सोमवार, ३१ मार्च, २०१४

उंबरठ्यापाशी





घरासाठी पोरासाठी
मनामध्ये कुढू नको
आकाशाशी नाते तुझे
पंख घट्ट मिटू नको

कश्यामुळे कश्यासाठी
तुटुनिया गेल्या गाठी
जुळूनिया जुळती ना
लागू नको तयापाठी

जमविली काडी काडी
मन थोडे रडणार
उंबरठ्याशी पावुले 
उगा थोडे अडणार 

तुझे जिणे तुझे गाणे
जिंदगानी एकवार
मातीमध्ये पोताऱ्याच्या  
कितीकाळ सडणार

मरुनिया जाता नाते  
प्राण भरणार नाही
प्रेत होवूनिया मनी
म्हण जगणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


मित्राला श्रध्दांजली





डॉ तुषार मोरे ,
एक सिग्नल चुकला असता
वा एक सिग्नल लागला असता
तर कदाचित तू वाचला असता 
अथवा
जर कदाचित
तू तो रस्ता धरला नसता
वा त्या ट्रीपला निघाला नसता
तर अपघात झाला नसता
असे आम्हाला उगाच वाटते
खरतर घडल्यावर घटना
जरतरला मोल नसते
जीवन काय आणि मृत्यू काय
सारीच इथे अपघातांनची
अटळ मालिका असते 
गुलाबांच्या पाकळ्यातील 
सुगंधात  
दलदलीतील कचऱ्याच्या 
दुर्गंधात
जीवनाचे चक्र फिरत राहते  
पण टपोरे जीवनरसाने असे 
काठोकाठ भरलेले फुल
जेव्हा अकाली गळून पडते
कुठल्यातरी आघाताने ,अपघाताने
तेव्हा मन हळहळते .
अन न भरणारा व्रण घेवून
झाड जगत राहते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, २९ मार्च, २०१४

आसारामी आश्रमात ....प्रकाशा .(नर्मदाकाठच्या कविता )


आधार तुटला होता
छत्रही मोडले होते
ते ब्रह्मचारी आश्रमी
तरी साधनेत होते

अंध असे ही निष्ठा वा   
निरुपाय काहीतरी
विचाराया गेलो तर
मौनी होती मग्न सारी

अवाढव्य आश्रमात
हॉल कोठी गुरे शेती   
आवक सुरळीत नी
सुरक्षित साधनादी

परतीचे दोर किंवा
तुटुनिया गेले होते
सोडताच मठ आता
स्वत्व हरवणे होते
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २६ मार्च, २०१४

गोरा गोरा रंग तुझा




गोरा गोरा रंग तुझा
उन्हामध्ये जाळू नको
उगाचच राणी अशी
रानोमाळी हिंडू नको

अनवाणी पाय तुझे
तापलेल्या भूमीवरी
पाहुनिया बसतात
चटकेच माझ्या उरी

फुलूनिया आले झाड
मोहरांनी गंध धुंद
झाडाखाली थांब जरा
विझू दे ग सारे अंग

जरा जरा वारा घे ग
अंगावरी पदरानी
तापलेले श्वास तुझे
निवो मंद झुळुकांनी

काय तुला सांगू आणि
काय करू कळेनाचि
तुझ्यासाठी करतो मी   
पायवाट काळजाची
  
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, २५ मार्च, २०१४

क्रुसावरती बाप आमचा





क्रुसावरती बाप आमचा
कधी मेलाच नाही
क्रुसावरूनी बाप कधी
खाली उतरलाच नाही
आकाशातील देवही त्याला
उतरवू शकले नाही
आम्हीही कधी त्याला
खाली बोलाविले नाही
क्रुसावरती बाप आमचा
झेलतो आमच्या वेदना
सुखी ठेवा पुत्रांना
करतो आम्हीही प्रार्थना
तो खाली उतरला तर
आमचे काही खरे नाही
पापांना लपवायला
मग दुसरी जागा नाही
रोज सकाळी उठल्यावर
खात्री करतो झोपतांना
क्रूसावरील बाप आमचा
क्रुसावरती आहे ना !  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...