माझ्या मनात पाऊस
लाख प्रतिमा नटून
कुणा म्हणावे
देखणा
थेंब बसले सजून
ओढ कालच्या
पाण्याची
गेली ओघळून दूर
ओल हातात अजून
अन हृदयी काहूर
जातो भिजून सजून
एक नितळ चेहरा
शाळा सुटता सुटता
थेंब होवून दुखरा
ऋतू चारच दिसाचा
मग चटके मनाला
जग पेटले तरीही
पाणी खोल
विहिरीला
एक गाणे पावसाळी
चिरतरुण अजून
मेघ येतात दाटून
त्याच नावाने
स्मरून
गाठ कुठल्या
सरीची
कुण्या रानात
घडते
सय सपकून आत
मन हिरवळ होते
मेघ भरलेले काळे
मोठ्या डोळ्यात
सांडले
माझे दर्पण लाघवी
आता आकाश
जाहले
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा