सौंदर्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सौंदर्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

चांदरात







आठवतो मला
विजेचा स्पर्श न झालेला माझा गाव
अन सारे गाव कुशीत घेवून
बसलेले ते अद्भूत चांदणे .
मातीच्या घरावर
ठेंगण्या झोपड्यावर
बाभळीच्या झाडावर
पांढऱ्या गोल देवळाच्या घुमुटावर
पसरलेले ते सृष्टीचे लावण्य.
गडद गूढ विस्तीर्ण आकाशातील
सदानकदा जाणवणारे
सार्वभौम सम्राटा सारखे
झगझगते चंद्राचे अस्तित्व
अन मग देवीच्या दीपमाळेवर पेटलेला
तो लाल पिवळा अग्नीशलाकांचा  
धगधगता कुंड
जाणवायचा त्यात आदिमायेचा
आश्वासक प्रेमळ
एक धीर देणारा स्पर्श ..
कितीवेळ मग अंगणात
निजेने डोळे मिटेपर्यंत
पाहायचो मी तो
चंद्र अन मेघांचा खेळ
थंडगार गोधडीवर निजून
मन विरघळायचे त्या किरणात
एक सुखाचा आनंदाचा कण होवून
अन मिटायचे डोळे
पण तृप्तीने की अतृप्तीने
कुणास ठावूक

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, ५ जानेवारी, २०१५

गूढ डोहात







पुन्हा डोकावले
गूढ डोहात  
पुन्हा पाहिले  
त्या अंधारात

थोडे पाणी
हलले फिरले  
मीच मजला
पुनरपि दिसले 
    
अन सावल्या
मनातल्या  
मनास मग 
हळूच कळल्या

पान कोवळे  
कुणी तोडले  
अलगद आले  
दुख प्यायले

तरीही ओठी  
हासू सजले   
काय भेटले  
काय हरवले


खळखळ ना  
कलकल केले  
तरीही पाणी
वाहून गेले


पाहण्याचे त्या 
गाणे झाले  
जल कणकण
मग मोहरले

अजुनी अर्धे  
प्रकाश प्राशिले 
मन तृषार्थ  
ओठ थिजले  


विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, ११ मे, २०१३

मराठमोळी






साधी भोळी मराठमोळी
रेखीव चेहरा काळी सावळी
कुंकूम रेखा उंच कपाळी
खाली गोंदण हिरव शेवाळी
गळ्यात एकच पोथ काळी
किंचित विटकी जांभळी चोळी
जुनेर लुगडे जोड लावली
जुळी जोडवी उघड्या पावली
कुठे लाल हिरवी पिवळी
कंकण होती हाती भरली
आणि होती तेजाळलेली
चंद्रभागा निर्मळ डोळी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...