सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

तुच करविता

तुच करविता 
तुझी ही कविता 
शब्दांना वाहता 
मी रे फक्त ॥१॥

काय माझी शक्ती 
तुज वर्णवावे 
स्वरूप लिहावे 
हे अक्षरात ॥२॥

जोवरी तुजला 
वाटते चालावे 
गीत हे रे यावे 
माझ्यातून ॥३॥

तोवरी हि मती 
शब्दांच्या संगती 
गाईल महती 
दत्ता तुझी ॥४॥

तुझिया शब्दांच्या 
ठेवुनि  संगती
तुवा केले किती 
उपकार ॥६॥

विक्रांत तुझिया
शब्दांचा चाकर 
वाहतो उधार
माल तुझा ॥५॥
*********
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

अनामिकत्व

अनामिकत्व
**********
अनामिक भीतीच्या बुडबुड्यात 
आसक्तीच्या क्षणिक  पापुद्र्यात
पोकळ जीवनाचे ओझे घेऊन 
जगतो आम्ही अर्थ शोधत 
आपल्या असण्याचा आणि नसण्याचा 

काही मृत आणि काही अमृत पुस्तकांमधून 
शब्दांच्या अगणित राशीमधून 
झेपणारा अन कळणारा सारांश गोळा करीत 
सरपटतो चाचपडतो आम्ही 
आपण असल्याची खात्री करत 
चालूच ठेवतो शब्दांचा हा प्रवास 
त्या त्यांच्या शब्दांना पाठ करून 
घोकून घोकून

कधी देतो मोठेपण . .व्यापकत्व 
आपल्यात असलेल्या भावनांना 
त्यांना प्रेमाचे नाव देऊन 
वा त्यागाचे लेबल लावून 
आणि शोधतो जगण्याला एक कारण
 त्याच्या सा-या खोटेपणाकडे 
चक्क कानाडोळा करून 

या साऱ्या शोधा-शोधीत टाकाटाकीत 
कुणाला भेटतो दत्त 
कुणाला कृष्ण 
तर कोणाला भेटते भवानी 
कुणाला साईबाबा 
कोणाला समर्थ कुणा ज्योतिबा खंडोबा 
मग आपल्याला भेटलेल्या आधारास 
घट्ट पकडून पक्के बिलगून 
जातो आम्ही जीवन जगून

खरेतर अनामिक असतो आपण 
जगतो अनामिक म्हणून 
आणि मरतोही अनामिक होऊन 
पण या अनामिकत्वाला भेदून 
 छेद देऊन 
जाण्याची लालसा 
अमरत्वाची तीव्र इच्छा 
 होत असते कदाचित जन्माचे कारण
*********
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

तेव्हाही

तेव्हाही

*********

रुपेरी बटा 
कानावरील सावरीत
 हसलीस तू 
तशीच ओठ दुमडीत 
"कशी आहेस?" बोललो मी 
काही फॉर्मल शब्द वापरीत 
"मजेत"! म्हणालीस तू 
तश्याच फॉर्मल शब्दात 
इकडे कुठे ?
किती वर्षांनी ?
"हो ना " ! तू म्हणालीस 
"नातवाच्या वाढदिवसाला 
मुलगी इकडेच असते पुण्यात "
चक्क आजी झालीस तू 
मी आश्चर्यचकित 
भराभर डोळ्यासमोर 
गॅदरिंग मधली 
डोळ्यासमोरून चमकून गेली तू
पाच-दहा मिनिटं बोलणं झालं 
काय करतेस कुठे राहतेस 
आणि मग शाळेतील इतरांची चौकशी 
काही आवडते शिक्षक 
काही घटनांना उजळणी 
काही खोडकर आठवणी 
जणू भूतकाळातच
गेलो होतो  हरवूनी
"चल माझ्या ट्रेनची वेळ झाली "
सांगत उठलीस, निघालीस तू 
"भेटू पुन्हा" म्हणत हसलीस 
सहजच आपल्या वाटेला चालु लागलीस 
पण कसे अन कुठे ?
नाही पत्ता वदला 
नाही नंबर देवू केला
आणि खरं तर 
मीही नाही विचारला 
काही धागे तुटलेले 
काही सूर सुटलेले 
सुंदर असतात आपल्या ठिकाणी 
गाण्यावरून आठवले 
तू म्हटलेले गीत 
हे मेरे वतन के लोगो .
शाळेतील वर्गामध्ये 
सरस्वती पुजनाच्या दिवशी
तेव्हाही विसरलेलीस 
काही सूर तू
आमच्या उस्फुर्त पण 
बेसूर सुरांच्या तालामुळे 
पण गात राहिलीस 
आणि जात राहिलीस 
आपले गाणे गात 
तेव्हाही 
आणि आताही 
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

Image source: grombre

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

गिरनार नाद

गिरनार नाद
*********
टप टप टप 
ओघळते पाणी
गोमुख वाहणी
हलकेच॥

फडफड फड
उडते पाखरू 
सर्वांग सुंदरू 
अनायसे ॥

सळसळ सळ
पानाचे संगीत 
पडते कानात 
अलगद ॥

खळ खळ खळ
इवला निर्झर 
मग्न तालावर 
स्वतःचाच ॥

घूम घूम घूम 
घोंगावतो वारा 
वादळ भोवरा 
कपारीत ॥

चिरचिर चिर 
अनाम चित्कार 
रोम देहावर
उठतात ॥

खट खट खट 
चालणारे पाय 
जीवन उपाय 
शोधावया ॥

विक्रांत नादात 
अंतर बाहेरी 
अज्ञात कुहरी 
हरवला ॥

दत्त दत्त दत्त 
येतसे ओठात 
गिरनार वाट 
पाऊलात ॥
*******

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

उपेक्षा

उपेक्षा 
****
उपेक्षा फुलांनी 
भरले आभाळ 
पाडण्याचा आळ
स्वतःवरी ॥

काही जीवनाची 
असे चूकभूल 
प्रारब्धाची चूल 
पेटलेली ॥

विझल्या दिव्याचे 
ओझे हातावरी 
पाय काट्यावरी 
तोललेले ॥

केली विनवणी 
व्हावी बोळवण 
परंतु जीवन 
ताठ मानी ॥

नकोशा हाकांचे 
शब्द कानावरी 
जाणीव बहिरी 
होतं नाही ॥

अनंत काळाचा 
सुळका नभात 
गीत गौरवात 
नटलेला ॥

येती जाती किती 
गवताची पाती 
कुणास गणिती 
नाही कुठे ॥

विक्रांत मनाचे 
ओढाळ पाखरू 
घेतेच पांघरु 
नभ तरी ॥
*******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

गमावणे

ही कविता डॉक्टर रजनी जगताप यांच्यासाठी डॉक्टर बिना अपोतीकर यांनी लिहिलेली आहे या कवितेचे भाषांतर करण्याची विनंती डॉक्टर रजनी यांनी मला केली परंतु शब्दश: कुठल्याही कवितेचे भाषांतर करणे अशक्यच असते,म्हणून मी तिचे मराठी रूपांतर केले आहे ते असे.
गमावणे(Loss)
******* 
गमावणे असते 
एक आकस्मिक घडणे 
क्षणात हातात असलेले 
क्षणात निसटून जाणे 
हे गमावणे 
दाखवते भिती मला 
कुरतडून माझ्या काळजाला 
होय नक्कीच !

हे गमावणे 
मनात उभे करते
दुःखाचे रान 
वेदनांची दलदल 
अगतिकतेची डोह 
अन भीतीच्या काट्यांची वाट 
उठवते आत
नको असलेल्या 
चिंतेचे वावटळ .
नेते ओढत 
तर्काच्या जाळीत 
त्यात अडकून ओरबाडून 
विद्ध होते मन 

या अगतिकतेच्या जाणिवेतून 
या भीतीतून 
बाहेर पडण्यासाठी 
करायचे तरी काय ?

कुणीतरी गमावण्यात  अभिप्रेत असते 
विरहाचे दुःख 
एकटेपणाची जाणीव 
ज्यात नसते कुणी सोबतीला 
आणि सवे घोंगावत असते 
चिंता .. ..पैशाची 
चिंता . . ..आजारपणाची 
अन शेवटी 
चिंता . .. ..कुठेतरी एकटेच 
मरून जाण्याची !

या गमवण्याच्या व्यथेच्या 
डोळ्यात मला पाहता येवू दे 
काय आहे या भीतीच्या पलीकडे 
मला जाणता येवू दे 
अगणित तुकड्यात विखुरलेले 
हे माझे पण 
मला वेचता येवू दे 
मला अवघे कळू दे 
माझे अज्ञान जळू दे 
होऊ देत माझे मनगट 
सशक्त निर्भय
मला लढता येऊ दे .
आणि होता येऊ दे 
खंबीर उदात्त
घेता येऊ दे 
काळजी 
मागे राहिलेल्यांची 
एक दिवा होऊन 
दाखवता येऊ दे 
वाट
धडपडणाऱ्या त्या जीवांना 
जिजुविषेचे स्वप्न 
पेरता येऊ दे 
त्यांच्या मनात

जीवन भयाच्या अग्नीने 
पादक्रांत करण्यापूर्वीच
मन निराशेच्या धुराने 
आच्छादित होण्यापूर्वीच 
फार फार उशीर होण्यापुर्वीच 
हर्षाची सुमने म्लान होण्यापूर्वीच 
मला शोधता येऊ दे 
मार्ग 
पुन्हा भरारण्याचे आकाशात 
पुन्हा तरारण्याचे भर रानात 
पुन्हा उसळण्याचे आनंदात 

हा मार्ग 
रसरसून जगण्याचा 
जिवंत राहण्याचा 
मला सदैव पाहता येवू दे.

****
रुपांतर
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे.

https:// kavitesathikavita.blospot.com
***************
For  our support group "Staying alive"
LOSS
******
Loss
What are you, really? 
To have something 
And then 
To not have it anymore. 

Loss
Do you scare me? 
Oh yes, you do
You can cause 
Grief, pain,depression
And then you cause fear
Unnecessary worry
And constant speculation. 

Loss
What's the way,then?
Get the fear out
FEAR
Of not having 
Someone to communicate 
Fear
Of not having money 
Fear
Of falling sick
Fear
Of dying alone 
So many more.... 

LOSS
Let me look at you in the eye 
Let me know what's beyond 
Let me pick up the pieces 
Let me know more 
Let me not remain ignorant 
Let me be fighting fit and strong 
Let me care for the ones left behind 
Let me show others the way 
Before fear takes hold
Before its too late 
Before the smile disappears
Let me find a way to thrive
To spark joy
In this path of STAYING ALIVE. 
-Dr. Bina.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

कृपावर्षा

कृपावर्षा
*******

वाट ती पहावी 
चोच उघडून 
चातक होऊन 
वर्षेसाठी ॥

पडेल पाऊस 
सरेल तहान 
आसही ठेवून 
मनामध्ये ॥

स्वातीच्या थेंबाने
घडे मोती दाना 
मिळे पण कोणा 
क्वचितच ॥

येवू देत ऋतू 
जाऊ देत ऋतू 
तमा नको मृत्यू 
येण्याचीही ॥

साफल्य जीवाचे 
मोती ते व्हायचे 
भान स्वरूपाचे 
साकारले ॥

परी ती प्रतीक्षा 
करावी आजन्म 
साठवून प्राण 
डोळीयात ॥

विक्रांत वर्षेच्या 
स्वागता आतुर 
दत्त प्रभूवर 
धावा वेगी ॥

******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

कोरडा आड

कोरडा आड
**********

फाटलेले मन 
विटलेले तन 
वाहतो मी दत्ता 
तुझिया वाचून ॥

साराच उधार
शब्दाचा बाजार 
कोरड्या आडात 
घुमतो हुंकार ॥

म्हणतात लोक 
भक्त रे मजला 
परी किती आत 
नाटक भरला ॥

उघड्याच साऱ्या 
माझ्या व्रण व्यथा 
मागे कृपा दवा 
तुजलागी दत्ता ॥

काम क्रोध लोभ 
मोह माया आग 
सोडवी रे दत्ता 
जीवन हा रोग ॥

विक्रांत लत्करी 
भिकार दुबळा 
फक्त आशेवर 
तुझिया तगला॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

खंत

खंत
****
इवल्या जीवाचा 
इवला प्रवास 
इवलासा भास 
असण्याचा ॥

इवलासा देह 
इवलेसे मन 
इवले कारण 
जगण्याला ॥

खंत इवल्याची 
नच या मनात 
आहे मी तयात 
सुखी जरी ॥

खंत असण्याची 
कळल्या वाचून
बोच रात्रंदिन 
बाळगतो ॥

कधी उजाडेल 
तुज कळण्याचा 
सवे असण्याचा 
मधुमास ॥

विक्रांत जगात 
आग अंतरात 
डोंब सागरात 
वडवानळ॥

*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https:// kavitesathikavita.blogspot.com 

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

भगवी कफनी

एकदा येऊनी
पहा रे देऊनी
भगवी कफनी 
मजलागी ॥

तन मन काय
देउनिया प्राण 
होईल भूषण 
तुज लागी ॥

जगी मिरवीन
अलख गाईन.
प्रकाश होईन 
धुनीतला ॥

कंथा पांघरीन
पुंगी वाजवीन
जगा दाखवीन 
मुद्रा तुझ्या ॥

धन लाथाडीन 
तन लाथाडीन 
मना झोपवीन 
तुझ्या पायी ॥

सेवा ही अर्पून 
जगा सुखवीन 
तुजला पाहीन 
जीवो जीवी॥

विक्रांत दत्ताचा 
करी रे प्रितीचा 
पथ स्वरुपीचा
दावी आता ॥
*****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
https:// kavitesathikavita.blogspot.com 

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

मी मोठा

मी मोठा
******
मी मोठा
रे मी मोठा 
कारण माझा 
बाप मोठा 
तू छोटा रे 
सदैव छोटा 
कारण तुझा 
बाप छोटा 

पैसा माझा 
सत्ता माझी 
म्हणून  असे
मला गाडी 
माझी माडी 
अन समोर 
बडी धेंडी 
मान तुकवून
हसती थोडी 

तुला चाकरी 
माझ्या दारी 
बाप मोडतो 
दारी भाकरी 
मान मजला 
करी सलाम 
समोर माझ्या 
खाली मान 
रे मी मोठा 
अन तू छोटा 

नाहीतर मी 
चुका दाविन 
वाट लावीन 
काम काढीन 
भुके मारीन 
हा हा हा !
यात नच रे 
काही नवीन 
असे बळी 
तो कान पिळी 

माझा पैसा 
माझी सत्ता 
माझे सेवक 
माझे सैनिक 
धनको रे मी 
धनिक धनिक 
बाकी सारे 
माझे पाईक

राजा माझा 
प्रधान माझा 
न्यायनिवाडा 
तोही माझा 
देऊळ माझे 
देव माझा 
पुजारीही 
केवळ माझा 
तू छोटा रे 
सदैव छोटा 
बहू हुशार 
शिक्का खोटा 
मी मोठा रे 
मी मोठा 
कारण माझा 
बाप मोठा
*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

भिंत

Dear friends ,After reading  yesterdays fierce discussion 
on cast and reservation on my medical college group .I have written these few lines .
Hope some of you will agree with me .

भिंती 
***
कधी दृश्य होत्या 
कधी अदृश्य होत्या 
भिंती सततच होत्या 
भिंती रुततच होत्या 

लाख यत्न केले कोणी 
अन धडका मारल्या किती 
पण कधी पडल्याच नाहीत 
कधी हलल्याच नाहीत 
या भिंती

रंग बदलतो या भिंतींचा 
गिलावाही बदलतो 
नक्षी ही बदलतात कधी 
कधी बनतात त्यात 
नवीन दरवाजे 
पण सक्त कुलुपाचे 
परवानगीच्या फर्मानाचे 
त्याने अधिकच वाढतो 
रुबाब या भिंतींचा 
अधिकच घट्ट होतात त्या भिंती
असे वाटते 
कधी पडणारच नाहीत या भिंती 

काल तिकडून उभारल्या जात होत्या भिंती 
आज इकडून उभारल्या जात आहेत भिंती 
सहस्त्रावधी अवमानित 
आत्म्यांचा आक्रोश जागा करीत 
पण . . पाडल्या जात नाहीत या भिंती

सत्ता श्रेष्ठत्व उच्चत्व 
यांचाच खेळ हा शेवटी 
पैसा भुक मृत्यू भीती 
हीच इथली खरी शस्त्र असती 
गांधीलमाशी मधमाशी 
लाल मुंगी काळी मुंगी 
युद्ध येथे रोजच चालती

कधीतरी या भिंतीस
पाडले होते खिंडार 
नाथ मच्छिंद्र गोरक्ष यांनी 
कबीरादी ज्ञानेश्वरांनी 
नाहीच तुटली ही भिंत तरीही 
देव झाले तेच 
मांडले गेले या भिंतीवरती 
खरंच का तुटत नाहीत या भिंती ?

मान्य आहे सगळ्यांनाच 
किती अनैसर्गिक आहेत या भिंती 
किती लाजिरवाण्या आहेत या भिंती 
पण या भिंतींच्या अलीकडे 
आहे एक संस्कृती 
अन पलीकडे आहे दुसरी संस्कृती 
काहीही करून त्यांना 
ती टिकवायची आहे 
आणि काहीही करून 
यांना ती जाळायची आहे 
मग सांगा बरे कशा तुटतील या भिंती 

खरे तर 
या जगात संपूर्ण टाकाऊ 
असे काहीच नसते 
मातीतच मिसळलेले सोनेही असते 
वेचले तर जीवन समृद्ध होते 
फेकले तर दारिद्र्य भोगावे लागते 

कदाचित तुटतीलही या भिंती 
काळौघात विरुनही जातील 
पण आज तरी या भिंतींचे
अस्तित्व स्वीकारत जगत 
तिच्या दार खिडक्यातून 
आत बाहेर जात 
देणे घेणे करीत
जगण्यातील तिचे अस्तित्व
 "गौण करण्यात "
शहाणपण आहे 
नाही का?

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

देशमुख सिस्टर (श्रद्धांजली)

देशमुख सिस्टर(श्रद्धांजली)
*************
आत्ताच कळले 
देशमुख सिस्टर गेल्या .
देशमुख सिस्टर रिटायर होवून 
चार पाच वर्ष उलटली असतील
मी पाहिले होते तेव्हा 
त्यांचे कडक करारी भक्कम 
व्यक्तिमत्व पाहून 
असे काय होईल असे वाटले नव्हते .
देशमुख सिस्टर होत्या 
कर्तव्यकठोर शिस्तप्रिय 
पण त्यांच्या कृतीत असायचे
कामावरील प्रेम अन
त्यांच्या शब्दातून जाणवायचे 
त्यांचे निर्मळ मन 
बोलतांना व्यक्त व्हायचे 
जीवलग अन प्रियजनावर 
असलेले अपार प्रेम 
त्यांचे बोल असायचे खणखणीत 
कोणाचीही मुलाहिजा ना बाळगत 
यायचे वातावरण भेदीत 
त्या सहजच एकेरीत हाका मारीत 
आई सारखा दम देत 
त्यांना टाळणे 
भल्या भल्या कामचोरांना 
नसे जमत 
त्यांना नाही कसे म्हणावे
कोणालाच नसे कळत.

सावळासा रंग 
शुभ्र पांढरे केस 
कपाळावरील ठसठशीत कुंकू 
गळ्यातील मंगळसूत्र 
सरळ नाक 
करारी चेहरा 
लाल पट्ट्यातील देशमुख सिस्टर
 वावरायच्या अपघात विभागात
तेव्हा वाटायचे 
खरेच या देशमुखीच करीत आहेत .
त्यांचे हसणे बोलणे 
असायचे एकदम मोकळे 
माळावरील आकाशासारखे 
एकदम अकृत्रिम 
गावाचा स्पर्श असलेले .
असे वाटायचे 
त्यांनी सारे जग जाणले असावे 
त्यांना कोणी फसवू शकणार नाही 
कोणी गैरफायदा घेऊ शकणार नाही .
असे एक भारदस्त स्पष्ट
कडकडीत खणखणीत व्यक्तिमत्व 
आपल्यातून निघून गेले आहे .
जरी त्यांना खूप वर्षे भेटलो नसलो 
तरी त्यांचा आवाज कानात घुमत आहे
अन त्यांचे जाणे 
मनाला खिन्न करीत आहे  .

डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

वाचून

वाचून
****
पडे ना उजेड 
जळल्या वाचून   
मुर्ती ना आकारे 
तासल्या वाचून ॥

घडेना मडके  
भाजल्यावाचून
बीजा ना वृक्षत्व 
फुटल्यावाचून ॥

करी रे साधन 
अवघे अर्पून
साध्य काही ते
तरीच होईन॥

काही न मिळते
पेरल्या वाचून 
जल का कुणास 
खणल्या वाचून ॥

मागता मिळते 
शोधता दिसते 
स्वये हरविता
काही सापडते ॥

सांगतो संताचे 
काही न मनीचे
जैसे मी पाहीले
बोल हे कृपेचे॥

विक्रांत रमला 
कष्टात हासला
सुख आकळून
सांगतो सकळा॥

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

ध्वनी

ध्वनी
*****

सोहमचा ध्वनी 
आत उमटता 
वृतीला पडता 
 दडा जेव्हा॥

तया त्या शून्यात 
उरतो एकांत 
पाहणारा आत 
लीन होतो ॥

शब्दांविण शब्द 
मनाला धरून 
जाय उतरून 
मनापार ॥

तेथे तो बहिरा 
होत असे खरा 
मातृकांच्या परा 
जाऊ शके ॥

विक्रांता सहज 
असतो कठीण 
माय बापाविण 
जन्म असा ॥

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com
++++++

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

एकाकार वृति

एकाकार वृती
**********
एकाकार वृत्ती 
असो लक्ष्यावर 
जगाचा विसर 
पडो मग ॥

एकच ते ध्यान 
घडावे स्मरण 
एकच रे गाणं 
मनी वाजो॥

जया हवे जे ते
मिळते रे खास 
म्हणूनिया ध्यास 
सोडू नको ॥

तिथे राही स्वस्थ
हालचाली विन 
भासता कंपन
सांडूनिया ॥

माझे ते मीपण 
येवो अंकुरून
घडे ते घडणं 
घडू द्यावे ॥

विक्रांत रमला 
एकांती बसला 
तरंग मिटला 
पाणियाचा ॥

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

झुम मिटींग


झूम मीटिंग 
*****
भले मोठे ओझे जणू 
घेउनिया पाठीवर 
जेव्हा येतो साहेब तो
झूमच्या  मीटिंगवर 

आम्ही आपले श्रोतेच 
हु की चू बोलत नाही 
बोलता छडी मिळते 
जाणूनिया असू काही 

तसा तर माईक ही 
आपला बंद असतो 
कॅमेरात चेहराही 
कोणी पाहत नसतो 

बोलणारे फक्त चार
चर्चेस वाव नसतो 
हुकुमाचे ताबेदार 
खरंच होयबा असतो 

पण ते बोलती छान 
अधिकारी शब्द ज्ञान 
आम्ही होतं कृतकृत्य 
हलवितो फक्त मान 

वर काय चालले ते 
नीट जरा कळू येते 
नोकरी सांभाळण्याचे 
कसब अंगी बाणते 

एक या झुमचे पण 
खरंच बरे असते 
पुच्छ हलवत उगा
नच पळावे  लागते 
*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

कल्पद्रुमा

कल्पद्रुमा
***
मज दत्तराया 
छळते ही काया
जन्म जाई वाया 
तुजविन ॥

जैसे रक्षिलेस 
मच्छिंद्र गोरक्षा
तैसा मज रक्षा
भगवंता ॥

जैसे प्रेम दिले 
जालिंदर कानिफा
तैसे प्रेमे पहा 
दयाघना ॥

कैसे है जगणे 
कैसे ही मरणे 
वावुगे फिरणे 
जन्मातून ॥

येऊनिया नाथ 
करा हो सनाथ
पाही दिनरात 
वाट तुझी ॥

विक्रांत दत्ताचा 
म्हणवितो साचा 
सार्थ करी वाचा 
कल्पद्रुमा ॥

******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

खुण

खुण.
****
मंद चाफ्याचा सुगंध 
तनामनाला व्यापतो 
दत्त गिरनारी मज 
प्रेमे मिठीमध्ये घेतो ॥

व्यापे आकाश धरती 
कण कणात भिनतो 
मज दावुनिया खुणा 
वर चढण्या सांगतो ॥

दत्ते स्वीकारले मला 
खूण पटली मनाला 
मनी आनंद कल्लोळ 
माय कृष्णाई डोळ्याला ॥

सरो बंधने उरली 
ठेवी ठेवी रे पदाला 
वदे विक्रांत कृपाळा 
करी निसंग मजला ॥

****
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com
***

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

दत्ताचे घर

दत्ताचे घर!
**********
माझिया दत्ताचे 
घर किती न्यारें
चंद्र सूर्य तारे 
छपराला ॥
माझिया दत्ताचे 
दार किती न्यारे 
जगताचे वारे 
वाहे त्यात ॥
माझिया दत्ताचे 
अंगण विश्वाचे 
आकाशगंगेचे 
विलक्षण ॥
माझिया दत्ताच्या
 गूढ माळ्यावर 
अद्भूत विवर
कृष्णमेघी ॥
 माझेया दत्ताच्या 
रंग तो भिंतीचा 
नित्य नाविन्याचा
 क्षणोक्षणी ॥
 दत्ताच्या घरात 
दत्ताला शोधत 
राहतो फिरत 
तरीसुद्धा ॥

*****
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

पळस

पळस
*****
भर उन्हाळ्यात 
रणरणत्या उन्हात 
जात असता 
उजाड  रानावनातून
अचानक
 त्या तपकिरी सुकलेल्या 
हिरवट पिवळट झाडीमध्ये 
दिसतो उठून..
पळस !
अरण्यातील संन्याशागत 
स्थिरपणे उभा स्तब्ध
जणू साधनामस्त 
आपल्यातच मग्न 
अंगावरील काट्याचे 
जीवनातील ओरखड्यांचे 
हरवून भान 
लावून ध्यान 
प्रखर उन्हात 
जणू तळपत 
तपस्येच्या तेजानं 
सारे आसमंत 
विखुरल्या पानांचे 
निष्पर्ण देहाचे 
हरलेल्या लढ्याचे 
असते अगतिक मूक मलुल
सारे काही हरवून 
सारे काही टाकून .
पण ताठ मानेने उंचचउंच 
कणाकणावर अस्तित्वाचा 
ठसा उमटवून 
आहे नाही ची खंत सोडून 
उभा असतो पळस . . .
त्याला पाहता वाटते क्षणभर 
असेच व्हावे आपण 
अन मग धमण्यातून वाहणारे 
माझे रक्त कण
होतात पळसाचे कण 
पळस अचानक 
व्यापून टाकतो 
माझे तन मन 
आणि खरोखर 
मी जातो पळस होऊन . .
माझे मीपण विसरून 
जमिनीवर ठेवलेले पाय 
जातात खोलवर 
जीवनाच्या पाहिल्या हुंकारापर्यंत
आकाशात  उंचावले हात 
हरवतात अनंत काळात 
स्वत:त हरवणा-या प्रश्नागत 
अन देहावर उमलतात फुले
प्रार्थना होवून 
माझ्याही नकळत .!!
*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

कापुराची माया

कापुराची माया
************
कापुराची माया 
आगीला कळावी
समरस व्हावी
मिठी मग ॥

तैसी घडो भेटी 
देवा तुझी माझी
हौस नसण्याची 
पुरवावी ॥

मिठाची बाहुली 
भेटावी सागरा 
भेदाचा पसारा 
नुरुनिया ॥

तैसे घडो काही 
जिवलगा नेई
आणुनिया पाही
 प्राण डोळा ॥

सरो देह भाव
जळो मन राव 
निरंजनी ठाव 
देई मज ॥

विक्रांत दत्ताचा 
दास हा जन्माचा 
तयाचा प्रेमाचा 
ध्यास धरी ॥
*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

प्रतिबिंबी

प्रतिबिंबी
********
अप्राप्य त्या आकाशाचे 
स्वप्न मनी पाहतांना 
अन्  बहर सांडला 
पुन्हा पुन्हा मोजताना ॥

मीही झालो कवी काही
शब्द ओझे वाहणारा 
याद तुझी ओरखडा 
खोल आत जपणारा ॥

अर्थहीन आश्वासने 
कधी दिली न घेतली 
पण रित्या ओंजळीत 
गाणी कितीक सजली ॥

विसरली पावुले ती 
वाट आडवळणाची
विरहात सरोवर 
वाट पाहे कमळाची ॥

अजुनीही ओल आहे 
बिंब ऊरी धरण्याची 
घेऊनी याद दाहक
प्रतिबिंबी मरण्याची ॥

यार विक्रांत लाभले 
तुज क्षण हे भारले
देही टिपूर चांदणे 
धुंद आहे सांडलेले ॥

हे ही काही कमी नाही 
गीत कुण्या ओठावरी 
मांडतात स्वरवेली 
नक्षी तीच जरतारी ॥
*******
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंत्रचळ

मंत्रचळ
******

देव मारतो ना कुणा 
देव तारतो ना कुणा 
तरी तोच मंत्र जुना
म्हणतो मी पुन्हा पुन्हा ॥
देव आधार मनाला 
देव सावुली तनाला 
घडो घडणारे पुढे 
आज दिलासा जीवाला ॥
देव संकटी धावतो 
भक्ता आधारही देतो 
मोडी नियम आपले 
कधी असाही दिसतो ॥
परी हवे रे तेवढे
प्रेम उरात भरले 
जीव ओवाळून सारे 
देवा आयुष्यची दिले  ॥
मंत्र ओठातला माझा 
चालो तोवरी दयाळा 
लागो मंत्रचळ तुला 
व्हावा विक्रांत मोकळा ॥
*****
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...