रविवार, ७ जून, २०२०

कळत नाही

कळत नाही
*************,
मला कधीच माणसे
ओळखता येत नाही 
लालबुंद छान फळे 
विषारी कळत नाही ॥

एक गुण दिसताच 
गुणसागर वाटतो 
संधिसाधू जरी तो ती
आपले त्यास मानतो ॥

काय करू भोळेपणी
जगात फसला जातो 
फाटता बुरखे त्यांचे 
मीच मनी खंतावतो ॥ 

भ्रष्टाचारी गोडबोले 
कधीच कळत नाही 
कामसुपणा त्यांचा तो
भुरळ घालत राही ॥

काम चोर नमस्कारी
नम्र छान वाटतात 
हो म्हणून तोंडावर 
जणू गायब होतात ॥

नको असे बहुतेका 
काम इथले करणे 
पगाराचे चक्र हवे 
सदैव चालू राहणे ॥

माझे काम तुझे काम 
माणुसकीही लाजते 
तोंडाच्या पट्ट्या पुढती 
लाचार प्रजा नमते ॥

खरेच वाटत नाही 
अश्या व्यक्ति असतात 
करूणेच्या नदीला या 
कसे नक्र ग्रासतात ॥

खरेच कळत नाही 
माणसे वळत नाही 
माणूसकीची प्रतिक्षा 
पण माझी जात नाही॥

दलदलीत कमळे 
चार पवित्र असती 
तयामुळे तलावाची 
संगत नच सुटती॥ 

म्हणतो विक्रांत तुला 
रे इथेच थांबायचे 
चावतील किडे मुंग्या 
परि  तळे राखायचे ॥
******:
"©" डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने.
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...