सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

पळस

पळस
*****
भर उन्हाळ्यात 
रणरणत्या उन्हात 
जात असता 
उजाड  रानावनातून
अचानक
 त्या तपकिरी सुकलेल्या 
हिरवट पिवळट झाडीमध्ये 
दिसतो उठून..
पळस !
अरण्यातील संन्याशागत 
स्थिरपणे उभा स्तब्ध
जणू साधनामस्त 
आपल्यातच मग्न 
अंगावरील काट्याचे 
जीवनातील ओरखड्यांचे 
हरवून भान 
लावून ध्यान 
प्रखर उन्हात 
जणू तळपत 
तपस्येच्या तेजानं 
सारे आसमंत 
विखुरल्या पानांचे 
निष्पर्ण देहाचे 
हरलेल्या लढ्याचे 
असते अगतिक मूक मलुल
सारे काही हरवून 
सारे काही टाकून .
पण ताठ मानेने उंचचउंच 
कणाकणावर अस्तित्वाचा 
ठसा उमटवून 
आहे नाही ची खंत सोडून 
उभा असतो पळस . . .
त्याला पाहता वाटते क्षणभर 
असेच व्हावे आपण 
अन मग धमण्यातून वाहणारे 
माझे रक्त कण
होतात पळसाचे कण 
पळस अचानक 
व्यापून टाकतो 
माझे तन मन 
आणि खरोखर 
मी जातो पळस होऊन . .
माझे मीपण विसरून 
जमिनीवर ठेवलेले पाय 
जातात खोलवर 
जीवनाच्या पाहिल्या हुंकारापर्यंत
आकाशात  उंचावले हात 
हरवतात अनंत काळात 
स्वत:त हरवणा-या प्रश्नागत 
अन देहावर उमलतात फुले
प्रार्थना होवून 
माझ्याही नकळत .!!
*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...