मंगळवार, ३० जुलै, २०१३

रानच्या वाटेनी



झुळझुळ झरा

मंजुळ सुरांनी

गातो मोकळी

निसर्ग गाणी 


सुंदर पाखरे

गुंजन करुनी

अनोखे राग

देती उधळूनी 


पाऊल वाटांना

रान वेलींनी

केल्या सजुनी

फुलांच्या कमानी 


कुठल्या वारुळा

जाता जवळुनी

गेले चैतन्य

वेगे सळसळूनी


रानच्या वाटेनी

नजर भारुनी

हिरवी होवुनी

गेली निवूनी |


विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/




सोमवार, २९ जुलै, २०१३

तुझीच मिठी




पुनवेच्या राती

सागरा भरती

ओठावर दाटली

उधान मस्ती |

रोमरोमी माझ्या

ओसंडे प्रीती

व्याकूळ काया

तुझ्याच साठी |

चांद भारल्या

सागरा काठी

दाटावी माझ्यात

तुझीच मिठी |

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २८ जुलै, २०१३

म्हाताऱ्याच्या डेडबॉडी जवळ



साठ वर्ष
म्हातारा म्हातारी
संसार करत होते 
खेड्यातील घरामध्ये
दोघेच राहत होते .
एकदा म्हातारा
खूप आजारी पडला
अचानक एका रात्री
मरुन गेला
घरात एकटी म्हातारी
कडी लावून बाहेर पडली
दूरवर शेजारी
आमच्या घरी आली
आणि म्हणाली
सांगायाला बर वाटत नाही,
पण मला फार
भीती वाटू लागली !
म्हातारा तर गेला
वाटले ,
मला घेवून गेला तर ?
आणि जर पुन्हा उठला
तो तोच नसला तर ?
जिता होता तोवर
कधी काही वाटले नाही
आजारपण काढले त्याचे
कमी केले नाही
पण गेल्यावर तो
आपला वाटत नाही .
भीतीने मन,
थिजून गेले बाई
तिच्या डोळ्यातून 
अश्रू वाहत होते
ते दु:खाचे होते का
भीतीच्या लाजेचे
मला कळलेच नाही .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २५ जुलै, २०१३

स्वप्न मी पाहावे


स्वप्न मी पाहावे
ते नित्य का तुटावे
का उरात स्वप्नाचे
ओझे मी वाहावे |

सूर मी छेडावे
का अधुरेच राहावे
का कंपन हृदयातील
हृदयातच विरावे |

मी लक्षदा झुरावे
प्राण डोळी एकटावे
तिने जमीन निरखीत
तसेच निघून जावे |

या प्रीतीसी भुलावे
मी कितीदा ठरवावे
येताच ती सामोरी
पुन: वादळ का उठावे |

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २३ जुलै, २०१३

पावसात चालतांना




थोडे चालावे थोडे भिजावे
पावसाचे शिंतोडे अंगावर घ्यावे
थोडे शहारावे थोडे थरथरावे
पाण्याचे पागोळे अलगद झेलावे
थोडे थांबावे थोडे जाणावे
वाहत्या पाण्याचे संगीत ऐकावे
पाण्यात जावे पाय ओलवावे
निवळता ढग किरणात हर्षावे
फुलांना वेचावे तृण कुरवाळावे
रंगात हरवून मनमुक्त गावे
भिजल्या अंगाने गारव्यास भेटावे
उडवत पायाने पाण्याशी खेळावे
डोळे मिटावे काळ विसरावे
हरवले जगणे मिळते का पाहावे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळ्यामधले  स्वप्ना  लंघुनी स्वप्न उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  चांदण्याचे तोरण झाले ॥२ कणा...