन्मी मी ही तया उत्सुक आहे 
तुलाही माहित आहे मलाही माहित आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

क्रियमानी गाठ


गाठ  क्रियमानी
**************
कळतात मला तुझे डोळे 
कळतात अन भाव खुळे 
माहीत नसेल तुला सखे
तूच स्वप्न  माझ्या मनातले ॥

प्रत्येक हसू तुझ्या ओठातले 
बघ या मनी मी जपून ठेवले 
आणि तुझे ते प्रत्येक पाहणे 
धुंदी जगण्याची देऊन गेले ॥

तसा फारसा हा मोठा नाही 
प्रवास तुझा नि माझा बाई 
करी बांधाबांध मी सामानाची 
मधुर हासून तू निरोप देई ॥

आहे क्रमप्राप्त तुज भेटणेही 
परी कधी कुठे ते ठाऊक नाही 
कुणा कुणाला कळल्या वाचून 
गाठ बांधली क्रियमानी मी ही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

येते


येते
****

जेव्हा नीज येत नसते 
रात्र रेंगाळत असते 
क्षणाचे गाणे उगाच
पुढे सरकत असते  
ते एकटेपणातील जागणे 
मज असह्य होत असते 

तेव्हा तू जवळ येतेस 
कुशीत माझ्या शिरतेस 
आणि मला म्हणतेस 
तुला अजून स्वप्न पडतात का ?
मग मी तिला म्हणतो 
तर मग तू कोण आहेस !

तेव्हा ती हसते 
माझ्यात हरवून जाते 
जाता जाता म्हणते 
ये मग तिथे 
मी तुझी वाट पाहते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

स्मृती

तुझ्या स्मृती.
********
तू नसतेस तेव्हा 
तुझ्या असंख्य स्मृती 
रुंजी घालतात मनात 
आणि मला ओढून नेतात 
तुझ्या सहवासात 

तेव्हा तू आकाश होतेस 
मला कवेत घेणारे
तेव्हा तू सुमन होतेस 
मला धुंद करणारे

तेव्हा तू फांदी असतेस 
माझ्यासवे झुलणारी 
माझे आसमंत भारावते 
तुझी निशब्द बासुरी 

तुझे नसणे घनदाट होते 
आणि माझ्यात आकार घेते 
खरेच तू जवळ नसतेस 
तेव्हाही इतकी जवळ असतेस 
की माझे पण 
तुझे होऊन जाते जाते 

त्या तुझ्या दुराव्याने अन विरहाने 
तू माझ्यात खोलवर रुजत असतेस 
अभिन्न होवून अन् राहतेस
माझ्यातील ओल टिकवून
जणू रंगातील पाणी होवून 

नाम रूपातील हे 
तुझे अस्तित्व 
मी माझ्यात धरून 
असतो  जगत सदैव
तुझा होवून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

चांदण्याची गाणी


चांदण्याची गाणी
 ************

तुझी चांदण्याची गाणी  
मनी झरती येऊनी 
बोल पखरण ओली 
जातो चिंब मी भिजुनी ॥

तुझे हात हाती येता 
जन्म किती सरतात 
तुझ्या डोळ्यात वाकता 
स्वप्न किती फुलतात ॥

तुझ्या वेडात अजून 
शब्द नवे उमलती 
माझ्या गाण्यात नव्याने 
भाव पुन्हा अंकुरती ॥

मिठी मारते जीवन 
भरे श्वासामध्ये प्राण 
तम फिरते माघारी 
येते पूनव दाटून ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .


रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

अस्तित्व


अस्तित्व
********
तू मेघ आषाढाचा माझ्या जीवनात 
बरसला असा जन्म सुखावत ॥

तू डोह यमुनेचा माझिया डोळ्यात 
हरवून तृषा मी झालो पूर्ण तृप्त ॥

तू चंद्र पुनवेचा माझिया मनात 
स्मरून तुला मी नाहतो अमृतात ॥

तू गंध बकुळीचा माझिया श्वासात 
मी धुंद सदैव तुझ्या अंगणात ॥

तू स्पर्श पालवीचा मृदुल काळजात 
मी थांबून क्षणात ठेवी हृदयात ॥

तू अस्तित्व हे माझे घेतले पदरात 
उरलो न मी आता व्यर्थ या जगात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...