मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

जीवनयोग

पान हलते फुल डोलते
माझ्या कानात हळूच सांगते
नुसत्या जगण्यात मजा असते

वारा हलतो धूळ उडवतो
गिरकी घेत अलगद म्हणतो
माझी चिंता मी न वाहतो

ढग जमतो पुन्हा विरतो
खेळत रंगात मला बोलतो
हरेक क्षण नवा असतो

पाणी वाहते उसळी मारते
भोवरे फिरवत हळू बुडबुडते
मी न थांबते जीवन जाणते
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

एक पौर्णिमा

मिट्ट काळोखात वर आकाशात
पूर्णचंद्र झळकत होता .
पिवळा पांढरा रंग त्याचा
शुभ्र प्रकाश झिरपत होता .
मनात माझ्या खोल आत
काही जागवत फुलवत होता.
पाहता पाहता चंद्र नभात
मी मला सोडून दिले.
किरणांच्या झोक्यावर मग  
मी पण माझे हरवून गेले .
कुणास ठावूक किती वेळ 
मीच चंद्र झालो होतो.
प्रकाशात अन् स्वत:च्या
चिंब निथळत उभा होतो .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

दार खिडक्या गच्च लावून
दार खिडक्या गच्च लावून
जाड पडदे वरती ओढून
मी बसतो ए. सी.लावून
बाहेर असो कितीही उन 

बाहेर खूप कोलाहल आहे
कुठला मोर्चा चालला आहे
पोलिसांची गाडी आणि
सायरन वाजवत आली आहे

कुठेतरी काचा तुटणार
अन् कुणाचे डोके फुटणार 
उद्या पण सारे काही
पेपर मध्ये छापून येणार  

निवांतपणे सारे वाचू
आता एक झोप घेऊ                     
फार उत्सुकता ताणली तर
चॅनल थोडे बदलून पाहू

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२

बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली २
बाळ ठाकरे नावाच तुफान
आता शांत झाले आहे
त्या निरवतेत प्रत्येक मन
आज गहिवरून आले आहे
शब्दांच्या कडकडाटात उसळणारे
भावनांच्या झंझावातात गदगदणारे
प्रत्येक लढाऊ गलबत आज
सुन्न होऊन बसले आहे
तो आवाज चिंधड्या उडवणारा
तो स्वर मित्र मिळवणारा
तो स्पष्ट घट्ट रोकठोक
टणत्कार गांडीव धनुष्याचा
आता विराम पावला आहे
हे माझ्या विद्ध मराठी मना !
तुटला जरी दोर तरीही
लढणे तुला प्राप्त आहे
चल उचल तो भगवा
तख्त दिल्लीचे, जिंकायचे आहे 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

लायक

लायक ****** नच का लायक तुझ्या मी पदाला  सांगावे मजला दत्तात्रेया ॥१ अजुनी आत का भाव न जागला  भेटी न मजला म्हणुनी ती ॥२ उघडे सताड...