मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

तो हा कावळा नसावा




कालच पहिला मी एक कावळा,
रस्त्यावर मरून पडलेला ,
कावळा मरून पडलेला दिसणे
तशी खूप दुर्मिळ गोष्ट आहे ,
झाडावर जमलेला काकसमुदाय
असह्य अक्रोशानी ओरडणारा
झाला शांत हळू हळू अन मग
चिंध्या चिंध्या होत तो देह
होता पडून रस्त्यावर खूप वेळ
अनेक वाहना खाली आलेला
जवळ जवळ माती झालेला ,
तो अकाली मेलेला कावळा
झाला असेल मृत कदाचित
विषाने मेलेला उंदीर खाऊन
क्वचित दोरात अडकूही ...
म्हातारे होवून कावळे मरतात
काही ऐकण्यात  नाही माझ्या !

पण त्याला पाहिल्यापासून
मला आज दिवसभर आठवत होते ते
रोज खिडकीतून दिसणारे काकद्वय ,
काड्या गोळा करण्यापासून
अंडे उबवून
आळीपाळीने पिलाला भरवणारे
चोवीस तास पहारा देणारे
मी रोज पाहत होतो त्यांच्या पिल्लाला
हळूहळू वाढतांना
त्याचे अजातपण त्याची धडपड
त्याची भीती आक्रमकता अन धारिष्ट
तो उडून जाई पर्यंत ,
आज विस्कटलेल्या पिसांचा
तो गोळा पाहून सारखे वाटत होते
देवा तो हा कावळा नसावा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...