बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

कृष्णाकाठी औदुंबर


कृष्णाकाठी औदुंबर
तिथे माझे गुरुवर
श्रीनृसिंह सरस्वती
भक्त प्रेमी यतिवर ||
काय वर्णावे ते स्थान
ज्या भाग्याचे वरदान
माता योगिनी येवून
नित्य करिती स्तवन ||
प्रभू रमले ज्या ठायी
धन्य भूमी तो किनारा
उर्जा असीम प्रक्षेपी
पद्खुणांचा गाभारा ||
तया ठायी प्रवेशिता
मन विसरे संसारा
नाव गाव पद सारे
गमे मातीचा ढीगारा ||
विक्रांत प्रार्थितो दत्ता
जन्म सारा जावो इथे
पुन्हा जरी येणे पडे
जन्म अन्य नको कुठे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
चांदोबा

कापसाचा गोळा चंद्र
जणू आकाशात उडे 
शुभ्र ससा गोड गोल 
ढगामध्ये धडपडे 

कधी छोटा कधी मोठा 
असा नजरेला दिसे
सांगा त्याचे डायट ते
काय असेल रे कसे

अंगावरी घालतो तो
झगा जणू जादुचाच
कसा रंग झळकतो 
होतो जणू जगाचाच 

वाटे त्याच्या सवे जावे
उंच नभात उडावे 
असा मित्र जीवलग
त्याच्या सवे गाणे गावे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

चंद्र सूर्य तारे

चंद्र सूर्य हे अगणित तारे   
सखे सोबती माझे सारे  || 
मजसाठी रवी लवकर उठतो
जग सारे सजवून ठेवतो
कधी सोनेरी कधी तांबडे
मेघांना किती रंग ते देतो ||
आणि रात्री मी घाबरता  
चंद्र हसून मज धीर देतो
शुभ्र प्रकाशी वाट दावतो
चांदण गाणे सोबत गातो ||
लुकलुक तारे आभाळ भरती
नक्षी किती वर नभात करती
मृदू रेशमी मज नीज आणती
स्वप्नदेशी सवे घेवून जाती ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

मन चंद्र झाले तेव्हा
पुनवेच्या आकाशात 
चंद्र मंद स्निग्ध होता 
शुभ्र प्रकाशाचा हर्ष
मनी पाझरत होता ।।

पानापानावर चांदी 
वृक्ष आत्ममग्न होता 
जीवनाचे गाणे धुंद 
गात सुगंधात होता ।।

मन चंद्र झाले तेव्हा
तन चंद्र झाले होते 
सौंदर्याचा अर्थ एक 
नवा उमलत होता ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

पायरीला पोहचलो

आम्ही तसे अडलेलो
देवा दारी पडलेलो
कुणीतरी कधीतरी
वाहणा की विसरलो ||

कुणी काय उचलतो
पार पार झिजलेलो
खिळे टाके मारुनिया
फेकायचे उरलेलो ||

पुढे काही गती नाही
धर्म कर्म हरविलो
वापराचे दु:ख नाही
असू जरी टाकलेलो ||

भाग्य असे थोर किती
पायरीला पोहचलो
संत चरणाचे रज
देहावरी पांघरलो ||

कातड्याला अर्थ आला
विक्रांत हा सुखावला
येई आता सेवेकऱ्या
हवे तेव्हा जाळायला ||

  डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.inशनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

स्वामी पावसचा
स्वामी पावसचा   
दूर एकांतात
समाधी सुखात
नांदतोय ||

सोहमचे आकाश
तिथल्या कणात
विश्व हृदयात
जाणतोय  ||

सोहं तोच ध्वनी
रामकृष्ण हरी
वसे सर्वांतरी
पाहतोय  ||

वर्षावी जीवनी
तयाची करुणा
विक्रांत याचना
करतोय ||

शून्याच्या पल्याड
हरवला गाव
स्वरूपाचा ठाव
मागतोय ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

गूढध्वनी
माझिया ओठात 
शब्द फुलतात 
आपुल्या नादात 
आपोआप ।।१
ज्ञानोबा तुकोबा 
गुज वदतात 
कानी सांगतात 
गूढध्वनी।।२
तयांचे उच्छिष्ट
मज महाभोग
सरे भवरोग
सहजची ।।३
नच शब्दासाठी 
थांबत मी कधी 
व्यर्थ उचापती 
करीत गा।।४ 
वृत्त मात्रा छंद
वाहून जातात
अनावर होतात
भाव जेव्हा ।।५ 
विक्रांता आवडे 
शब्दांचा पसारा 
मोकळा भरारा 
रान वारा ।।६ 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

आणखी एक संध्याकाळ ....

दूरवर हलकेच घरंगळत जाणारा सूर्य
लाटांचे अव्याहत जनन आणि मरण
धूसर प्रकाश उदास केशरी रंग अन
जागेवरच पाण्याचे पुढे मागे वाहणं


या किनारावर अगणित तरुण युग्म
येतात क्षण प्रणयात हरवतात जातात  
किती निरर्थक आणि किती क्षणिक
तरीही वाळूवर नाव कोरत राहतात  


मिलनेच्छेवर पांघरलेले प्रेमाचे कापड
अस्तित्वाच्या प्रेतावर हळूच टाकतात  
तीच सनातन चाहूल मावळतीची  
देखाव्यात चित्कारात बुडवू पाहतात


अन त्याच्या डोळ्यात दाटून येते काहूर
शून्यात हरवतो मंद खर्जातला सूर
गिळणारा अंधार कणाकणात व्यापून
जाणीवेत दाटतो आर्त प्रार्थनेचा पूर


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने  
http://kavitesathikavita.blogspot.in
डॉ.शरद पिचड

डॉ.शरद पिचड  ************ खरंतर शरद हे एक बहुरंगी बहुढंगी  बहु आयामी असे व्यक्तिमत्व आहे  त्याच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत...