गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

महात्मा ज्योतिबा फुले



महात्मा ज्योतिबा  फुले
******
ज्योतीबा,
तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत
जगत आहोत आम्ही
समतेची स्वातंत्र्याची फळे
चाखत आहोत आम्ही
तू पेटवलेल्या ज्योतीने
आज उजळले आहे
सारे आकाश
या भारतभूमीचे
खरंच इतके सार्थ नाव
या भूमीवर
क्वचितच असेल कुणाचे

मान्य आहे
काही विषमता आहे अजूनही
बरेच शोषणही आहे अजूनही
पण त्याविरुद्ध लढणारा अंगारही
तेवढाच तेजस्वी आहे अजूनही
अन दलदलीतून बाहेर आलेले
हे समाजमन उभे आहे आता
आपल्या पावलावर
देहावर साचलेली
सारी घाण झटकून
या साऱ्याचा उद्गाता आहेस तू
आशेचा निर्माता आहेस तू

कर्मठांच्या किल्ल्यात राहून
लखलखलास  तू
अंधारातील दीप होऊन
अग्नीत पडलेल्या गंजलेल्या
लोहकणांचा परिस आहेस तू
काताळातही शिल्प पाहणारा
शिल्पकार आहेस तू

आज जरी बहुजन वापरणारी
ढाल झाला आहेस तू
धूर्त राजकारणी
स्वार्थी मतलबी लोकांसाठी
एक प्रतिमा झाला आहेस तू
तरीही मी जाणतो की
शोषितांच्या जगातील 
पहिला सूर्य आहेस तू
कोटी कोटी नमनाचा
धनी आहेस तू 
खराखुरा आणि एकमेव
महात्मा आहेस तू

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अट

अट *** कधी शब्दावाचून कळते प्रीत कधी शब्दावाचून अडते प्रीत ॥१ करून दूर ते लाखो अडसर  मौन फुलांनी हळू भरते अंतर ॥२ नजर नजरेस भिडल...