शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

प्रतिबिंबी

प्रतिबिंबी
********
अप्राप्य त्या आकाशाचे 
स्वप्न मनी पाहतांना 
अन्  बहर सांडला 
पुन्हा पुन्हा मोजताना ॥

मीही झालो कवी काही
शब्द ओझे वाहणारा 
याद तुझी ओरखडा 
खोल आत जपणारा ॥

अर्थहीन आश्वासने 
कधी दिली न घेतली 
पण रित्या ओंजळीत 
गाणी कितीक सजली ॥

विसरली पावुले ती 
वाट आडवळणाची
विरहात सरोवर 
वाट पाहे कमळाची ॥

अजुनीही ओल आहे 
बिंब ऊरी धरण्याची 
घेऊनी याद दाहक
प्रतिबिंबी मरण्याची ॥

यार विक्रांत लाभले 
तुज क्षण हे भारले
देही टिपूर चांदणे 
धुंद आहे सांडलेले ॥

हे ही काही कमी नाही 
गीत कुण्या ओठावरी 
मांडतात स्वरवेली 
नक्षी तीच जरतारी ॥
*******
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोभ

लोभ ****** फुटली उकळी  गाणे आले गळा  प्रेमे उजळला  गाभारा हा ॥ १ शब्द सुमनांनी  भरले ताटवे भ्रमराचे थवे  भावरूपी ॥ २ पसरला धूप  ...