गोरक्षनाथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोरक्षनाथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १९ जुलै, २०२०

गोरक्षाची काठी

गोरक्षाची काठी
***************
गोरक्षाची काठी 
पडली डोक्यात 
टेंगूळ माथ्यात 
येऊनिया ॥

गोरक्षाची काठी 
पडे पेकाटात 
बसे बोंबलत 
आणिक मी ॥

बोंबललो असा
कानफाटा होत
जाऊन उलट
जीभ आत ॥

डोळे फिरवता 
श्वास अडकता 
पाठीत धपाटा 
पडला तो ॥

गोरक्ष धपाटा 
सुखाची उकळी 
पोटाच्या उखळी 
उतो येते ॥

उकळता नाद
दुमदुमे आत
आग नि पोटात
पेटतसे॥

असा हा  प्रवास 
पाहूनिया त्रास 
माऊलीचा श्वास 
ओलावला ॥

माऊली प्रेमाने 
भरविते घास 
सरतो सायास
भोगलेला ॥

गोरक्षाची काठी 
धरूनिया हाती 
उभारतो गुढी 
मग मीच ॥

विक्रांता गोरक्ष 
धावला पावला 
मस्तकी ठेविला 
कृपा कर ॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १७ मे, २०२०

ऐसा हा गोरक्ष




ऐसा हा गोरक्ष
************


मोहाच्या राज्यात 
मग्न आत्मदेव 
देई त्या आठव
स्वरूपाचा 

ऐसा हा गोरक्ष
करूणा कृपाळ
करतो सांभाळ
जिवलगा 

कुठून आलास 
कुठे ते जायचे 
कल्याण जगाचे 
करताना 

ऐसी जीव सेवा 
शिकवी जनास 
आपल्या शिष्यास 
सर्वकाळ 

सोनियाची वीट 
धरिता मनात 
सोन्याचा पर्वत 
दावितसे 

 
ठसावी निवृत्ती 
ठासून मनात 
करे यातायात 
म्हणूनिया 

सुटुनिया वीट 
घडवी दर्शन
सरे विस्मरण 
झालेले ते 

आणि मातीतून 
घडविले गुरु 
केला अंगीकारू
अवघ्यांचा

जात-पात वृत्ती 
देखिली न डोळा 
भक्तीचीया खेळा 
रंगविले 

दत्त जिवलग 
गोरक्ष प्रकट 
माझे ह्रदयात 
वास करो 

म्हणून विक्रांत
वदे काकुळती 
उतावीळ पंथी 
मिरावया .

**********
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

स्वानंद



स्वानंद

माझ्या मी पणात
प्रकाशाची ज्योत
राहते तेवत
स्वानंदाची ।।

मायेचे ओढाळ
मोहाचे वादळ
असून खळाळ
दुःखाचा ही ।।

तिला नसे वात
तेलाची वा साथ
तरी दिन रात
तेजाळली ।।

तिच्या प्रकाशात
जगण्याची वाट
राहते वाहत
अहो रात्र ।।

प्रभू गिरनारी
दावीयली युक्ती
स्थिरावली दृष्टी
अंतरात ।।

पाहता पाहणे
प्रकाश हे झाले
कुणी न उरले
पहावया

उसिटा विक्रांत
ठसा हा अस्पष्ट
श्रुतींच्या देशात
मौन झाला ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

मुक्ती

मुक्ति


डोईवर हात
ठेवूनिया मुक्त
कुणी काय होत
ध्यानी घे रे ॥


तुझे तुझे आहे
चावण्याचे अन्न
करणे पोषण
देहाचे या ॥


चालायचे दूर
आधी पायावर
उभा राही बरं
धडपणे ॥


नाथांचिया खुणा
घ्याव्यात जाणून
द्यावे ओवाळून
सारे काही ॥


विक्रांता कळले
शहर टाकले
क्षितीज दिसले
मनोहर ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

|| गोरक्ष विभूती ||






जन्मास येताच 
गुरु बांधी गाठी
गोरक्ष विभूती
महाश्रेष्ठ ||

गुरुसेवा तप 
करुनी निर्मळ
ज्ञानाचे केवळ 
रूप होय ||


वैराग्ये प्रखर 
कर्तव्य तत्पर
झाला गुरुवर 
उतराई ||

गुरूदेवासाठी 
राम हनुमान
बाजूला सारून 
ठेवियले ||


मोहाचा सागर 
विषय आगर
स्त्रीराज्य सुंदर 
ठोकरले ||


कनकाची माती 
मातीचे कनक
मच्छिंद्रा कौतुक 
दाखविले ||


दत्त मानसीचा 
जाहला चकोर
दृष्टी पदावर
अहर्निशी  ||


विक्रांत पोथीत 
बुडाला प्रेमाने
गोरक्ष तेजाने 
सुखावला  ||




डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, २३ मे, २०१६

श्री गोरक्षनाथ






मच्छिंद्रा लाभला गोरक्ष सुभट

लेइला मुकुट नाथपंथ ||

काय त्याचे रूप शिव तो प्रत्यक्ष

सदैव अलक्ष निरंजनि ||

शिष्य मच्छिंद्राचा गुरु गहीनीचा

भक्त श्री दत्ताचा अलौकिक ||

कैसे एक एक गोळा केले रत्न

फेडीयले ऋण जगताचे ||

शाबरी कवित्व ध्वनीशास्त्र थोर

तपाचे अपार पुण्य पाठी ||

गोरक्ष झोळीत हरेक साधन 

मोक्षाचे आंदण सकळांशी ||

विक्रांत नमितो शून्यात शिरुन

प्राणांची करून दिपज्योत ||



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/



घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...