मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

देशमुख सिस्टर (श्रद्धांजली)

देशमुख सिस्टर(श्रद्धांजली)
*************
आत्ताच कळले 
देशमुख सिस्टर गेल्या .
देशमुख सिस्टर रिटायर होवून 
चार पाच वर्ष उलटली असतील
मी पाहिले होते तेव्हा 
त्यांचे कडक करारी भक्कम 
व्यक्तिमत्व पाहून 
असे काय होईल असे वाटले नव्हते .
देशमुख सिस्टर होत्या 
कर्तव्यकठोर शिस्तप्रिय 
पण त्यांच्या कृतीत असायचे
कामावरील प्रेम अन
त्यांच्या शब्दातून जाणवायचे 
त्यांचे निर्मळ मन 
बोलतांना व्यक्त व्हायचे 
जीवलग अन प्रियजनावर 
असलेले अपार प्रेम 
त्यांचे बोल असायचे खणखणीत 
कोणाचीही मुलाहिजा ना बाळगत 
यायचे वातावरण भेदीत 
त्या सहजच एकेरीत हाका मारीत 
आई सारखा दम देत 
त्यांना टाळणे 
भल्या भल्या कामचोरांना 
नसे जमत 
त्यांना नाही कसे म्हणावे
कोणालाच नसे कळत.

सावळासा रंग 
शुभ्र पांढरे केस 
कपाळावरील ठसठशीत कुंकू 
गळ्यातील मंगळसूत्र 
सरळ नाक 
करारी चेहरा 
लाल पट्ट्यातील देशमुख सिस्टर
 वावरायच्या अपघात विभागात
तेव्हा वाटायचे 
खरेच या देशमुखीच करीत आहेत .
त्यांचे हसणे बोलणे 
असायचे एकदम मोकळे 
माळावरील आकाशासारखे 
एकदम अकृत्रिम 
गावाचा स्पर्श असलेले .
असे वाटायचे 
त्यांनी सारे जग जाणले असावे 
त्यांना कोणी फसवू शकणार नाही 
कोणी गैरफायदा घेऊ शकणार नाही .
असे एक भारदस्त स्पष्ट
कडकडीत खणखणीत व्यक्तिमत्व 
आपल्यातून निघून गेले आहे .
जरी त्यांना खूप वर्षे भेटलो नसलो 
तरी त्यांचा आवाज कानात घुमत आहे
अन त्यांचे जाणे 
मनाला खिन्न करीत आहे  .

डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...