बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

दत्ताच्या अंगणी






दत्ताच्या अंगणी लाविले आसन
मांडिले बस्तान हटी तटी ||
आणतो अवसान करितो भांडण
एकटा रडून दावी कधी ||
परी तो कठोर दावितो लाघव
दावी ना ठाव काही केल्या ||
त्याची ती कीर्ती आहे मी ऐकुन
राहतो थांबून म्हणूनिया ||
प्राण गेला तरी जावू दे सुखाने
परी ना सोडणे अंगण हे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

तूर्त एवढेच कळावे

 





कधी उंच उंच नभात
गर्द कृष्ण मेघात
हलक्या विरळ अस्तित्वाचा
इवला कण होत
तर कधी कडेलोटातील गर्जनेत
धबाबा कोसळणाऱ्या प्रपातात
साऱ्या विश्वाला दहशत घालत
जीवन होते वाहत

कधी स्वभान विसरून
साऱ्या विश्वात समरस होवून
कधी स्वतःत काठोकाठ भरून
मी पणाची जाणीव
क्षणोक्षणी जागी ठेवून
होते
सतत गतिमान
जाणिवेच्या कोषात गुरफटून

या अगोदरचे कितीतरी ऋतू
कितीतरी वाटा
कितीतरी प्रवास
आहेत पेशीपेशीत अजून
स्मृती पुंजके होऊन
गुणसूत्रात दडून
नव्या क्षणांच्या उजेडाची
वाट पाहत

कदाचित हा प्रवास
असेल अनादि अनंत
अन असेल जुळत ,
विघटन होत ,जुळत
तीच तीच माती
खनिज प्रथिने मेद शर्करेचे
लोटावर लोट वाहत

पण ज्या आधारावर
अस्तित्वाचा हा ध्वजदंड
उभा आहे युगे न युगे
हे फडफडणारे मी पण घेऊन
तूर्त ती जमीन कुणाची आहे
एवढे कळले तरी पुरे आहे  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

प्रशासन ...







नऊ महिन्यापूर्वी
माझ्याकडे एक लिस्ट होती
अगदी लहान
न आवडणाऱ्या माणसांची
हाताच्या बोटावर
मोजता येण्यासारखी.. ..
आज सहज ती लिस्ट
पाहू लागलो तर
ती भेंडोळी
जमीनीपर्यंत पसरली
आणि मग उगाचच
नको ती नावे
दिसू नयेत म्हणून
गडबडीत ती यादी
मी पुन्हा मनात दडवली 

ऐकले होते
प्रशासन सांभाळायचे
खूप तोटे असतात
अन स्वीकारलेही होते
काही प्रमाणात
पण हे जरा जास्तीच झाले
नाही का ?
तसेच ती यादी गुंडाळतांना
उडत उडत एक नाव
वाचल्या सारखे झाले
अन सारखे सारखे वाटत होते
ते नाव.....
माझे तर नव्हते ?

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...