हनुमान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हनुमान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

मारूत

मारुत
****** 
एक रुद्र हुंकार 
भेदत जातो सप्त पर्वत 
पृथ्वी आप तेज वायू 
सारे आकाश व्यापत 
थरथरते धरती ढवळतो सागर 
उफाळून लाव्हाग्नी 
स्थिरावतो नभावर 
मग शब्दांचे पडघम वाजवत 
डम डम डम करत 
जातो विस्तारत ओमकार होत 
त्या परमशून्याला 
कडकडून भेटत
आपले अस्तित्व हरवत 
तो राम आराम विश्राम 
त्याच्याशी एकरूप होत 
मग उतरतो खाली 
असले पण हरवत 
आपले पण मिटवत 
ती महाभक्ताची न मागितलेली 
बिरुदावली मिरवत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

हनुमान स्मरा (सवाया )


हनुमान स्मरा (सवाया )
******
महाबळी ब्रह्मचारी 
गदा जया खांद्यावरी 
करतो शत्रूचा नि:पात 
तो हनुमान स्मरा ॥

राम राम ज्याच्या मुखी 
राम भक्ता सदा राखी 
होतो दीना तारणहार 
तो हनुमान स्मरा ॥

जया अंगी अतुल बळ 
सहज उपटे द्रोणाचळ  
शक्ती युक्तीचा प्रनायक 
तो हनुमान स्मरा ॥

लंका जाळी दैत्य मारी 
काम क्रोध लोभ हारी 
साधकां जो आदर्श 
तो हनुमान स्मरा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

हनुमान



हनुमान
*****
हनुमान तिथे रामनाम
अन नाम तिथे श्रीराम ||
हनुमान तिथे जयघोष
हरतात कलीचे दोष ||
समर्पण तिथे हनुमंत
ज्ञान भक्ती मूर्तीमंत ||
स्मरा सदैव रे हनुमंत
राम अवतरेल हृदयात ||
सदैव सोबत वायूसुत
करतो रक्षण संकटात ||
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

|| हनुमान ||



पराक्रमाची परमसीमा
सामर्थ्याचा अविष्कार
अष्टसिद्धींचे भांडार
बुद्धिमत्तेचा सागर
अन या सगळ्यांचा
सर्वोत्कृष्ट वापर
जर केला असेल तर
एकाच नाव येते समोर
वीर हनुमान .
...
तुमच्याकडे कितीही
आणि काहीही असले तरीही
तुम्ही थोर होवू शकत नाही
तुमच्याकडे जे काही आहे
ते तुम्ही कशाला वापरता
यावर तुमचे श्रेष्ठत्व ठरते
श्री हनुमंताच्या चरित्रातून
हेच अधोरेखित होते
अश्या संपूर्ण समर्पणाने
डोळस भक्तीने
भक्ताचाही देव होतो
अन देवा पेक्षाही  
अधिक प्रेमाला पात्र होतो
अधिक देवळात मिरवतो
जय हनुमान  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...