गणेश गणपती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गणेश गणपती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

विघ्नराज




विघ्नराज 

करतो रक्षण 
उपाधींपासून 
देव गजानन 
कृपाळूवा 

करतो खंडन 
विघ्नांचे येऊन 
प्रेमे वेटाळून 
सवे नेई 

जाहलो पावन 
तुम्हाला भजून 
अमृत होऊन 
कृपा त्यांची ॥ 

अहा विघ्नराज 
जवळ घेतले
मार्गी चालवले 
साधनेच्या ॥

घडली संकष्टी
देवे कृपादृष्टी 
स्मरणाची प्रीती 
देऊनिया 

विक्रांत चरणी 
जाहला सादर 
भार देवावर 
सोपवूनी॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, २४ मार्च, २०१९

ॐ गणेश

ॐ गणेश

गणेशा प्रती हे 
मन लाेभावते 
जडून राहते 
निरंतर 

गणेशाची छबी 
येता चित्तावर 
आनंद लहरी 
देह होतो

सूत हा शिवाचा 
अंतक विघ्नांचा 
तारक भक्तांचा 
कल्पद्रुम 

ओघळते सुख 
गणेशासोबत 
दुःख क्षणार्धात 
दूर जाते 

गणेश कृपेने 
दिशा ती दिसती 
गतीही मिळती 
सर्व कार्या

म्हणून तयास 
हृदयी धरावा 
प्रथम वंदावा 
सर्वभावे 

तया प्रकाशाने 
विश्व उजळतेे
आनंदे भरते
कण कण

गणेश भक्ताला 
कसली फिकीर 
हात पाठीवर 
त्याचा सदा 

देवा विनायका
रहा स्मरणात 
शब्द कौतुकात 
विक्रांतच्या

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

देव गजानन


देव गजानन
*********

हालवितो सोंड
फडफडी कान
आनंद निधान
गजानन

हासतो मधुर
सोंडेच्या मागून
मिश्किल डोळ्यान
पाहतसे

ध्यान लंबोदर
सुबक ठेंगणे
पायात पैंजणे
वाजतात

मस्तकी देखणा
मुकुट विशाल
मिरवितो भाल-
चंद्र छान

मूषक वाहन
ठेविले धरून
विश्वा या देऊन
अभय ते

दंत टंक करी
ज्ञानाचा वर्षाव
अज्ञान अभाव
सज्जनांस


पाश अंकुशाचा
धाक कळीकाळा 
भक्तांचिया गळा
कृपा हार

अैसा पाहियला
देव गजमुख
झाले प्रेमसुख
विक्रांत या

c.डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

बाप्पा निघता



बाप्पा निघता
********

बाप्पा निघता गावाला 

डोळे पाण्याने भरले 
दहा दिसांचा सोहळा 
दहा निमिष गमले ॥

का रे येतोस तू असा 

वेड लावतो जनाला 
जातो जलात विरून 
घोर लागतो जीवाला ॥

पत्री फुलांच्या गंधात 

दीप कापूर प्रकाशी 
माझे धुंदावते मन 
चित्त जडते रूपाशी ॥   

रोज वाद्यांची वर्दळ 

खणखणती आरती 
नाद समाधीत मग्न 
माझी इवलीशी भक्ती ॥

आता आताच होतास 

गेला मिळून जलात 
रिता पाहूनिया पाट
दुःख दाटते मनात ॥

जरी असशी मंदिरी 

भेट तिथेही घडते 
जाशी येऊनिया घरी 
नाते अनोखे जडते ॥

भाव बंधांतून तया

सख्य अरुपाशी होते 
दिव्य दुःखाच्या स्पर्शाने 
ज्योत आतली पेटते ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

|| श्री गणेश ||












गणेश

 आदीमायेच्या लेकरा
रूप कुंजर सुंदरा
मुळारंभ श्री ओंकारा
माझे नमन स्वीकारा

चौदा विद्येचा तू स्वामी
नित्य चित्त सत्यगामी
शुद्ध भक्तीची तू भूमी
सदा संत भक्तकामी

गण नायक गणेशा
पुण्य पावक परेशा
सदा रक्षसी सुरेशा 
विघ्न नाशक विरेशा

देवा विशाल उदरा
नित्य कृपेच्या सागरा
सत्व जीवनात भरा
दूर दवडा अंधारा

रूपा वंदितो सतत
गुणा रहातो स्मरत
आता उजळो मनात
तुझ्या कृपेची पहाट

कृष्णपिंगाक्ष कृपाळा
विघ्ननाशक विशाळा
देई भक्तीचा जिव्हाळा
सदा ठेवी चरणाला

देवे आश्रय दिधला 
घोर संकटी धावला
जन्म ऋणाइत झाला
सुख विक्रांत पातला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

ओंकार तू







निराकारातून उमटला            
करुणामय आकार तू            
मिती जन्मदाता प्रश्न           
विश्वसंकल्पा आधार तू
महास्फोटाआधी दाटली
अनाकलनीय उर्जा तू
नेणिवेचा अथांग सागर
नि जाणीवेचा गर्भ तू
ज्ञानाची सीमा मानूनही
चक्रावणारा अनंत तू  
विज्ञानाची घुसळण इवली
सदा सर्वदा अस्पर्श तू
थकली बुद्धी ठकला विचार
इतुका अगणित अपार तू
माझ्या मनी सजविलेला
ज्ञानेशाचा ओंकार तू

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...