सोमवार, २९ एप्रिल, २०१३

तुरुंग



आता तुरुंगही मज

हा रम्य गमू लागला

अंधकार घनदाट

देहात मुरु लागला .

गज झालो मीच आता

दगडात चिणलेला  

साखळ्याचा आवाज  

जीवा रिझवू लागला

विक्रांत प्रभाकर
 http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

डॉक्टरी नोकरी



शेकडो रुग्ण तपासतांना

रोगांच्या साथीत

वेढलेले असतांना

नातेवाईकांच्या झुंडी

अंगावर झेलतांना

गुंड पुंडांना तोंड देतांना

एकच असते भिस्त

एकच असतो आधार

एक तारखेपर्यंत

बेंकेत पडेल पगार .



तसे काम छान आहे

मित्र मंडळीत मान आहे

घातल्यावर अॅप्रन वाटे

देवाचेच वरदान आहे .



पण जेव्हा पडते कानावर

न केलेल्या चुकीमुळे

मृत्यूच्या खेळामुळे

सस्पेन्शन आले मित्रावर

काळे फासले गेले तोंडावर  

अॅप्रनमधील हवा निघून जाते

तोफेच्या तोंडी आहोत

असेच अन वाटू लागते

घरी जाणारा प्रत्येक पेशंट

घरी गेल्यावर ..

मरेन असे वाटू लागते

आपल्या ड्युटीत जर

काही असेच झाले तर

या वयात काय करायचे

चाळीस पन्नाशीत

तोड कुठे वेंगाडायचे

घराचे कर्ज कसे फेडायचे

मुलांचे शिक्षण कसे करायचे

हळू हळू येणारा प्रत्येक

पेशंट शत्रू वाटू लागतो

भरलेल्या कॅजुल्टीचा

वीट येवू लागतो

वाटते हॉस्पीटल सोडून

दूरवर पळून जावे

याला त्याला पैसे देवून

वा कुणा वशिला लावून

दवाखान्यात बसावे

सर्दी खोकल्याचे चांगले

पेशंट रोज पाहावे

पण ओळख लागत नाही

देणे घेणे जमत नाही

म्हणून त्याच चक्रात

राहतो गरगर फिरत

लोक जरी म्हणती

चांगला डॉक्टर आहे

आमचा जीव वाचवतो

त्यांना काय माहित

रोज तो मरत असतो
.



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २० एप्रिल, २०१३

स्वागतोत्सुक






उभा तू दारात अन
मी स्वागतोत्सुक आहे
विकारांनी संसारात
परंतु चिणले आहे
तुझ्या करुणेचा देवा
कर कठोर प्रहार
माझ्या सवे माझे घर
मोडून मला स्वीकार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मागणे .






दयायचे असेल प्रभू

तर तुझे वेड मला दे  

ज्ञानदेव चैतन्याची

जिथे पाऊले पडली

त्या वाटेची माती

या माथ्याला लागु दे  

नाथ नामदेवांनी

जसे तुला जाणले

त्या युक्तीचे प्रेमाचे

दान फक्त मला दे  


विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...