रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

उपेक्षा

उपेक्षा 
****
उपेक्षा फुलांनी 
भरले आभाळ 
पाडण्याचा आळ
स्वतःवरी ॥

काही जीवनाची 
असे चूकभूल 
प्रारब्धाची चूल 
पेटलेली ॥

विझल्या दिव्याचे 
ओझे हातावरी 
पाय काट्यावरी 
तोललेले ॥

केली विनवणी 
व्हावी बोळवण 
परंतु जीवन 
ताठ मानी ॥

नकोशा हाकांचे 
शब्द कानावरी 
जाणीव बहिरी 
होतं नाही ॥

अनंत काळाचा 
सुळका नभात 
गीत गौरवात 
नटलेला ॥

येती जाती किती 
गवताची पाती 
कुणास गणिती 
नाही कुठे ॥

विक्रांत मनाचे 
ओढाळ पाखरू 
घेतेच पांघरु 
नभ तरी ॥
*******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...