गणपती
******
कुठे कुठे रूप तुझे
कितीदा मी न्याहाळतो
तोच भाव तीच श्रद्धा
जीव उमलून येतो ॥ १
सजावट मुळी सुद्धा
मन हे पाहत नाही
तुझ्या डोळी हरवतो
काळ तो उरत नाही ॥ २
क्षण एक दोन तीन
पांगुनिया कोश जाती
लखलखे वीज एक
पंचप्राण पेट घेती ॥ ३
मृतिकेचा देह माझा
मृतिकेला दूर सारी
विरुनी भास आभास
तूच दिसे मुलाधारी ॥ ४
पालटती युगे किती
जन्म किती उलटती
तुला मला पाहतो मी
वर्तुळात कोटी कोटी ॥ ५
असणेही व्यर्थ होते
नसणेही अर्थ देते
कळते ना काही जरी
जाणणे ते शून्य होते ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
//kavitesathikavita.blogspot.
☘☘☘☘ 🕉️