सोमवार, २९ जून, २०२०

माती



माती
***********
मातीतून जन्म
मातीत मरण
देहाचे सुमन
कौतुकाला ॥

मातीचं सजते
मातीचं धजते
मातीचं हसते
फुलातून ॥

माती महामाय
सृजना आधार
जीवना आकार
देत असे ॥

मातीची पणती
मातीची घागर
मातीचे आकार
लक्ष कोटी ॥

अनंत आकारी
तोच कणकण
असतो व्यापून
सर्वाठाई ॥

सजीव-निर्जीव
मातीच केवळ
श्रीदत्त प्रेमळ
दावी मज॥

आणि या मातीत
असते खेळत
चैतन्य अद्भूत
सर्वकाळ ॥

मातीला पाहता
विरक्ती दाटला
भाव देहातला
मावळला ॥

मातीचा विक्रांत
नमितो मातीला
लावितो भाळाला
नम्रतेने ॥

घडविले माय
म्हणून मी झालो
चैत्यन्यी नांदलो
दत्ताचिया ॥
*****
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने.
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...