रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

रिकामा देव्हारामाझ्या ओवळ्या मनात
एक देव्हारा चंदनी
फुले तगर कण्हेरी
गंध स्वर्गीय सुमनी

माझा रिकामा देव्हारा
सोहं दुमदुमे ध्वनी
दिवा जळतो सतत
कुणी पहिल्या वाचुनी

तिथे शब्दांचा पसारा
पूजा बसते रुसुनी
भाव उमटतो नवा
साऱ्या शब्दांस सारुनी  

तिथे तटस्थ जाणीव
साऱ्या जगा विसरुनी
गीत प्राणात ओसंडे
माझे अवघे सांडूनी

पाहे विक्रांत देवास
देव कुठेही नसूनी  
पाहू म्हणता म्हणता
गेले पाहणे वाहुनी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

चांदरातआठवतो मला
विजेचा स्पर्श न झालेला माझा गाव
अन सारे गाव कुशीत घेवून
बसलेले ते अद्भूत चांदणे .
मातीच्या घरावर
ठेंगण्या झोपड्यावर
बाभळीच्या झाडावर
पांढऱ्या गोल देवळाच्या घुमुटावर
पसरलेले ते सृष्टीचे लावण्य.
गडद गूढ विस्तीर्ण आकाशातील
सदानकदा जाणवणारे
सार्वभौम सम्राटा सारखे
झगझगते चंद्राचे अस्तित्व
अन मग देवीच्या दीपमाळेवर पेटलेला
तो लाल पिवळा अग्नीशलाकांचा  
धगधगता कुंड
जाणवायचा त्यात आदिमायेचा
आश्वासक प्रेमळ
एक धीर देणारा स्पर्श ..
कितीवेळ मग अंगणात
निजेने डोळे मिटेपर्यंत
पाहायचो मी तो
चंद्र अन मेघांचा खेळ
थंडगार गोधडीवर निजून
मन विरघळायचे त्या किरणात
एक सुखाचा आनंदाचा कण होवून
अन मिटायचे डोळे
पण तृप्तीने की अतृप्तीने
कुणास ठावूक

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

|| श्री गणेश ||
गणेश

 आदीमायेच्या लेकरा
रूप कुंजर सुंदरा
मुळारंभ श्री ओंकारा
माझे नमन स्वीकारा

चौदा विद्येचा तू स्वामी
नित्य चित्त सत्यगामी
शुद्ध भक्तीची तू भूमी
सदा संत भक्तकामी

गण नायक गणेशा
पुण्य पावक परेशा
सदा रक्षसी सुरेशा 
विघ्न नाशक विरेशा

देवा विशाल उदरा
नित्य कृपेच्या सागरा
सत्व जीवनात भरा
दूर दवडा अंधारा

रूपा वंदितो सतत
गुणा रहातो स्मरत
आता उजळो मनात
तुझ्या कृपेची पहाट

कृष्णपिंगाक्ष कृपाळा
विघ्ननाशक विशाळा
देई भक्तीचा जिव्हाळा
सदा ठेवी चरणाला

देवे आश्रय दिधला 
घोर संकटी धावला
जन्म ऋणाइत झाला
सुख विक्रांत पातला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

पाउस म्हणतो

पाउस म्हणतो *********** वारा म्हणतो अडेल मी  पाणी म्हणते पडेल मी  या मातीच्या कणाकणातील  बीज म्हणते रुजेल मी ॥१ तळे म्हणते भरेल ...