गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

सुटू द्यावे

सुटू द्यावे
*******
असते सदैव 
साथ का कुणाची 
सुटतात हात सुटू द्यावे ॥

खेळ जीवनाचा 
पहायचा किती 
मिटतात डोळे मिटू द्यावे ॥

हातात नभाच्या 
असतेच काय 
फुटतात मेघ फुटू द्यावे ॥

येता ऋतूराज 
फुलतात वृक्ष 
जगतास गंध लुटू द्यावे ॥

सरताच ऋतू 
गळतो बहर
विटतात रंग विटू द्यावे ॥

येताच भरून 
सुचतेच गाणे 
हृदयात दुःख उमटू द्यावे ॥

सुखाचे दुःखाचे 
चीर जीवनाचे 
मनाला तयात लपेटू द्यावे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...