गुरुवार, ३१ जुलै, २०१४

नदीची आसरा


गाव नदीची आसरा
काळा डोह सांभाळते
पोर बुडुनीया मरे
पूजा जोरात चालते
  
मेल्या पोराच्या आईचे
दु:ख डोहात जिरते
काळ्या उदास डोहाचे
भय सांजेला डसते 
कुणी ऐकतो रातीला
गाणी अवेळी कातर
चाळ छुमछुमणारे
नदी किनारी वावर
छाया दिसते कुणाला
म्लान उदास बैसली
वाऱ्यावरती हलती
काळ्या ढगांची सावली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/बुधवार, ३० जुलै, २०१४

तुझे स्वप्न जेव्हा दिसे


तुझे स्वप्न
जेव्हा दिसे
माझे दु:ख
मला हसे

तुझा मोह
रात्रंदिनी
पावुलात
बेड्या दोन्ही

कसे मना
समजावू
कसे किती
दूर ठेवू

हरविले
सुख माझे
तया दिसे
रूप तुझे

तुटू द्यावे
तुटू नये
जुळू द्यावे  
जुळू नये 

सुख दु:खी
हिंदकळे
अजूनही
वेडे खुळे


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २९ जुलै, २०१४

देहाधारी जीवा
देहाधारी जीवा
देहाचीच ओढ
आसक्तीच गोड
सर्वव्यापी |
स्वयंभू खुंटाची  
मुळे पाताळात
व्यर्थ यातायात
खेचण्याची |
अस्तित्वाच्या गळी
जाणिवेची दोरी
देखणी सोयरी
गाठ घट्ट |
पानोपानी गर्द
दाटले जीवन
तरी देहाधीन
सळसळ |
जैसे आहे तैसे
पाहतो डोळ्याने
वाहते जगणे
पाण्यावरी |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
निरोप

निरोप ****** धुणीचा निरोप समिधास आला  वन्ही धडाडला आकाशात ॥१ वाजे पडघम तुतारी सनई  मिलनाची घाई बहू झाली ॥२ उधळली फुले रांग तोरणा...