शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

अध्यात्म संसार आणि विकार

अध्यात्म संसार आणि विकार
*****

प्रत्येक जीवन हे वरवर पाहता सरळ साधे शांतपणे वाहणारे पाणी वाटते . परंतु त्या पाण्याच्या पृष्ठभागाखाली खूप प्रवाह, वेगवेगळ्या गतीने वेगवेगळ्या रीतीने वाहत असतात. त्यांचे रंग वेगळे , त्यांची गती वेगळी , वळण ही वेगळी असतात आणि हे फक्त त्या पाण्याच्या प्रवाहालाच माहीत असते.

त्याप्रमाणे आपल्या  प्रत्येकाच्या जीवनात जीवनाचे वेगवेगळे प्रवाह असतात . वैवाहिक जीवन ,कौटुंबिक जीवन , अध्यात्मिक जीवन , व्यवहारी जीवन, तसेच वैचारिक , आकांक्षाचे , स्वप्न सृष्टीचे जीवन ही सारी  एकमेकांत गुंतलेली असतात. कधी त्यांच्याशी संघर्ष करत तर कधी समझोता करत आपण जगत असतो .

मुख्य म्हणजे हा संघर्ष टाळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सतत ध्यानात ठेवावी लागते, ती म्हणजे आपले जीवनाचे ध्येय काय आहे. आपल्याला जीवनात काय हवे आहे आणि त्यानुसार पुढील जीवनाची आपणच आपल्या आखणी करावी लागते .ज्याप्रमाणे दोन हलणाऱ्या दगडावर पाय ठेवून उभे राहता येत नाही त्याप्रमाणे आपल्याला दोन वेगवेगळे ध्येय ठेवता येत नाहीत . ध्येय ही मुख्यतः दोन प्रकारची असतात अध्यात्मिक आणि भौतिक .  कुठले  ध्येय असावे  हे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असते .जसे जीवाचे संस्कार असतात त्याप्रमाणे जीव वागत असतो .

अध्यात्मिक जीवन जगायचे आहे संसार ही थाटला आहे विकारांपासून अजून सुटका झालेली नाही तर मग काय करायचे ?
 हा प्रश्न पुष्कळदा पडतो विकार हे वाईट नसतात विकार हे जीवनाचा एक भाग आहेत व तो भागसुद्धा सुंदर आहे, त्यामुळे ते नाकारून ,ते लाथडून जीवन सुंदर होऊ शकत नाही , ते विकार समजून घ्यावेत आणि त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवत जगावे . विकारांना किती मोकळे सोडायचे आणि किती आवर घालून ठेवायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे . ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ज्ञानेश्वर महाराज  मितले हा शब्द वापरतात म्हणजे सारे काही मोजून , योग्य प्रमाणात  करणें ,भोगणे , अनुभवणे हा सुवर्ण मध्य ते सांगतात . तर तो सुवर्ण मध्य आपल्याला साधतो का ते पाहावे ते झाले की आपल्या अध्यात्मच्या मार्गावर चालणे सोपे जाते .

जीवनाचा आणखी एक प्रवाह आहे कर्तव्यपूर्तीचा जर आपण संसारात पडलो आहोत मुलं झाली आहे तर  ती मार्गाला लागेपर्यंत त्यांचे पालन पोषण करून त्यांचे शिक्षण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हे आपले कर्तव्य आहे , ते पार न पडता तर आपण फक्त आपला स्वतःचा किंवा अध्यात्माचा विचार करत राहिलो तर ते पाप कर्म ठरेल .

पतीधर्म म्हणजे काय तर पत्नीला सुखी समाधानी ठेवणे अर्थात ती एक स्वतंत्र व्यक्ती व प्रवृत्ती असल्यामुळे असे प्रत्येक वेळेला जमेलच असे नाही , कधी कुणाला आपल्या विचाराची, प्रकृतीची, वृत्तीची , आवड निवड सारखी असलेली पत्नी मिळतेही, आणि जीवन सहज सुंदर होते , पण  कधी कधी तसे होत नाही पण म्हणून तिच्यापासून काडीमोड करण्यात काहीच अर्थ नसतो . कारण अजून ती आपली  तरी संस्कृती झालेली नाही, त्या ठिकाणी एक भूमिका घ्यावी लागते आणि ती म्हणजे सामंजस्याची .आपली आर्थिक कुवत, आपल्या सवयी, आपला कल , आपल्या पत्नीशी मोकळेपणाने बोलून गैरसमजाचे फाटे न फोडता जगता येऊ शकते .दुर्दैवाने जर आपली पत्नी त्या ऐकायच्या पलीकडची असेल तर मौन राहावे आणि केवळ शांतपणे उपचारा पुरतेच संसारात उरावे , हे इतिकर्तव्य ठरते .
लग्नाच्या वेळी आवडणारी पत्नी हळूहळू नावडती झाली तरी तिच्याशी संसार करणे हा ठरवून दिलेला नियम आहेत . .
आणि समजा एखाद्याची पती किंवा पत्नी  दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषाकडे आकर्षित झाली तर मग काय करायचे ?
सहसा या समाजात एका विशिष्ट मर्यादा पलीकडे ही मैत्री पुढे जात नाही शारीरिक संबंध पर्यंत उतरत नाही हे ध्यानात ठेवावे . 
आणि समजा ती व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीकडे वहावत गेली आणि ते आपल्याला समजले तर आपण उद्वेग करून घेऊ नये द्वेषाने जळू नये  संतापून जाऊ नये किंवा घाबरून आपला हातून काहीतरी जाते आहे या भयाने बावचळून जाऊ नये . आपल्याला जे समजले आहे त्याची त्या व्यक्तीला स्पष्ट शब्दात जाणीव करून द्यावी आणि जर त्या व्यक्तीला पुन्हा चूक सुधारून जीवन  मार्गावर यायचे असेल तर येऊ द्यावे कारण संसार चालवायचा असतो .
जे जाणार असते त्याला आपण पकडून ठेवू शकत नाही आणि ठेवू ही नये . ,ती स्त्री किंवा पुरुष ही आपल्या मालकीची गोष्ट आहे ही भावना मनामध्ये रूजू देऊ नये तर मग जसे भेटणे सोपे असतं तसं विलग होणेही सोपे होऊन जाते .

प्रत्येक जोडपे हे एक स्वतंत्र जग असते त्यांचे मानसिक जग ,भाव संबंध वेगळे असतान , ताणतणाव, आवडी, भांडण तंटे वेगळे असतात तसेच त्यांचे लैंगिक जीवनही वेगळे असते. अन हे असेच असायला हवे किंवा तसे नसायला हवे हे कुठल्याही पुस्तकावरून किंवा दुसऱ्याच्या अनुभवावरून त्यांनी ठरवू नये . आहे त्या संबंधात ते संबंध अधिका सुंदर कसे होता येईल ते पहावे .काही जोडप्यांच्या जीवना मध्ये शारीरिक संबंध फार लवकर संपतात म्हणजे ते दुःखी आहेत असे नव्हे . कारण ती फक्त एक शारीरिक गरज असते  या पलीकडे त्याला फारसे महत्त्व देऊ नये .कदाचित ते एकतर्फी सुद्धा असू शकते .
खरंतर जे देवाच्या मार्गावर चालू लागतात त्यांच्या जीवनात अधिक संकट येतात त्यांचे संसार फारसे सुखाचे होत नाही हे सत्य आहे कारण देव त्यांना त्या प्रलोभनातून मोह वनातून बाहेर काढत असतो त्यासाठी हे चटके बसतात , हे काटे टोचतात आणि वैराग्य अंगी बाणते .
त्यामुळे देवाच्या मार्गावर चालायचे असेल तर सारे काही देवावर सोपवावे आणि एक प्रामाणिक आयुष्य जगावे जे काही होते ते त्याच्या कृपेने होते त्याच्या इच्छेन होते . हे एकदा मनी ठसले मनी बांधले की मग , यश अपयशाची, सुखदुःखाची चिंता फारशी राहत नाही जे मिळते ते त्यांनीच दिलेले असते आणि जे न मिळते तेही त्यांनीच नेलेले असते, हे नक्की मनात असते  ,ही शरणागती  अध्यात्माचे बीज असते . जीवनाला दिशा दाखवते . हे ज्यांनी साधले त्यांनी अर्धे अध्यात्म जिंकले असे मला वाटते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ३० मार्च, २०२३

राम हवा काय कुणा

राम हवा काय कुणा 
****************

राम हवा काय कुणा 
इथे आपल्या जीवनी 
एक बाणी एक पत्नी 
सदैव एक वचनी ॥१

विचारता कौतुकाने 
सारेच गडबडती 
अरे बापरे म्हणूनी 
मग दूर ते पळती ॥२

राम कुणा न झेपतो 
इथे राम कोण होतो 
तो गुण सागर काय 
थिल्लरास आवडतो ॥३

राम बरा त्या देवुळी 
सवेत सीता माऊली 
भजू तया पुजू आम्ही 
करू नवमी साजरी ॥४

धैर्य नसे पण कुणा 
होण्यास सत्य वचनी 
अहो इथे सदा चाले 
कली युगाचीच नाणी ॥५

बरी असो संसारात 
तीच सदा जरी पत्नी 
चित्त धावे रूपा मागे 
वाहवा उठते मनी ॥६

आणिक पैसा येणारा 
कधी न टाळती कुणी 
पापाचा वा तो पुण्याचा 
कानाडोळा ते करती ॥७

राम होणे नसे कुणा 
राम जगणे नसते 
पोथीमध्ये तुलसीच्या 
मनोरंजन घडते ॥८

रामा शोधे विक्रांतही 
व्यर्थ रित्या जीवनात 
मी माझे पण् जडले 
पदी बंध दिसतात ॥ ९

मनी जरी उमटोत 
वाटे रामाची पाऊले 
काय करू पिकली ना 
अजून रानची बोरे ॥ १०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २८ मार्च, २०२३

कृष्णराया .

कृष्णराया .
********

हे शब्द तुझे धुवती
मन माझे कृष्णराया .
कळते मला न जरी 
होते सुगंधित काया 

हे तम किती दिसांचे 
होतेच चित्ती जडले 
वर्षाव तुझ्या प्रेमाचा 
होता आज उजळले 

येऊनही भाग्य दारी
होतो कधी निदसुरा 
गुंजुन गीत या कानी 
रमतो स्वप्न संसारा 

मी जाणतो जरी मज 
आहे स्वतःच उठणे 
घेण्यास प्रकाश आत 
आहे दार उघडणे 

ती शुद्ध बुद्धी तुजला
मी मागतो रे कृपाळा 
दे प्रेम तुझे मजला
वस सदा हृदयाला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

सोमवार, २७ मार्च, २०२३

नावीन्य


नावीन्य 
********
नको वाटते काहीच पुन्हा नव्याने करणे 
वाळूचे बांधून किल्ले पुन्हा एकदा मोडणे ॥

तोच तोच खेळ असा पुन्हा पुन्हा खेळणे 
या मनाच्या हुकूमात तीच परेड चालणे 

करण्यात या नवीन, असते जुने मोडणे 
आणि तुटले फुटले बळे विसरून जाणे 

आशेचे हाड माणसा सदोदित पळवते 
मरतानाही स्वर्गामध्ये जागा स्वतःस करते 

नवे असे खरे इथे तर काहीच नसते 
जुन्यालाच पांघरून नवेपण मिरवते 

आहे त्यात तसेच रे स्थिरपणाने राहणे 
येते जाते हरक्षणी जे ते जगणे पाहणे 

यातून जे उलगडते तेच नवीन असते
बाकी जळमट सारी विचारांचीच असते

नावीण्याचा भ्रम असा मनी जयास कळतो
नावीण्याचा जन्म मग सहज तयात होतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

तुटले पोळेतुटले पोळे 
********

मधमाशांचे तुटले पोळे 
तथाकथित संकट टळले 
एक अनार्जित ठेव्याचे 
सुख इथे कुणा मिळाले 

पृथ्वी काय असते रे
इथे फक्त माणसांची 
नच का पशु पक्षी
अन् ती कीटकांची  

कुठला पक्षी कुठला पशु
घर  कुणाचे काय मोडतो 
सौख्यासाठी अन् आपल्या
कुणी कमावले काही लुटतो 

हिंसेची तर ही परमावधी !
ज्ञानी अहिंसक म्हणून मिरवती
तीच  मिटक्या मारत खाती 
सत्व संपन्न त्यास म्हणती
प्रमत्त हुकूमशहागत अन्
रसने ला सादर होती

पोळ्यात मेली पिले हजार 
नाही त्यांचा मनी विचार 
अन् ती राणी माशी बिचारी
पुनः नव्याने मांडे संसार 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

रविवार, २६ मार्च, २०२३

शब्द तुझा


शब्द तुझा
********
सहजच शब्द तुझा 
मजला स्पर्शून जातो 
अचानक वळवाचा 
पाऊस पडून जातो 

होते मृदू मुलायम 
तापलेले पान पान 
कणा कणावर येते 
एक विमुक्त उधान 

मी माझा राहतो ना 
कृष्ण मेघ पांघरतो 
अन् तुझ्या स्मरणात 
मयूर साद घालतो 

थिजलेल्या जगण्याला 
पुन्हा नवी जाग येते 
हरवते दीर्घ रात्र 
पुन्हा प्रभा प्रकाशते 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

वदती अधर

वदती अधर 
*********

ताम्र करडे
रेखीव डोळे
सूर्य किरण
जणू सांडले

आणि तरीही
मवाळ ओले
जणू आताच
व्याकूळ झाले

काही भुरके
तसेच पिंगट
केस कपाळी
होते लहरत

सुरेख तरीही
उदास हसणे
दु:ख थिजले
होते पाहणे

स्वर्गीचीच ती
जणू अप्सरा
प्रिया हरवली
दूर सागरा

त्या विरहाचे
दु:ख शापित
वदती अधर
काही नकळत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

शेजीचे खेळणे


शेजीचे खेळणे
************
शेजीचे खेळणे आणले उसणे
जीव त्या लावणे बरे नाही ॥१

शेजीचे खेळणे शेजीचे घेतले 
दुःख का दाटले मनामध्ये ॥२

जाहला हा खेळ घडी दो घडीचा 
नसून स्वतःचा हक्क काही ॥३

चिंध्याचा बाहुला तुझा ग चांगला 
तयाचा कंटाळा बरा नव्हे ॥४

दुजाच्या खेळण्या जीव हा लावला 
जीवाने भोगला मनस्ताप ॥५

आपले आपण गोड घे करून 
देवाचे हे देणं  समजून ॥६

सुखाचे इंगीत  कळले बाळीला
विठोबा धरला कवळून ॥७

अर्थ उमगला विक्रांत हसला
हव्यास सुटला नसल्याचा ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, २३ मार्च, २०२३

तुझे घर

तुझे घर
*******

दूर तुझे घर बंद दरवाजा 
आणि मज सजा प्रतिक्षेची ॥१
नको बोलावूस हरकत नाही 
मज घर नाही असे नाही ॥२
मोडके छप्पर तुटलेल्या भिंती 
कुणी नाही साथी सोबतीला ॥३
तर काय झाले जीवन सरले 
आयुष्य मिटले असे नाही ॥४
इथे धरेवर जगतात जीव 
मरतात जीव असंख्यात  ॥५
एक मी तयात जगतो सुखात 
अर्थ जगण्यात जरी नाही ॥६
आसक्ती देहाची आसक्ती मनाची 
आसक्ती जीवाची जरी मना॥ ७
प्रत्येक फुलाचे कुठे फळ होते 
बीज ते रुजते जन्मावया ॥८
तुझे घर तुला माझे घर मला 
असे जगण्याला सादर मी ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

बुधवार, २२ मार्च, २०२३

सावळा
सावळा
******
सावळे वादळ आले देहावर 
हरवले जग अस्तित्व उधार

सावळे क्षितिज आले धरेवर
नेई  मोहवत सावळा प्रहर

सावळी जाहले सावळ्या मिठीत 
घनगर्द डोह सावळ्या दिठीत

सावळा संभार सावळ्या कपाळी
सावळीच अदा लबाडश्या गाली

सावळेच स्मित सावळ्या ओठात
सावळे अमृत विलग कडात

सावळे आकाश सावळा प्रकाश 
तनमना वेढे सावळ्याचा पाश

प्राण हा सावळा श्वास हा सावळा 
ऐक झाले सारे मिनले आभाळा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

सोमवार, २० मार्च, २०२३

येत नाही


येत नाही
*******

अंधारल्या दिशा साऱ्या
तरीही तू येत नाही 
ताऱ्यांचे अवगुंठण 
तुला सोडवत नाही ।।

कुठेतरी खोचलेली 
नाती काही प्रारब्धाची 
उपसला बाण तरी 
शल्य ते मिटत नाही ।।

देशील तू सांत्वना ही 
जरी मनी खात्री नाही 
हे भिक्षेचे पात्र अन
मज टाकवत नाही ।।

डोळे घनव्याकुळसे 
तरी कोसळत नाही 
साकळून वेदना हा
उरही फुटत नाही ।।

ठाऊक मला जरी हे 
क्षणाचेच गीत आहे 
साहतो हरेक ऋतु  
सवे तुझी प्रीत आहे ।।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

रविवार, १९ मार्च, २०२३

तुझ्यासाठी

 तुला न कळते
**********
तुला न कळते तुझे असणे 
असते गाणे 
माझ्यासाठी ॥१
तुला न कळते तुझे बोलणे 
ऊर्जा उधळणे 
माझ्यासाठी ॥२
तुला न कळते तुला पाहणे 
क्षण तो जगणे 
माझ्यासाठी ॥३
तुला न कळते काय असे तू 
आषाढ ऋतू 
माझ्यासाठी ॥४
तुला न कळते तू स्वप्न जागते
सदैव असते
माझ्यासाठी ॥५
तुला न कळते किती काळ मी
उभा जीवनी
तुझ्यासाठी॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .


शनिवार, १८ मार्च, २०२३

नाव

नाव 
****
दत्ता माझी नाव 
डुगडुग करे
प्रवाहात फिरे
गरगर ॥१

माझिया नावेला 
नाही रे नावाडी
ऐल पैल थडी
सुनसान ॥२

झिरपते पाणी 
बघ फटीतून 
गेलेत बुडून
पाऊले ही ॥३

आता करू नको 
उगाच ढिलाई
त्वरे धाव घेई 
गुरुराया ॥४

येई लवकर 
नेई मज पार 
व्याकुळ अपार
जीव झाला ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

कलेवर

कलेवर
******

सुख घेई हवे तर 
दुःख देई हवे तर 
परी मज दावी दत्ता
रूप तुझे मनोहर ॥

धन घेई हवे तर 
मान घेई हवे तर 
परी मज देई दत्ता 
नाम तुझे सुखकर ॥

यश घेई हवे तर 
पाश देई हवा तर
परी जीवनात दत्ता
तुच राही निरंतर ॥

देह घेई हवे तर
गेह घेई हवे तर 
फक्त तुझ्यासाठी दत्ता
ठेवी मज धरेवर ॥

भक्ती नाही मनी तर 
तू नाही जीवनी तर 
जगु कशास मी दत्ता 
वागवू हे कलेवर ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, १६ मार्च, २०२३

पाझर

पाझर
******

तुझ्यासाठी जरी 
लिहितो मी गाणी 
काय तुझ्या कानी 
पडती का ?   ॥

तुज आळवतो 
प्रार्थना करतो
हाकारे घालतो 
पुन:पुन्हा ॥

पाझर फुटेना 
कातळ तुटेना 
मज तू भेटेना
काही केल्या ॥

हळूहळू हाका 
होतात रे क्षीण
ज्योत मिणमिण
विझू पाहे ॥

विक्रांत न मागे 
तव प्रेमाविन 
दत्त दयाघन
अन्य काही  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १५ मार्च, २०२३

टाइमपास

 टाइमपास
*****
ते तुझे चॅट णे
जुने नि पुराने 
आज वाटतसे 
अर्थ शून्य गाणे 

ते तुझे रुसणे 
ते तुझे हसणे 
मनातील भाव 
स्मायलीत देणे 

आज ना जिवंत 
शब्द भावना ती 
रिते खुळखुळे
जणू वाजताती

सहज हातात 
आज हे आले 
प्रांगणी खणता 
खेळणे मिळाले 

शब्दात नव्हता 
काही अर्थ जरी
विचारपूस ही 
होती वरवरी

जुळणेच होते 
कुठे कुणीतरी 
अजबसे मैत्र 
असे काहीतरी

गप्पाच फुकट 
तोंड न बघता
टाईमपासच
एक खुळा होता

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, १४ मार्च, २०२३

ज्ञानदेवा

ज्ञानदेवा
*******
शब्द प्रकाशाचे 
ज्ञानदेवा तुझे 
करी जीवनाचे 
सोनें माझ्या ॥१

तुझिया प्रज्ञेचा 
प्रकाश किरण 
हृदयी झेलून 
धन्य झालो  ॥ २

अर्थाचे रुजून 
सौंदर्य चित्तात
एकरूप त्यात
बुद्धी झाली ॥३

भ्रांतीचा काळोख 
फिटून मिटून
आनंद दाटून 
मनी येई ॥ ४

विक्रांता पदाशी
घेई गा ठेवूनी
हीच विनवणी 
वारंवार ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .
 

तुझे चित्र


तुझे चित्र
********

तुझे चित्र मनी माझ्या 
नित्य नित्य पाहतो मी 
त्याच डोही निरागस 
पुन्हा पुन्हा डुंबतो मी ॥

तेच तुझे शब्द जरी 
रोज रोज ऐकतो मी 
नवे दव नवे मोती 
ओंजळीत भरतो मी ॥

तू न जीवनात मूर्त 
पर्वा नच करतो मी 
कणकण क्षण क्षण 
व्यापून तू जाणतो मी ॥

देवू तुला काय कसे
हात रिक्त पाहतो मी 
रिक्तते सवेत मग 
तुझ्यात रिक्त होतो मी ॥

मुक्ततेचा लोभ नाही 
बद्धताच मागतो मी 
हृदयास जाळणाऱ्या
वंचनेत रंगतो मी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

रविवार, १२ मार्च, २०२३

स्वामी स्मरताच

 स्वामी स्मरताच
**************
स्वामी स्मरताच माझ्या हृदयात 
प्रेम बरसात होते सुरू ॥१
स्वामी स्मरताच माझिया मनात 
सुखं दाटतात अनामिक ॥२
स्वामी स्मरताच माझिया डोळ्यात 
मेघ भरतात आषाढाचे ॥३
स्वामी स्मरताच माझ्या सभोवत 
चैतन्याचा झोत पिंगा घाली ॥४
स्वामी स्मरताच झरे फुटतात 
कोंब फुटतात देहावरी ॥५
स्वामी स्मरताच श्वास थांबतात 
उंच उडतात प्राण पक्षी ॥६
कृपाळूवा होत इवल्या हातात 
स्वामी ओततात वर्षा ऋतु ॥७
भरलो आकंठ कृपा कौतुकात 
मागे भक्ती फक्त विक्रांत हा ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ११ मार्च, २०२३

सय

सय (उपक्रमासाठी )
**
जाणतो मी होता तुझा खेळ खुळा 
फिरलो मी दोरा बांधुनिया गळा ॥
येरे म्हणता तू धावतच आलो 
नको म्हणता तू गुमान बसलो ॥
नादान करती मोहून कामना 
वाचले जाणले घोकलेले मना ॥
परी उघडता दार त्या जगाचे 
पडली भुरळ गाणं पारध्याचे ॥
अन कुण्या दिसी हाकलून दूर 
घेतलेस पुन्हा लावून तू द्वार ॥
कितीतरी वेळ पायरी बसून 
पचवून व्यथा निघालो तिथून ॥
परी येता सय तया दिवसाची 
जळते अंतर  काहीली जीवाची ॥
भुंकण्याचे बळ नच चावण्याचे 
जगतो गुमान जिणे लाचारीचे ॥
अजूनही भीती आहे मनातही 
बोलवता तू मी घेईल धाव ही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

शुक्रवार, १० मार्च, २०२३

होळी

होळी
*****
आग पेटली पेटली ज्वाला नभामध्ये गेली 
रात्र नटली सजली ठिणग्यांनी ॥१

गंजी पेटली धडाड लाल केशरी उजेड 
झाली सजीवशी झाडं चहुकडे ॥२

उठे गलका चित्कार बोंबा शिव्या भरपूर 
पडे जगाचा विसर अवघ्यांना ॥३

कुणी नैवेद्य आणला कुणी नारळ वाहिला 
राख लावली भाळाला कुणी भावे ॥४

वृक्ष जळतांना ओला कुणी हुंदका ऐकला 
कुठे ओलावला डोळा जीवनाचा ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

बुधवार, ८ मार्च, २०२३

Thank you

Thank you
************
I may not be in your memory,
I may not be in your world,
I may not be in your business,
and I may not be in your parties.

But still you accepted me,
my existence in you
without any expectations.
You uttered few words for 
my prosperity health and wealth,
it made me strong 
and more sensitive ,
gave me energy like blessing sunshine.

It may be formal 
a task of few seconds.
Allowed me to fill with gratitude 
with nameless love and affection.

Thank you for 
your tiny though 
million times used words.
Which are always
bonding and charismatic, 
wishing me 
Happy Birthday.

🌾🌾🌾
©Dr.Vikrant Tikone https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

मंगळवार, ७ मार्च, २०२३

खोटा पैसा


खोटा पैसा
********
खोटा पैसा देवाला 
हळूच वाहून टाकला 
चालवण्याचा सगळा 
मग  व्याप तो गेला 
पुण्याच्या खात्यात  
तो बहुदा जमा झाला 
नाही झाला तर त्यात 
तोटा तो रे कुठला 

मीही एक खोटा पैसा 
दानपेटीत पडलेला 
संसारात व्यापारात 
सदा बाद झालेला
या दानातून त्या दानात 
उगाच पडत आलेला  
ज्याने त्याने लवकरी
सुटका करून घेतलेला 

कधी दत्ताच्या थाळीत 
कधी देवीच्या आरतीत
कधी भिकारी ओंजळीत
कधी नदीच्या प्रवाहात
कुठे कुठे वाहिलेला 
छापा काटा पुसलेला 

खरा असो वा असो खोटा 
धातूचा तो  तुकडा असतो
कुणीतरी कुठे पाडला
धर्म तोच निभावत असतो
असून मूल्य नाही म्हणून 
सदा फेकला जात असतो.राजा अधिकारी आणि प्रमुख्

राजा ,सचिव व विभाग प्रमुख
***†*****************

एकदा एक राजा चुकून 
त्याच्या राज्याच्या
एका विभागात भेटीला गेला 
मारता मारता फेरफटका .
एका जुनाट जवळच असलेल्या 
इमारतीत आला 

तेथील लोकांच्या 
तक्रारीच्या ऐकून गल्ला
खूपच कावला अगदी वैतागला 
त्याचा  पार मुडच गेला
 मग तो म्हटला त्याच्या सचिवाला 
ऐक हे काम  बेकार झालय
कुणाला तरी  जबाबदार धरा
आणि चांगलीच शिक्षा करा

होय महाराज नक्कीच 
तो सचिव म्हणाला 
मग त्यांने आज्ञा दिली 
त्याच्या शिपायाला 
लागोलग जा अन
इथल्या प्रामुखाला धर
व चढव फासावर 

शिपाई तर 
असल्या कामात चोख असतात
साहेबाचा लगेच शब्द झेलतात
हुकुम लगेच आला अमलात

खरंतर 
साहेबाच्याच लोकांनी
 बांधले होते ते घर काढून टेंडर
गरजू लोकासाठी एक थातूरमातूर
रग्गड पैसे ओतले कुठे कुठे खर्च केले 
किती चांगले किती वांगले 
कुणी नाही पाहिले नाही मोजले
**
आणि जरी त्या गरजू लोकांना
ते नव्हते आवडले 
तरीही राहणारे तिथे राहिले 
होत असून गैरसोय चरफडत बसले 
आणि संधी मिळताच बोंबलत सुटले 

आता कुठल्याही अप्रिय घटनेला
एक बळी  द्यायला लागतो
तो जर  असेल निरुपद्रवी
गरीब आवाज न करणारा 
तर पहिला  पकडला जातो

तसा एक बकरा सापडला
आणि फासावर चढवला गेला
पुढे त्याचे काय झाले 
न ठाऊक कुणाला  

कारण राजाकडे असतात
असे साहेब हजार 
सारे हुकमाचे ताबेदार
अन राजाच्या सोबत कॉन्ट्रेक्टी बाजार 
एक गेला की दुसरा तयार

तर मग त्या साहेबालाही
मिळाली शाबासकी 
त्याची खुर्ची झाली पक्की 

पण तेव्हापासून झाडूवाल्याने
झाडू नाही मारला 
तरी प्रत्येक प्रमुखाला घाम फुटतो
पाणीवाल्यांनी हौद नाही भरला 
तरी त्याचा उर धडधडतो 

कारण त्याला ठाऊक असते
झाडू मारला नाही गेला तर 
फाशी त्यालाच मिळणार!
हौद भरला गेला नाही तर
फाशी त्यालाच लागणार !
अन नोकरी सोडली तर 
उपाशी मरणार ! 

त्यांना खरंच ठरवता येत नव्हते 
रोज मरणे बरे की उपाशी मरणे बरे

.🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

होलीके


होलीके
******

कशाला येऊ मी भेटाया होलीके
साहू गे चटके
तुझे उगा ॥१
येथे काय कमी आहे माझी आग
जळतात राग
अविरत ॥२
पेटवली धुनी दत्तात्रेये आत
समिधा अनंत
पडतात ॥३
हे काय असेल एकाच जन्माचे
अपार राशीचे
इंधन रे  ॥४
जळाल्या वाचून आता ना सुटका
पुण्याचा नेटका
यज्ञ झालो ॥५
तुझे जळू दे ग जमलेले तण
मळलेले मन
माझे जळो ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

उमाळा


उमाळा
******

तेच स्निग्ध चांदणे 
पुन्हा माझ्या मनात
तेच नितळ गाणे
पुन्हा माझ्या कानात

तो स्पर्श आळू माळू
पुन्हा झिरपला डोळा
पौर्णिमेचे बळ अन् 
ये सागर  कल्लोळा 

किती किती कुठे पाहू 
ही जोत्सना उरात घेवू 
हरवता देहभान 
काय कुणास देवू 

हा सुगंध कुठला 
कणकण मोहरला 
हा भाव गहिरा 
साऱ्या नभात व्यापला 

काय सांगू कुणाला 
विक्रांत उधान जाहला 
जीवनाने झेलला या
एक सुखाचा उमाळा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..


रविवार, ५ मार्च, २०२३

ज्वाला


ज्वाला
*****
सुटतात गाठी जळता शेवटी 
हरवून बंध जाती सारी नाती ॥
पडे देह आगी कापुराच्या वाती 
लपेटून ज्वाला पंचतत्वा नेती ॥
तिथे मोडते रे हरेक आकृती .
असे क्षण हाच फक्त तुझ्या हाती ॥
सुखासवे जाते ओझे वेदनाचे 
मावळती भास सत्य त्या दिसाचे ॥
जुने पान जाता नवे पान येते 
चक्र जीवनाचे वाहत राहते ॥
रेखाटने क्षण कर्म जीवनाचे
भरो रंग त्यात मन रांगोळीचे ॥
अवधूत रंगी रंगला विक्रांत 
धडाडून ज्योत भगवी मनात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

शनिवार, ४ मार्च, २०२३

दत्त देईल ते


दत्त देईल ते

********

दत्त देईल ते घ्यावे दत्त नेईल ते द्यावे ॥

दत्ता हृदयी धरावे आणि काही न मागावे ॥

 रोगा रोग म्हणू नये भोगा भोग म्हणू नये ॥

सारे येतसे वाट्याला जीवा देही पडलेल्या ॥

नाव प्रारब्ध त्या द्यावे कर्मभोग वा म्हणावे ॥

घडो घडते आघवे त्याला बाजूला सारावे ॥

चित्त दत्ताशी बांधावे सारे जीवन जगावे ॥

ऐसे संतांचे बोलणे जगो विक्रांत कृपेने ॥

 https://kavitesathikavita.blogspot.com

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी
*********

तुझ्यासाठी किती केल्या उठाठेवी 
पांघरले जग आलो देह गावी 

तुझ्यासाठी मोक्ष सारला मी दूर 
सजवला देह जाहलो कापूर 

तुझ्यासाठी आड वाटेला लागलो 
जन्म मरणाचा चकवा धावलो

तुझ्यासाठी झालो उन्हात पळस
लक्ष तारकांची काळोखी अवस

तुझ्यासाठी फुल पानात सजलो 
सागर सरिता जीवनी बुडालो 

तुझ्यामुळे जन्म माझिया मिठीत 
अव्यक्त ते व्यक्त पाहिले दिठीत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

गुरुवार, २ मार्च, २०२३

भूमिका


भूमिका
*****
नाटकातील नटागत 
वठवावी लागते भूमिका 
जगतांना या जगात 

कधी जिवलग मित्र होत 
कधी दिलदार सोबती बनत 
कधी नियमात कठोर वागत 
कधी नियमाचे धागे तोडत

 पण उमटच नाही मनात कधीच कटुता 
रुजत नाही आत कधीच दुष्टता 
माहीत असतो तुम्हाला तुमचा मुखवटा 
आणि समोरील व्यक्तीतील गुणवत्ता 

वेळ काळ परिस्थिती अन् ती व्यवस्था 
असते तुम्हाला पळवत 
किंवा खेचून नेत 
परंतु त्या पलीकडचे नाते 
माणसातील माणुसकीचे 
असते आत वाहत  
नितळ निवांत 
आत्मीयतेने भरलेले 
सदैव शांत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

बुधवार, १ मार्च, २०२३

ओला घाट

ओला घाट
********

मी थांबलो आहे वेस ओलांडून 
परका उपरा बेवारस होऊन 
अन तुला ती खबरही नाही अजून
का तू बेखबर आहे खबर असून ?

मी विझलो आहे संपूर्ण जळून 
आग आणि प्रकाश सरून 
अन तू ती राखही पाहत नाहीस ढुंकून
ते भाग्य मी आणू कुठून ?

हे जगणे माझे चालू आहे अजून 
संपत नाही म्हणून, पण प्राण..
तो तर कधीच गेला आहे उडून 
रे तू आहेस ना सारे जाणून ?

तुला धावत ये म्हणत नाही 
अन् मी  रडतही बसत नाही 
तुझ्याविना न कळणार कुणाही
यात ही अर्थ असेल काही ?

प्रतिक्षेत त्या दक्षिणदारी बसून
मी आहे प्रतिक्षाच होवून
जरी हे जीवन गेलेय वाहून
तो घाट ओला आहे अजून !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

ऐकणरे भेटते तेव्हा

ऐकणारे भेटते तेव्हा ****** जेव्हा कोणी ऐकणारे भेटते तेव्हा  शब्दांनी भरून येते आकाश अन  कोसळते अनावर होऊन थांबवल्या वाचून थांबल्...