रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

सरली जैसी वर्ष हजार





सरली जैसी वर्ष हजार
सरतील रे आणि हजार

विना थांबता काळ धावतो
खुणा काही न मागे ठेवतो

कशास आला कुठे चालला
या मातीचा हा असा पुतळा

पाया खाली या अनंत वस्ती
होतील आणि या ही वरती

जग क्षणाचे खेळ खुळ्याचे
हवे कळाया काय कुणाचे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

पुन्हा तो व ती !



पुन्हा तो व ती !

ती घट्ट डोळे मिटूनी
दृष्टी बाजू वळवूनी  
बोले शब्द आठवूनी  
तयास उगा टाळूनी  

यत्न तिचे जाणून तो
चलबिचल पाहतो  
जरी ह्रदयी  ठेवीतो  
परी काही न सांगतो   

तिचा देह बांधलेला
जन्म कुठे वाहिलेला
मोह कसा मग मनी
प्रश्न असे पडलेला

खरे तर कुणालाही
उत्तर माहित नाही
असेल का हे कारण   
नव्या जन्मासाठी काही ?

यात पण गैर नाही
मन काही वैरी नाही
प्रेमा येणे जन्मा असे   
गोष्ट अघटित नाही  

पण तिला ते पटेना  
मनाचे मुळी कळेना
ठाम तिने मग पुन्हा
घट्ट बांधले डोळ्यांना  

किंचित हसला तो ही
गेला पुढती निघुनी
बघ भेटू या फिरुनी
बोलुनी काहीसा मनी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



भीक

भीक !
******
हे ही बंद 
सदा सर्वदा
अन ते ही 
बंद दार

भिकेस आले 
तेच ते मग
काही शिळे 
शब्द उधार

मनातील 
याचनेस या
का भूक लागे
अनिवार

आसक्तीच्या 
पात्री होता
काळाकुट्ट 
फक्त अंधार

घर फुटू दे 
व्योम तुटू दे
मातीचा हा 
मर्त्य आधार

नको पापण्या 
तीर उजेडी
व्यर्थ मांडला 
असे व्यापार

नकोच पण ते
असणे होणे
भास आभासी 
खुळा स्वार

गड गड गड 
धडाम धुडूम
होऊन विजेचा 
तीक्ष्ण वार

मिटल्या वाचून 
मिटू मिटू दे
सुटून सारे 
हिशोब गचाळ

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

शोधण्याचा क्षोभ



॥ शोधण्याचा क्षोभ ॥

थकलेला देह आता
मिटावासा वाटतो रे
नाहीपणात मी पुन्हा
हरावासा वाटतो रे ॥

कशासाठी जगायचे
कुणासाठी जगायचे
घनदाट एकांत हा
सरावासा वाटतो रे ॥

पाहूनी वाट बहुत
दिन उजाडत नाही
तमात या जीव आता
विरावासा वाटतो रे ॥

तसा तर काळ काही
आहे म्हणतात लोक
क्षुब्ध आकांत सुखाचा
हटावासा वाटतो रे ॥

वेदनांचा देह जीर्ण
बंदिवान मन आत
निरर्थक प्रवास हा
थांबावासा वाटतो रे ॥

असो नसो पुढे काही
थकलो शोधून तेही
शोधण्याचा क्षोभ सारा
बुडावासा वाटतो रे ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

ग्रंथ ज्ञान




पाहिले अपार 
ग्रंथांचे प्रकार 
ज्ञानाचा विस्तार 
अवाढव्य ॥

पाहू जाता मीती
कळेना ती किती 
बुद्धीचिया माथी
भार फक्त ॥

शब्दांचा पसारा
मनात मावेना 
विक्रांत दिसेना
अनुभव ॥

कुठून ते आले 
अन् कुठे गेले 
बरडी वाहिले 
जैसे जळ ॥

दत्त ज्ञानदेवा
करा हो उपाय
भरा हे ह्रदय
आत्मज्ञानी 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

उगाच जातेस



उगाच जातेस हासून तू
सारेच निर्धार मोडून तू
मी ओढलेला अंधार माझा
जाते क्षणात हरवून तू ॥

रव निसटल्या पाकळयांचे
शब्द सहज विखरून तू
अन वज्र माझे निग्रहाचे
क्षणी पाणी पाणी करून तू ॥

येऊ नकोस म्हटले तरी
जातेस प्रतीक्षा होऊन तू
तुझा स्मृतींची होतो पालखी
नेतेस मजला वाहून तू ॥

वेडी ठेवली बांधून स्वप्ने
जातेस हळू उघडून तू
माझ्या साऱ्या पसाऱ्यास या
जातेस पुन्हा चिडवून तू ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

माझे महाराज

॥ माझे महाराज ॥

लखलखता तारा
माझे महाराज
चकाकता हिरा
माझे महाराज

नामाचा अवतार
माझे महाराज
ज्ञानाचा आधार
माझे महाराज

प्रेमाचा बाजार
माझे महाराज
योगियाचा संसार
माझे महाराज

महाराज आठवे
हृदय भरते
घ्यावेसे वाटते
नाम सदा ते

नाम कल्पतरू
विक्रांता भेटला
संदेह मनीचा
अवघा मिटला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

खेळ




 खेळ

हवे पणाची
ओढ विलक्षण
कळल्यावाचून
प्राण व्याकूळ ||

कधी सुखाची 
गूढ हुरहूर
अथवा काहूर 
दु:खाचेही ||

ये अंधारून
नको असून
किती पराधीन
जगणे हे ||

म्हणते कुणी
नकोच थांबूस
हरवून जावूस
घोर तमी  ||

परी धावणे
घडते पडणे
जन्म शोधणे
रानोमाळ ||

कसला खेळ
खेळे दिगंबर
जळते अंतर
रात्रंदिन ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

गाडा


गाडा


जगायची सक्ती नाही
तरी जगेन म्हणतो मी
असेच मरता येत नाही
अन्यथा मेलो असतो मी

तसा पोटास लागलो आहे
अन सुखाने जगतो मी
दोन तपे होतो जसा की
तसाच अजून दिसतो मी

हे सालं लचांड जगण्याचे
कधी पासून शोधतो मी
नाहीतर हे फेकून सारे
कधीच गेलो असतो मी

बायको पोरे धन मान
चारजना गत राहतो मी
रोज घाबरत उठतो अन
रोज घाबरत निजतो मी

हसणे खेळणे गाणे वगैरे
तसा रोज म्हणतो मी
अन डोळ्यात अंधार पेरून  
मलाच रोज शोधतो मी

मातीचाच हेका माझा
मटका असून धरतो मी
साठलेल्या पाण्यात अन  
हळू हळू विरघळतो मी

तसे तर लाखो विक्रांत
डोळ्या समोर पाहतो मी
तुटणाऱ्या जंगलास या
गाडा होवून वाहतो मी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...