मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

बाप्पा निघता



बाप्पा निघता
********

बाप्पा निघता गावाला 

डोळे पाण्याने भरले 
दहा दिसांचा सोहळा 
दहा निमिष गमले ॥

का रे येतोस तू असा 

वेड लावतो जनाला 
जातो जलात विरून 
घोर लागतो जीवाला ॥

पत्री फुलांच्या गंधात 

दीप कापूर प्रकाशी 
माझे धुंदावते मन 
चित्त जडते रूपाशी ॥   

रोज वाद्यांची वर्दळ 

खणखणती आरती 
नाद समाधीत मग्न 
माझी इवलीशी भक्ती ॥

आता आताच होतास 

गेला मिळून जलात 
रिता पाहूनिया पाट
दुःख दाटते मनात ॥

जरी असशी मंदिरी 

भेट तिथेही घडते 
जाशी येऊनिया घरी 
नाते अनोखे जडते ॥

भाव बंधांतून तया

सख्य अरुपाशी होते 
दिव्य दुःखाच्या स्पर्शाने 
ज्योत आतली पेटते ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...