बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

पूजन

पूजन
******
करावे पूजन लाख रुपयांनी 
माझे न म्हणुनि सर्व फळ ॥१

घडावे पूजन रिकाम्या हातांनी
जीव हा वाहुनी देवापुढे ॥२

तर ते पूजन अन्यथा व्यापार 
घडे स्वाहाकार स्वार्थासाठी ॥३

खरे ते पूजन येतसे घडून 
कामने वाचून ऐहिक रे॥४

करावे पूजन घडण्या स्मरण 
देवास जाणून घेण्यासाठी ॥५

सगुण निर्गुण अवघे मिटून 
माझे मी पण जाण्यासाठी ॥६

विक्रांत शरण दत्ताचिया दारी 
वळून अंतरी मागे भक्ती ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

साहस

साहस
******
ओठावरी कुणाच्या ते  
शब्द होते अडलेले 
मनी होते युद्ध तरी 
पराभव ठरलेले ॥
नको नको म्हणे मन 
बंधनात अडकले 
उडायचे होते पण 
पंख कुणी कापलेले ॥
तेच भय पुरातन 
अणुरेणू  व्यापणारे 
तहानले प्राण परी 
पाणी नको म्हणणारे ॥
सुरक्षेची जीत झाली
साहसाचा जीव गेला 
जी जी म्हणे धनी कुणी
ठरलेल्या शृंगाराला ॥
मेले जरी मन तरी 
जगणे ते प्राप्त होते 
अन खुळे स्वप्न निळे 
तुटलेली वाट होते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

भक्ती प्रकार


भक्ती
****:
धनिकाची भक्ती देव रावुळात 
राहे मिरवत ऐश्वर्याने ॥१
रत्न हिरे मोती बहुत सजती 
पहारे बसंती शस्त्रधारी ॥२
परी ती ही असे देवा दारी भक्ती 
कृतज्ञता व्यक्ती रूपा आली ॥३

जया न ऐपत पैसा न खिशात 
तया सुमनात तीच श्रद्धा ॥४
भाव हाच देव अंतरी नांदतो 
बाकी साधने तो अर्थ नाही॥५
होवून याचक देवाच्या दारात 
तया ही भक्तीत न्यून नाही॥६

पोटासाठी पूजा पोटासाठी मंत्र 
कमावणे तंत्र व्यवहारी ॥७
करती पुजारी तयाही अंतरी 
नांदतो श्रीहरी त्याची कृपा ॥८
घडते पुजाही देवाच्या मर्जीने
कुण्याही हाताने उगा नाही॥९

देवालागी सारी सारखी लेकरे 
देवा जो हाकारे तया भेटे ॥१०
विक्रांत भक्तीत नसे छोटा-मोठा 
मुंगी ऐरावता एक लाभ ॥११
अनन्य शरण  होताच देवाला 
देव ये हाताला  सहजीच ॥१२

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

दिवा


दिवा
*****

जळतो दिवा तेल भरला 
चिंता उद्याची नच तयाला ॥१

उजेडाने सारे भरे आसमंत 
निर्धास्त निवांत जळे वात ॥२

सरते घंटा सरती पळ 
दिसू लागतो समई तळ ॥३

क्षीण प्रकाश येई झाकोळ 
सरे कर्तव्य जमे काजळ ॥४

तोही प्रकाश हाही प्रकाश 
दिप म्हणे उजळीत  आकाश॥५

आणि क्षणात वात वाढते 
घर प्रकाश वादळ होते ॥६

झरझर प्रभा पुन्हा निमते
तैल गंध अन  सोडून जाते॥७

अंधार होतो तवंग सरतो 
दीप अंधारी डोळे मिटतो ॥८

असेच जगणे असते बाई 
कळते कोणा कळत नाही ॥९

दिप दगडी जरी देवाचा 
विक्रांत वाहतो जन्म रोजच॥१०

काचा

काचा
*****

फुटक्या काचांनीही 
काही चित्र बनतात 
तर फुटक्या काळजांनी 
काही कविता होतात 

फुटली म्हणून काय झाले
तुटले म्हणून काय झाले
सुंदर तर ते तेव्हाही असते
वर वर पाहता दिसू न येते 

तसे तर नसते कधी जरुरी 
लिहिणे काही या घटनेवरी 
पण कुणी लिहितो म्हणजे 
नक्कीच मिळते काहीतरी 

ते सदैव जीवा सुखावते 
अन लडीवाळ स्मृतीत नेते 
म्हणून काचा जपणे असते 
टोचल्या तरी राखणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

जाणे

जाणे
****
आता घडेल रे तुझे जाणे 
पुन्हा पाहणे वा नच पाहणे 
सताड शून्यात उगा बसणे
त्या क्षणांना फक्त आठवणे 

का ही कथा अशीच असते 
लाट येताच पाणी भरते 
पाणी अखेर पाणी असते 
पुन्हा वाहून जाणार असते 

किती खोल हे क्षण टोचती 
हाय जीवाला जगू न देती
परी खंत ना मनी उमटती 
रे खरेच केली होती प्रिती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

तुझ्याशिवाय


तुझ्याशिवाय
**********
तुझ्याशिवाय 
कविता लिहिणे 
स्वप्न पाहणे होत नाही 

बळे बसवतो 
कुणास मनात 
भावभावनात उगा जरी 

परी तो आवेग
आस ना उत्कट 
जीवास चिरत जात नाही

तू दिलेस जे 
सुख सोनेरी 
घाव दुधारी  जगण्याला

ते जगणेही 
मागे पडले 
आणिक उरले शून्य पाही

रिक्त एकटे 
फक्त असणे 
शाप भोगणे जसा काही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .


मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

दत्त भावला


दत्त भावला
*********
दत्त  भावला 
मनात धरला 
जन्म लावला पणास मी ॥
पडो देह आता 
तयाच्या दारात 
घडो जे मनात असे त्याच्या ॥
दत्त माझे गीत 
दत्त माझी प्रीत 
दत्त मनमित जन्मोजन्मी ॥
बांधुनिया खुण- 
गाठ या मनात 
राहे स्मरणात तयाच्या रे॥
दिला जो तू भाव 
व्हावा घनदाट 
प्रार्थतो विक्रांत दत्ता तुज॥


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

मागणे


मागणे
******

दिसो मजलागी मानअपमान 
दत्ताचे चरण सम दोन

आली सुख दु:ख जी काही वाट्याला 
साहता तयाला येवू दे रे

घडो संतसंग भेटोत दुर्जन
पाहू दे समान दोघालागी

पिडा आधीव्याधी प्रारब्ध वा शाप
नुमटो संताप भोगतांना

देह जाऊ देरे देहाच्या वाटेने 
तया हे जगणे भाग इथे 

परी या मनाची करून गुंडाळी 
दत्त पायतळी ठेवियली

विक्रांता वासना आणिक कामना 
दत्त प्रेमाविना नको आता 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ . 

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

ज्ञानदेव

ज्ञानदेव
*****

माय बाप सखा माझा ज्ञानेश्वर 
कृपेचा सागर गुरुदेव ॥
भरवतो मुखी घास मोतियाचा 
ज्ञानाचा भक्तीचा हळुवार ॥
राहूनिया स्थिर खोल अंतरात 
राही झंकारत नामवीणा ॥
शब्दमूर्ती त्याची पुजतो सतत 
प्रेमी उच्चारत ओव्या फुले ॥
परी आर्त एक अजून मनात 
रूप डोळीयात पडले ना ॥
दिव्य पाय धुळ लावावी ती भाळा 
यावी एक वेळा माय भेटी ॥
विक्रांत संताच्या दारीचा याचक 
माऊलीस हाक मारतसे ॥
तयाच्या शब्दांचा ठेवी देवा मान 
कृपा वरदान देई मज ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

आवेग

आवेग
*****
टाळूनही तुज सख्या
मज टाळता न येते
लावूनही तावदाने 
हे वादळ न टळते

व्यापून तना मना तू
असा खोल रुतलेला
वळताच कुस थोडी 
ये जाग तव स्मृतीला

जगतेच मी भ्रमात 
बघ तुझ्या स्मरणात 
फुलतो मोहर नवा 
भरूनि हर क्षणात 

ती झिंग लोचनातील
मम लोचनात आली
त्या कृष्णकलापातील
मी झुळूक एक झाली

वेडयाच उपमा जरी 
मज त्यात त्याच येती
प्रत्येक बहरातील 
आवेग नवे असती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

हौस

  
हौस
******
कामनेचा खेळ 
पुरे हा दयाळा 
घेई रे पदाला 
तुझ्या आता ॥१

फाटलेले वस्त्र 
जरी भरजरी 
पुसण्यास परी 
राहू दे रे ॥२

नको पांघरूस 
नको मिरवूस 
पुरव  रे हौस 
भक्तीची ही ॥३

राहू दे होवून 
तुझा दास आता 
आणिक विक्रांता 
नको काही॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

आलीस तू


आलीस तू
********:
आलीस जीवनात तू
होउनिया मधु ऋतु 
किती वाणू सखी तुला 
स्वर्ग माझा झालीस तू ॥

लाखो सलाम तुजला 
सखी लाखो कुर्निसात 
देऊ धन्य वाद किती 
जीव तुझ्या पावुलात ॥

चांदण्याचे मन झाले 
श्वास सुगंधाचे रान 
ये माधुर्य आकाराला 
जीव झाला हा कुर्बान ॥

मोहरून कणकण 
जणू झालो आम्रवन 
रूप रस गंध रंग 
तृप्त झाले हे जीवन ॥

तुझ्यासाठी जन्म झाला 
तुझ्यासाठी हे जीवन 
वांछा मनी हीच यावे 
तुझ्या कुशीत मरण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

हिरवी पानं


हिरवी पान
******
तशी तर असंख्य हिरवी पानं 
लहरत असतात 
जीवनाच्या वेलीवर 
आणि प्रत्येक पानाला
जगायचं असतं
कोवळ्या पोपटीपणातून 
कच्चं हिरवं व्हायचं असतं
ऋतुच्या सोहळ्यात 
डोलायचं असतं

तरीही ती गळून पडतात 
खाली कोमजलेल्या अंगानं 
अकाली ओघळून
आपलं हिरवेपण अंगावर पांघरून 

तेव्हा जीवनाचे तज्ञ असतात 
वाद घालत मोठमोठ्यानं
मुठी आवळत टेबलावर आपटत
आपली मत पुन्हा पुन्हा मांडत
अन
दिवाणखान्यातील कृत्रिम बागेत 
आणि गप्पा ठोकत 
संवर्धनाच्या समानतेच्या 
सुख समाधानाच्या 
हरितक्रांतीच्या 
तेव्हा वाऱ्यानं वाहून 
आलेली ती पानं
सेवेकरी असतात झटकून टाकत 
बाहेरच्या बाहेर 
निर्विकार मनानं

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

दत्त फुंकर

दत्त फुंकर
********

डोह कळला आतला सोंग संसार हा झाला 
काही भोगला टाकला खेळ मनाचा हा सारा 

होतो उगाच वाहत काळ थोडा थबकला 
होतो उगाच मरत देह खोडा जाणवला 

मन मुरले मनात काही टाकाटाकी झाली 
सृष्टी सृजली वाढली दृष्टी जडव्याळ झाली 

दीप मिटता सकळ छाया गेल्या अंधारात 
कोणी गिळले कुणास कोण मरे प्रकाशात 

शब्द लिहितो विक्रांत हाले सावली झोतात 
आले शून्यातून वर्ण अर्थ पेटले मनात

दत्त फुंकर कानात त्याचे नभी पडसाद
आले रोरांवत पानी गेले बुडून जगत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

अपेक्षा

अपेक्षा
******

अपेक्षात तातडीच्या कार्य सारे बिघडते 
मागतांना दान मोठे झोळीच फाटून जाते 

दाता मोठा दानशूर देतो डोळे मिटुनिया 
माग मागे भिकारी जो त्यास हवे हसावया 

मुठभर आले हाती जोंधळे वा रत्न काही 
लायकी वाचून कुणास काही रे मिळत नाही 

एकदाच कुणी देतो पुरे ते बघ असते 
पेटता ज्योत दिव्याने दिवाच होणे असते 

भिक झाली बहु तुज आता चुल तू पेटवी 
आत्मतृप्त ढेकरीत बोधात जीव निजवी 

सांगतो मित्रास मित्र वेळ आहे ठरलेली 
म्हणू नकोस विक्रांत मैत्री नाही निभावली

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

स्व समर्पण

स्व समर्पण
*******::

कधी जगण्याच्या सरताच वाटा
उरचि फुटतो उगाच धावता ॥

जरी ते निशान पुढे फडफडे 
परंतु सामोरी  तुटलेले कडे ॥

कळते ना कशी  वाट ती चुकली 
अन परतीची वेळ दुरावली ॥

तर मग तेव्हा एकच करावे 
तिथेच रुजावे  अन झाड व्हावे ॥

जसे स्वीकारते बीज ते इवले 
घडले तयास म्हण घडविले ॥

निळ्या नभावर अवघे सोडावे
आपण आपले निशान रे व्हावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

काज

काज
*****

जगण्याचे काज माझे होवो दत्त
तया स्मरणात जन्म जावो ॥

नको रे पदवी नको जयकार
खोटा व्यवहार नको आता ॥

नको उठाठेव आवडी जगाची
धनाची मानाची वांच्छा नको॥

हरवता पाश आणिक पिपासा
श्री दत्त आपैसा हाती येतो ॥

संतांची वचने धरुनी या मनी
जीवनाची धुनी केली देवा ॥

जगु दे विक्रांत दत्त स्मरणात
होवो वाताहात मनाची या ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

दत्त माझा


दत्त माझा
********
दत्त माझे चित्त दत्त माझे वित्त 
दत्त माझा मित जन्मोजन्मी ॥
दत्त माझे तप दत्त माझे जप 
दत्ताचेच रूप राहो चित्ती ॥
दत्ताविन मज अन्य  कुणी नाही
व्यापुनिया  राही दत्त एक ॥
दत्त माझे काम दत्तची आराम 
जीवाचा विश्राम दत्तात्रेय 
अवघा जन्म हा दत्ताला वाहीला 
मनी न उरला किंतु काही 
दत्त पाठीराखा जीवलग सखा 
भेटला विक्रांता कृपा त्याची

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

sense


sense
********
Like a drop of oil 
I am flowing floating 
in the river of life 
spreading on the surface and
going deep into bottom 
trying my best 
to become a part of it

but every minute particle 
and atom of it 
is detached by default 
Though 
its existence is negligible 
it seems it is part of life 
amalgated into it .
but the deep sense of separation 
in the molecules 
is always there 
continuously 
Hope it will get deposited somewhere and 
evaporate into 
burning sunlight 
along with the sense of 
separate  existence .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

विसरलीस तू


विसरलीस तू 
*************

विसरलीस तू  मला 
पण हरकत नाही.
शेवटी जीवन म्हणजे 
तरी काय असते
आनंदाने जगणे असते
कुणाच्या विरहात जगण्यापेक्षा
कुणाच्या सहवासात जगणे 
अधिक सुंदर असते.

कोण अधिक हुशार
कोण अधिक  रुबाबदार 
याला काही अर्थ नसतो.
हातातला गुलाबच 
सर्वात सुगंधी असतो.

रडूबिडू नकोस कधी
हास आपल्या वेडेपणाला 
आठवण आली जर कधी
बघ नक्की जमेल तुला

कालचा दिवस छान होता 
तर मग आजचा पण आहे 
काल जीवलग साथ होते
तसेच तर आजही आहे 

सखे बदलतात सोबती बदलतात 
शब्द बदलतात स्पर्श बदलतात 
पण अंतरात उमटणार्‍या 
भाव अन संवेदना तर त्याच असतात .

त्या उमलणार्‍या क्षणाशी
त्या खळाळत्या भावनाशी
 प्रामणिक  राहणे म्हणजेच तर
जगणे असते .


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

सावरकर.


सावरकर (पुनर्लेखन)
*******
ज्याच्या घरात 
तात्यासाहेब सावरकरांना मान आहे 
आदर आहे
त्याच्या मनात 
सावरकरांचे शब्द असणारच  
ज्याच्या मनात सावरकरांचे शब्द आहे.    त्याच्यामध्ये आग ही असणारच 
ती आग साधीसुधी आग नसते 
ती यज्ञवेदित धडाडणारी 
पवित्र ज्वाला असते .

त्या शब्दांचे किती  ऋण आहे माझ्यावर
हे मी जाणतो
आत्मग्लानीतून स्वधर्म लांच्छनांच्या 
मी बाहेर पडलो 
ताठ मानेने हिंदुत्वाच्या तटावर
मी उभा राहीलो 

या  माझ्या अन अश्या अनंत मनाला 
परकीय सत्तेने भाषेने  संस्कृतिने
आणलेले तमोमय मलिन मळभ
दूर सारले त्या शब्दांनी.

या धर्मातील अनिष्टता ही
जाणली मानली 
ती दूर करायचे धारिष्ट  व बळ दिले
दृष्टी  उघडली

धर्म विज्ञान संस्कृती देश भाषा 
यांची सारी परिमाणे बदलली
जी कधीच कळले नव्हती

मनावर लादलेली लावलेली
खुज्या महापुरुषांची खोटी चित्रे
दिली टरकावून फाडून फेकून

होय भाजले मन तेव्हा 
ओरखाडेही उमटले 
पण लखलखीत झाले  पात्र 
सार्थ अन व्यर्थ कळले

सरकारी शालेय पुस्तकात 
सावरकर तसे नव्हतेच
असेलच तर एका पॅरा मध्ये
अभिनव भारताशी जोड्या लावायाला 
उपयोगी पडायचे 

किती कद्रुपणा हा.
पण ते ही बरे झाले 
अंध भक्तीभावाने 
नाही स्विकारले मी त्यांना 

कारण आता ते व्यक्ती नव्हते
एक जीवन दृष्टी होते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

दत्त माया अनघास


दत्त माया अनघास
**************
नेई मज माये दत्ताच्या अंगणी 
जाऊ दे रंगुनी तया द्वारी ॥
दत्त अंगणाची माती देहावरी
पांघरून सारी घेईल मी ॥
अन तयाकडे राहील पाहत
आनंदाने गात गीत त्याचे ॥
पाहिलं साजिरे रूपते गोजिरे  
आनंदाचे वारे  होवुनिया॥
हरवून भान दत्त होवो मन 
असण्या कारण हरवून ॥
विनवी विक्रांत करी करूणा गे
नेई मज वेगे दत्त वाटे ॥
ओलांडून तुज दत्त भेटी नाही 
कळू आले काही मजलागी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ६

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

Funeral

Funeral.
********

I didn't go to see his body 
yes dead body 
I didn't go for his funeral 
how can I see it ?
yes I don't dare 

I don't dare to see dead body 
of my Beloved friends and relatives 
so their image in my mind 
never die .
when you don't meet anybody 
years after years 
in a way you are dead
to each other 
but their image  is always alive
in your mind 
and as long as it is alive 
the relation is alive 
there is life .

when one sees a dead face 
of dear one.
One also dies along with it 
part of his is burning buring 
going to the land of no return
so I never attend funeral 
Much possible as 
and I wish you 
Also not to come for mine  .
keep me alive 
as long as you are.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 12

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

डॉक्टर तांबे श्रद्धांजली

डॉक्टर तांबे श्रद्धांजली 
****
काही चेहरे काही व्यक्ती 
मनावर कोरल्या जातात 
अगदीच खास अशी जवळीक 
नसून सुद्धा आपल्या असतात 
डॉक्टर तांबे 
काही वर्षांपूर्वी ज्याच्या सेंड ऑफला 
मी कविता लिहली 
त्याच्यावर शोक संदेश पर कविता
लिहली जाणे हे अतिशय दुःखद आहे 
त्याच्या आकस्मित जाण्याने 
झालेली ही कटू जखम 
खोलवर सलत आहे 
त्याच्याशी तश्या फार गप्पा 
नाही मारल्या कधी 
त्याच्या खांद्यावर हात ठेवून 
चाललो नाही कधी 
जीवनातील घटना आठवणी 
व्यक्तिगत कौटुंबिक सुखदुःख 
शेअर केले नाही कधी 
पण रुग्णालयाच्या कंपाउंडच्या 
भिंतीमध्ये असलेली ही मैत्री  फक्त 
सहकारी या नात्यापुरतीच मर्यादित नव्हती 
त्याच्या बोलण्यात वागण्यात असणारा 
मैत्रीचा स्नेहाचा अंश 
समोरच्याला आपला करून टाकायचा 
आणि त्या आपल्याश्या केलेल्या त्याच्या
अगणित मित्रांमध्ये मी होतो 
तांबे च्या निवृत्तीनंतर 
आम्ही क्वचितच भेटलो
 काही कामे फोनवर झाली 
काही संवादही फोनवर झाले 
पण आवर्जून भेटावे तेवढे 
खास कारण झालेच नाही
कदाचित आणखीन काही वर्षेही 
आम्ही भेटलो नसतो 
पण ज्याच्या जाण्याने मनात खड्डा पडतो 
ज्याचे जाणे एक आघात ठरतो 
तो तुमचा खरोखरच 
जवळचा मित्र असतो 
आप्त असतो आणि आप्त जाणे 
यासारखी दुःख नसते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

तुच लिहतोस


तूुच लिहितोस
*****::::*****
तूुच लिहितोस दत्ता तुझे गाणी 
मज मोठेपणी मिरवतो ॥

माझी न साधना असे भक्ती उणा
कृपेच्या कारणा तुची होशी ॥

तुझा हा प्रसाद तुजला वाहतो 
आनंद भोगतो दिला तू जो ॥

आणि वाणू काय ठेविलेस पायी
ऐसिया उपायी करूनिया॥

शब्दो शब्दी दत्ता राहा उमटत 
जेणे मी मनात पाही तुज॥

शब्दासवे जावा विक्रांत हा होत
पाय धूळ फक्त तुझी दत्ता॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ५

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

सांगावा

सांगावा
****:
धाडला सांगावा दत्तात्रय देवे 
भक्ताचिया सवे मजलागी ॥

दत्ताची कवणे ज्ञानदेव भक्ती 
येऊ देत पंक्ती सुंदरश्या ॥

माझिया सेवेचा खारीचा हा वाटा 
तुज भगवंता पोहोचला ॥

भक्तांच्या रुपी राही भगवंत 
होऊनिया मूर्त प्रेमळ ती ॥

स्वीकारी आदेश जोडोनिया कर
विक्रांत सादर सेवेलागी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ४


शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

आधीव्याधी


आधीव्याधी
*********
दिल्या आधीव्याधी जरी त्या प्रभुने 
प्रारब्धवशाने आल्या किंवा ॥
दवा हि प्रारब्ध पथ्य ही प्रारब्ध 
भोगणे प्रारब्ध बरे होणे ॥
वेळ येता नच पथ्य कामी येते 
दवा न लागते देहास या ॥
कुणाची काय ती असे वेळ इथे 
ठाऊक नसते कुणालाही ॥
नियमात सारे बांधलेले जग 
नियमात वाग सांगे ऋतू ॥
देह तो  टाकणे आज वा उद्याला 
मग ही कशाला चिंता उरी ॥
आधी व्याधी तना षडरिपू मना 
चालला सामना चालू दे रे ॥
हाती आला क्षण दे रे स्मरणाला 
आळवी प्रभूला पुन्हा पुन्हा॥
देह त्याचा आहे मन त्याचे आहे 
निसंगत्वे राहे जगतात ॥
देवे दिली वृत्ती ज्योतही पेटती 
सदोदित चित्ती आस त्याची ॥
जगतो विक्रांत जग राहटीत
 पथ्य नियमात खेळे उगा  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ १

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

कळेना

कळेना
*******

मजलागी जग हे कळत नाही 
कोण खरे खोटे उमजत नाही 

कधी पाहतो मी रावणात राम 
कधी पांघरून रावणास राम 

कुणी वाहतात कुण्या मोहनात 
कुणी हरवती कुठल्या भ्रमात 

कुणा काय हवे कधी न कळते
बोलणे साऱ्यांचे खरेचि वाटते 

टीचभर पोट  कुणाचे भरेना 
हवेपणा मोठा ठासलेला मना 

कोण कुठे जातो ते दिसत नाही 
हरवला कुठे सापडत नाही 

रूपाला साजऱ्या होतो वश कधी
पैशास चार नि जाणे यश कधी

पुढले पाढे तेच  पंचावन्नाचे 
सुख लाचावल्या लुब्धक जगाचे


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ १बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

जाणल्यावाचून

जाणल्यावाचून
************
जाणल्यावाचून 
जाणतो मी तुला 
पाहिल्या वाचून 
पाहतो मी तुला 

अर्थ ना शब्दात 
सुर ना श्वासात 
घडतो संवाद 
तरीही डोळ्यात

ओढ ही कसली 
तनाला मनाला 
तिढा हा कुठला 
कुण्या जन्मातला 

तुला न कळते 
मला न कळते 
ओठातले गाणे 
ओठात थांबते 

मौनात मनाच्या 
केशराचे रान 
कस्तुरी सुगंध 
धुंद माळरान 

देहात चांदणे 
निळे झिरपते 
सुरांच्या वाचून 
मन झंकारते


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कळते


कळते
****
जगलो जरी इथे मी 
कळते 
जगणे राहून गेले 

फुललो वसंतात इथल्या 
कळते 
उधळणे राहून गेले 

मारल्या  गाठी अनेक 
कळते 
उलगडणे राहून गेले 

चांदणे तुझेच होते 
कळते 
देणे राहून गेले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


निरोप

निरोप ****** धुणीचा निरोप समिधास आला  वन्ही धडाडला आकाशात ॥१ वाजे पडघम तुतारी सनई  मिलनाची घाई बहू झाली ॥२ उधळली फुले रांग तोरणा...