पाऊस कविता . लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पाऊस कविता . लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ८ जून, २०१८

जलदा ओंकारा


जलदा ओंकारा

निळूल्या सागरी

सावळी साऊली
हर्षाच्या पावुली
वर्षा आली

सरला वणवा

सरली काहिली
आतूरही झाली
अवनी सारी

मोडली बांधली

घरटी कावळी
मोरनी धावली
रिंगणात

आता बरसेल

प्रिय घननिळ
सुखाने भरेल
जीव सारा

निरपेक्ष कृपा

करिसी अनंता
सृष्टीची ही सत्ता
म्हणउनी

जलदा ओंकारा

उदारा कृपाळा
नमूं कोटी वेळा
प्रभू तुला


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २६ जुलै, २०१७

तेव्हा ही पाऊस होता




तेव्हा ही पाऊस होता
***************

तू मला भेटलीस पहिल्यांदा
तेव्हा ही पाऊस होता
तुझ्या माझ्यातला द्वैताचा
पडदा मिटला
तेव्हाही पाऊस होता
बाळाची चाहूल लागली जेव्हा
पाऊस किती दाटून आला होता
आणि बाळाच्या खिदळण्यात
पाऊस ही निनादात होता

किती गंमत वाटते 
जणू जीवनातील प्रत्येक पर्वात
तो सदैव साथ करीत होता  
बदली, प्रोमोशन, घर बदलणं
मुलांचे अॅडमिशन
सगळे यायचे ठरवून
पावसाळ्याचा मुहूर्त पाहून

आणि जेव्हा तुटली तावदान
दुराव्याचे निमित्त होवून
तेव्हाही पाऊस होता
आणि तेव्हापासून
काहीही झाले तरीही
पाऊस पडतच नाही
का काही घडतच नाही
कुणास ठावूक

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २२ जुलै, २०१७

पाऊस वगैरे छान असतो !




पाऊस वगैरे छान असतो !


ठीक आहे यार
पाऊस वगैरे छान असतो
धुव्वाधार पडतो
खूप मजा आणतो
सगळीकडे हिरवे गार होते
जीवनाचे नवे दार उघडते  
नाही म्हणजे
मलाही आवडतो पाऊस
त्याचे नखरे
त्याच्या साऱ्या रुपासह
पण..
जोवर माझ्या मनातला
हा कोपरा भिजत नाही
तोवर कशालाच अर्थ नाही
तसे तर मी लाख यत्न केले
छातीवर वादळाचे
झोत झेलून घेतले
नखशिखात भिजलो
इमारतीच्या गच्चीवर
एकटाच.. 
कित्येक तास..
पण आतली माती
चक्क कोरडीच होती
रात्रभर झोप न लागलेल्या
टक्क डोळ्यासारखी
मला खरच कळत नाही
मी विरघळून का जात नाही ?

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




सोमवार, २६ जून, २०१७

धुंद धुंद ही हवा



धुंद धुंद ही हवा
मंद मंद गारवा
तोच रंग हिरवा
मागतो सखी तुवा

तेच शब्द लाघवी
आज आण अधरी
तीच मौन संमती
येवू देत लाजरी

आस तुझी लागता
स्पंद होय कापरा
स्मित तुझे स्मरता
जीव होय बावरा

स्वप्न गीत गावुनी
अर्थ देई जीवनी
जाहलो तुझा ऋणी 
प्रीत रूप पाहुनी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ११ जुलै, २०१६

पावसा








कोटी कोटी मुखातून

उमटे प्रश्न पुन्हा रे

थकलो वाट पाहून

पावसा येशील का रे ?



तसा तर तू येशील

थोडाफार पडशील

पण तसे नको आता

हळूच पुन्हा जाशील



असा बरस आता तू

तृषा हरो जीवनाची

कणाकणातून हसो

स्वप्न उद्याच्या सुखाची



नद्या उदंड भरोत

तळी तुडुंब वाहोत

विहरी साकव आड

गाणे निळूले गावोत



कृपाघना नाव तुझे

हरसाल साच व्हावे

अंकुरती बीज सान

जीवनाचे दान द्यावे



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/




शनिवार, ११ जून, २०१६

मेघ काळे







माझ्या मनात पाऊस
लाख प्रतिमा नटून
कुणा म्हणावे देखणा
थेंब बसले सजून

ओढ कालच्या पाण्याची
गेली ओघळून दूर
ओल हातात अजून
अन हृदयी काहूर  

जातो भिजून सजून
एक नितळ चेहरा
शाळा सुटता सुटता
थेंब होवून दुखरा

ऋतू चारच दिसाचा
मग चटके मनाला
जग पेटले तरीही
पाणी खोल विहिरीला

एक गाणे पावसाळी
चिरतरुण अजून
मेघ येतात दाटून
त्याच नावाने स्मरून

गाठ कुठल्या सरीची
कुण्या रानात घडते
सय सपकून आत
मन हिरवळ होते

मेघ भरलेले काळे
मोठ्या डोळ्यात सांडले  
माझे दर्पण लाघवी
आता आकाश जाहले  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...