शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

गाडा


गाडा


जगायची सक्ती नाही
तरी जगेन म्हणतो मी
असेच मरता येत नाही
अन्यथा मेलो असतो मी

तसा पोटास लागलो आहे
अन सुखाने जगतो मी
दोन तपे होतो जसा की
तसाच अजून दिसतो मी

हे सालं लचांड जगण्याचे
कधी पासून शोधतो मी
नाहीतर हे फेकून सारे
कधीच गेलो असतो मी

बायको पोरे धन मान
चारजना गत राहतो मी
रोज घाबरत उठतो अन
रोज घाबरत निजतो मी

हसणे खेळणे गाणे वगैरे
तसा रोज म्हणतो मी
अन डोळ्यात अंधार पेरून  
मलाच रोज शोधतो मी

मातीचाच हेका माझा
मटका असून धरतो मी
साठलेल्या पाण्यात अन  
हळू हळू विरघळतो मी

तसे तर लाखो विक्रांत
डोळ्या समोर पाहतो मी
तुटणाऱ्या जंगलास या
गाडा होवून वाहतो मी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...