मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

कान्हुली जगदंबे





तुझिया बिढारी
झालो घुसखोर
टाकुनिया भार
राहिलो मी ||
किती हाकलेले
नाही हटणार
लोचट लाचार
श्वानापरी ||
अवघे संपले
मागील आधार
कळो आला पार
संसाराचा ||
मांडिले निर्वाण
प्राण हे पणास
मारा तारायास
उभा दारी ||
साऊली सुखाची
तुझीच माऊली
याचतो कान्हुली
जगदंबे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

भास पाचूचा






देहामध्ये मुरलेला
स्पर्श रेशमी कुणाचा
डोळयामध्ये भिनलेला 
रंग सावळा कुणाचा

मनामध्ये रुंजणारा
भास पाचूचा कुणाचा
कानामध्ये गुंजणारा
शब्द कोवळा कुणाचा

व्यापुनि तनामनाला
गंध उरला कुणाचा
प्राणात कोंडुनी श्वास
प्रश्वास धुंडे कुणाचा

पुन:पुन्हा शोधितो मी
तोच चेहरा कुणाचा
आभाळ शून्य मोकळे
स्पंद जाणवे कुणाचा

मिटताच डोळे मीच   
होतो नकळे कुणाचा
लक्ष लाटा सर्वागात
पार लागे ना कुणाचा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, २६ सप्टेंबर, २०१५

सुटते आणि बसते गाठ




हरवत जाते  एक  एक वाट
विस्मृतिच्या घनदाट रानात
रुळलेले पावूल अड़कते
अनोळखी  कुण्या  जाळ्यात

मी माझे सारे ओळखीचे  
गाव हरवते कुण्या डोंगरात 
धावायचे आता  कशाला
दीप विझतात अंध हातात

विखुरतात हाका  साऱ्या
कपारीतील  खाचखळग्यात
हळूहळू अन भान हरवते
या  इथल्याच घन गोंगटात

कधी  कुठली चांदनी अन
मेघ  सावळा  येतो नभात
गूढ़ गुपित काळी सावळी 
उमलु लागतात अंतरात

तेवढाच मी  माझा होतो
उगाच  सुटतो गाणे  गात
नि  बरेच  काही होते आत
सुटते आणि बसते गाठ



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०१५

अट्टाहास




अट्टाहास  मनाचा 
श्रेष्ठत्वाचा ,अधिकाराचा 
अन जयजयकाराचा
जेव्हा पडतो
धुळीत कोलमडून
हास्यास्पद होवून

अहंकारची लत्करे मग
पिसाट भुते होवून
झपाटू लागतात
येणाऱ्या जाणाऱ्या
प्रत्येक सावलीस
मग सारे  रान 
चरकु लागते अन
धरु लागते दूरची वाट

मनातील भेगा
अधिकाधिक वाढतात
विखुरते  अस्तित्व
असंख्य तुकड्यात 
वाहतात हातातून
जमवलेले  सुखाचे कण
हळूहळू  जाणिवेची
शक्ति घालवून
पड़ते बुद्धि गहाण
भासमान तरंगांना
अन
उकिरड़ा  उपसणाऱ्या
अर्धवटागत मन
सुखाचा नवा मार्ग
शोधू लागते त्याच घाणीत

डॉ विक्रांत प्रभाकर
 http://kavitesathikavita.blogspot.in/



सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...