काळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

तुकडा काळाचा

तुकडा काळाचा
************
एक तुकडा काळाचा तोंडावर फेकलेला 
जीवन असते आपले काही वेळ जगायला

एक कागद तेलकट सुखदुःख गुंडाळला  
धर्मजात देशवेश दोरा वर बांधलेला

पडताच हातामध्ये क्षीण क्षीण होऊ लागतो
जो तो इथे हक्काने ओरबाडून घेऊ लागतो

फेकून देता येत नाही वाटून टाकता येत नाही
जपून ठेवावे तर मुळी सांभाळता येत नाही

कुणासाठी कागदात मिठाईचा ठेवा असतो
कुणासाठी दाहकसा मिरचीचा ठेचा असतो

असे का तसे का हे सांगण्यास कोणी नसते
सरताचं वाटा सोबत हरवून जाणे असते

मिळणार वाटा नवा किंवा मिळणार नाही
उरणार बोळा फक्त नवे वा घडणार काही 

गृहीतके बहुत इथे नक्की कुणा ठाव नसे
सर सरून वाटे इथे जीवनाला अंत नसे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

काळाचा खाटिक

.

काळाचा खाटिक

************

बळीचा बकरा
जाई मिरवत
प्रेमाने भरत
धष्ट पुष्ट

गेला नाही तरी
शस्त्र धारधार
असे भाळावर
लिहलेले

काळाचा खाटिक
शस्त्र हातातले
जाणार चालले
मानेवरी

चल बा गुमान
तुझी नाही मान
जीवन मरण
आखलेले

हाती चार क्षण
कर त्याचे सोन
टाक ही मोडून
येरझार

विक्रांत सोडून
हिरवे कुरण
दत्ताचे अंगण
सेवितसे

***

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

काळ





काळ !
************

रवी मध्यानीचा
खाली उतरला
काळ्या काजळीची
किनार नभाला

सरलेले वर्ष
मानलेला काळ
जाय उतरणी
देहाचा ओघळ

कल्लोळ भरला
जल्लोष चालला
एकेक दिवस
क्षणांचा सोहळा

कालही मी होतो
आहे नि आजला
काळ कल्पनेत  
जन्म वर्तुळाला

कळताच मन
भ्रम मावळला
अनादि जीवन
हुंकार उरला

विक्रांत नावाचा
आकार मानिला
इथेच होता नि
असेल नसला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...