गुरुवार, ३० मार्च, २०२३

राम हवा काय कुणा

राम हवा काय कुणा 
****************

राम हवा काय कुणा 
इथे आपल्या जीवनी 
एक बाणी एक पत्नी 
सदैव एक वचनी ॥१

विचारता कौतुकाने 
सारेच गडबडती 
अरे बापरे म्हणूनी 
मग दूर ते पळती ॥२

राम कुणा न झेपतो 
इथे राम कोण होतो 
तो गुण सागर काय 
थिल्लरास आवडतो ॥३

राम बरा त्या देवुळी 
सवेत सीता माऊली 
भजू तया पुजू आम्ही 
करू नवमी साजरी ॥४

धैर्य नसे पण कुणा 
होण्यास सत्य वचनी 
अहो इथे सदा चाले 
कली युगाचीच नाणी ॥५

बरी असो संसारात 
तीच सदा जरी पत्नी 
चित्त धावे रूपा मागे 
वाहवा उठते मनी ॥६

आणिक पैसा येणारा 
कधी न टाळती कुणी 
पापाचा वा तो पुण्याचा 
कानाडोळा ते करती ॥७

राम होणे नसे कुणा 
राम जगणे नसते 
पोथीमध्ये तुलसीच्या 
मनोरंजन घडते ॥८

रामा शोधे विक्रांतही 
व्यर्थ रित्या जीवनात 
मी माझे पण् जडले 
पदी बंध दिसतात ॥ ९

मनी जरी उमटोत 
वाटे रामाची पाऊले 
काय करू पिकली ना 
अजून रानची बोरे ॥ १०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरणार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...