सोमवार, २७ जून, २०१६

बातम्या..

वार्ता असतात साऱ्या
व्यर्थ कुटाळाच्या बाता
चांग क्वचित तयात
बाकी गाढवाच्या लाथा

कुणी देऊनिया दाम
बातमी हवी ती छापे
कुणी उकरून मढे
मेद सडलेले ओपे

कधी फुटती बातम्या
कधी फाटती बातम्या
वाट लावाया कुणाची
कधी बनती बातम्या

बातमी असते मस्त
चटका मसाले दार
लक्ष्य वेधावया जना
आणि खपाया पेपर

खरे इवले टाकून
बने गोलमाल गोळा
शब्द वाकवून अर्थ
नवा तयार केलेला

धंदा चालला कुणाचा
मेंदू पडला गहाण
काल वाचलेले हेच
जसे फेकलेले शेण

पत्र विकायला हवे
चॅनल चालाया आणी
निंदा नालस्ती स्तुतीनी
जन घ्यायचे ओढूनी

किती मळला आरसा
भान दावणाऱ्या नाही
सत्य निष्ठेचा विचार
खिसा भरणाऱ्या नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
रविवार, २६ जून, २०१६

माय मैनावती

माझी माय मैनावती 

डोळे उघडी सतत

देह भावाचे गणित

आहे ओखटे सांगतमाय रडते दु:खाने

आसू डोईवरी पडे

मन गोपीचंद माझे

जागे होई थोडे थोडेकुठे भेटेल तो सखा

चंड जालिंदर जसा

घेई अपराध पोटी

देई नाथमुद्री ठसाकाय आत मी पुरला

दिवा जाणीवेचा भला

बंधू कानिफा जिव्हाळा

कधी तारील रे मलाकळो अलक्षी गुंतली

योगी जीवनाची कला

फाटो पदर मायेचा

मरो विक्रांत थोरलाडॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, २५ जून, २०१६

फुलपाखरू....
आज असेच कुठेतरी  
फुलपाखरू शब्द हे दिसले
अन सहज आठवले
न जाणे किती दिवस गेले
मला या शहरात
फुलपाखरे दिसलीच नाहीत

मी लहानपणी पाहिलेली  
ओंजळीत अलगद धरून
पुन्हा सोडून दिलेली
पिवळी पिवळी इवली इवली
बोटांना गुदगुल्या करणारी
कधी पंखावर छोटा मोठा
गोलसा डोळा असलेली
हिरवी तांबडी सफेद निळी
कधी मोठाली अगदी काळी
अदभूत नक्षी कोरलेली
तरीही नाजूक रेशीम
देह मखमली ल्यालेली ..

आता या शहरात दिसत आहेत
जमीनी गिळणारे बिल्डर
वृक्ष पाडणारे सरकारी नोकर
क्रिडांगणे आणि उद्याने
हडपणारे राजकारणी
आकाश गिळणारे धनी
लोंढा भरभरून येणारी
रस्ते किनारे खाड्या बुजावणारी
अगतिक माणसांची रहदारी
हवेपणाच्या आकांक्षेचा
राक्षस झालेली  
बुभुक्षित खानेसुमारी

इथे फुलपाखरांनी काय करावे
बसायला फुल नाही
नाचायला पान  नाही
पिलांना जागा नाही
कोशास आडोसा नाही
जणू या शहरास मुळी
फुलपाखरांची पर्वाच नाही

शहर मग्न आहे
पैशाच्या खणखणाटात  
गाड्यांच्या धडधडाडात
प्रकाशाच्या चकाकात
असंख्य सुंदर क्षणांचे
नाजूक फडफडते तुकडे 
कायमचे हरवून  
यांत्रिकता पांघरून
 
अन आजकाल तर मला
कुणाच्याही मनात
फुलपाखरे दिसत नाही
ती रंगबिरंगी भिरभिरती
क्षण झुळूकात नर्तन करती
रंग बदलती विभ्रम करती
स्मृती गंधात हरवून गेली
स्वप्न बावरी छान छकुली

जीवन जणू की झाले आहे 
मठ्ठपणात अर्थ हरवले
तारीख बदलत पुढे जाणारे
फुगणाऱ्या पगार आकड्यास
सारे सार्थक मानणारे
मूढ सुखाच्या आभासात
खरेखुरे सौख्य गमावले  

अन फुलपाखरू वाटू लागले
प्रतिक एक सजलेले
जीवनाच्या संवेदनशीलतेचे
जागेपणाचे सार्थकतेचे
भान आपल्या असलेपणाचे !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

लायक

लायक ****** नच का लायक तुझ्या मी पदाला  सांगावे मजला दत्तात्रेया ॥१ अजुनी आत का भाव न जागला  भेटी न मजला म्हणुनी ती ॥२ उघडे सताड...