रविवार, १६ मार्च, २०२५

ज्ञानदेवा - प्रार्थना


ज्ञानदेवा - प्रार्थना
***************
उगमाला ओढ सदा सागराची 
तशी ह्या जीवाची दशा होय॥१

नुरो माझेपण उरो तुझेपण 
घडो समर्पण ऐसे काही ॥२

सरो माझी वाट तुझ्या आळंदीत 
वळणे परत घडू नये ॥३

सरो माझे श्वास तुझ्या गाभाऱ्यात 
देह निर्माल्यात जमा व्हावा ॥४

अस्तित्व कापूर पेटो धडाडून 
नुरावे निशाण इवलेही ॥५

इतुकी प्रार्थना माझी ज्ञानदेवा 
तुझाच मी व्हावा माझेविना ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

शनिवार, १५ मार्च, २०२५

रंग

रंग
***"
उधळलेस रंग किती 
रंगीत झाले जीवन 
सरुनही सण सारे 
उतरती न अजून ॥

रंग तुझ्या डोळ्याचे 
रंग तुझ्या स्पर्शाने 
रंग तुझ्या लोभाचे
रंग तुझ्या रागाचे ॥

जीवनाची सारी पाने 
गेली रंगीत होऊन 
उलटून पाहताना 
गमती ताजी अजून ॥

तुझ्यामुळे मजलागी 
रंग जीवनाचा कळे 
प्रेम विरह ओढीचे 
इंद्रधनु मनी झुले ॥

उधळले काय किती 
मी मज नच स्मरते 
हासू तुझ्या डोळ्यातले 
कृतार्थ मज करते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

गुरुवार, १३ मार्च, २०२५

येणे जाणे

येणे जाणे
*******
माझे असणे तुझ्या मधले
कळल्याविना मजला कळले ॥१

असो थांबले असो वाहिले 
वारे नभात सदैव भरले ॥२

ऋतु ऋतूत रंग वेगळे 
तप्त कधी वा थंड गोठले ॥३

कधी धुरात धुक्यात भरले 
आकाश परि ना कधी मळले ॥४

तुझ्याविना न काही इथले
असणे नसणे माझे कुठले ॥५

देणे तू तर होऊन गिळले 
घेणे मग मज नाही उरले ॥६

तुझा असे मी सदैव तुझा रे 
येणेजाणे हे कधी न जाहले ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १२ मार्च, २०२५

माय

 
माय
****
अजात पाखरावर 
आपल्या पंखाची 
पाखर घालणारी 
माय कधी मरू नये 
प्रेमाने सौख्याने मायेने  
घर सांभाळणारे
आधार कधी मोडू नये 
या तुझ्या जगात देवा 
सुख भरपूर आहे 
घे सारे परत हवे तर पण 
बाल्य कुणाचे करपू नये 
होय मला मान्य आहे 
तुलाही मर्यादा आहेत 
जन्म मरणाचे नियम तुझे  
सारेच निष्ठूर आहेत
पण तिच्याशिवाय सांग 
आम्ही तुला कुणात पाहू रे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

सोमवार, १० मार्च, २०२५

डॉ उषा म्होप्रेकर मॅडम (श्रद्धांजली )



डॉ उषा म्होप्रेकर मॅडम माझी प्रिय बॉस  (श्रद्धांजली )
************************
चंद्राची शीतलता आणि सूर्याची तप्तता  
धारण केलेले व्यक्तिमत्व होते 
म्होप्रेकर मॅडमचे 
ती शीतलता प्रियजनावर ओसंडणारी 
अविरत निरपेक्ष आणि भरभरून 
जी अनुभवली आहे आम्ही सर्वांनी
आणि ती तप्तता जी नव्हती कधीच 
जाळणारी पोळणारी छळणारी 
परंतु होती सुवर्णतप्त 
कर्तव्यनिष्ठतेच्या पदाच्या अधिकाराच्या सन्मानातून आलेली

प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून 
एम टी  अगरवाल हॉस्पिटलमध्ये 
त्यांनी केलेले काम 
होते अतिशय प्रामाणिक 
स्वच्छ आणि पारदर्शक  
कोणाच्या एका रुपयाचे मिंधेपण नसलेले
स्वच्छ निष्कलंक जीवनाचा त्या आदर्श होत्या 

प्रमुख वैद्यकीय अधिकारी या पदाचा 
त्रास त्यांनी तेवढ्याच सामर्थपणे पेलला 
जेवढा त्या पदाचा आनंद त्यांनी घेतला
मित्र आप्तेष्टा सोबत अतिशय मनमोकळेपणा
 प्रामाणिक लोकांबद्दल प्रचंड आस्था 
 ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती

काही लोक त्यांना खरोखर
मनापासून आवडायचे नाहीत 
परंतु त्यांना दूर ठेवूनही 
त्यांच्याबद्दल कुठलीही सूड बुद्धी आकस 
न ठेवता  वागल्या त्या.

एक अतिशय उदार मित्रप्रिय 
स्वाभिमानी करारी निष्कलंक 
निर्भय प्रामाणिक व्यक्तिमत्व 
आज आपल्याला सोडून गेले आहे . 
अशा व्यक्तींचे जाणें हे मित्रांसाठी 
आप्तांसाठी  फार मोठे नुकसान असते 
पण समाजासाठी एक हानी असते
या माझ्या प्रिय बॉसला आदरांजली .
परमेश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

रविवार, ९ मार्च, २०२५

वेध

वेध
****
क्षणात एका नसतो आपण 
जेव्हा सरते ठरले जीवन ॥१

कधी कुणाला कळल्या वाचून 
दिवा जातसे तमी हरवून ॥२

या असण्याला अर्थ असावा
अन् जाण्याला शोक नसावा ॥३

कधी न थांबतो काळ चालला 
जन्म मृत्यू गाठीत अडकला ॥४

जगी दिसे हा खेळ चालला 
कळल्या वाचून अर्थ बुडाला ॥५

काय पुन्हा ते असेल जन्मणे
ठाव जरी ना तरीही मानणे ॥६

 प्रश्न उरीचे सुटल्या वाचून
कुणी फिरे उगाच वणवण ॥७

मिटले पदरव जिथे प्रश्नांचे
वेध लागले मज त्या तीराचे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..


शनिवार, ८ मार्च, २०२५

पारिजातक

 पारिजातक
*********
महाडला असतांना शेजारच्या 
रवळेकरांच्या अंगणातील 
पारिजातकाची फुले
कोकणेच्या पाण्याच्या टाकीवर पडायची
अन् भाडेकरू असल्याने 
लाभ तिकोनेंना व्हायचा .

पारिजातकाच्या या खोडकर सवयी बद्दल 
फार पुढे कळले .
पण ती माझी पहिली ओळख 
पारिजातकाच्या फुलांची .
तो मंद सात्विक स्वर्गीय गंध 
जेव्हा भरला तना मनात 
तेव्हापासून मी झालो कायमचा ऋणी त्यांचा 

पारिजातकचा तो कोमल मृदुल हळवा स्पर्श
जाणवतच नाही हाताला
जणू तो जाणवतो सूक्ष्म देहाला 
खरतर स्थुळपणे त्याला नजरेचाच स्पर्श 
पुरा असतो आपला

ती फुले जणू जीवन जगत असूनही
जगाला न जाणवणारा संघ असतो 
सौम्य शालीन संन्याशांचा 
विरक्त भगवे वस्त्र देहावर ल्याईलेला 

परडी भर फुले देवाला वाहिली की 
देवघर रूप गंधानी भरून जाते
पण दुसऱ्या दिवशी 
त्यातील एकही फुल चटकन दिसत नाही .
जणू अस्तिव शून्य करून  मिटतात ती
प्रभू चरणाशी .
अन्  उरतात 
हवेच्या झुळकीने क्षणात उडणाऱ्या काही
धूसर पार्थिव स्मृती .

पारिजातक मला देत असतो एक धडा 
विरक्त तरीही सुंदर शालीन जीवनाचा 
क्षणात आयुष्य जगायचा .
अन्  सर्वस्व उधळायाचा  .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..


ज्ञानदेवा - प्रार्थना

ज्ञानदेवा - प्रार्थना *************** उगमाला ओढ सदा सागराची  तशी ह्या जीवाची दशा होय॥१ नुरो माझेपण उरो तुझेपण  घडो समर्पण ऐसे का...