शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

सांज आणि भय



सांज आणि भय
***********

मृदू पायाखाली वाळू
वर पाखरांचा थवा
देहा वेटाळून होती
धुंद सागराची हवा

लाटा येऊनिया होत्या
पुन्हा पायास स्पर्शत
पायाखालील वाळूस
जणू मजेने ओढत

सान सोनूले ते जीव
देहा शंखात ओढून
पाणलोटा सवे होते
गडगडत लोळत

कुठे भरले डबके
शांत ध्यानस्थ बसले
निळे आकाश थोरले
तया आकारी भिनले

धाव धावूनिया लाटा
मागे सरल्या रुसल्या
लाल रेषा क्षितिजाच्या
हळू जळी मिसळल्या

लखलखणारे पाणी
रक्त सुवर्ण किनारा
आत मिटलेले मन
थोडा जागृत कोपरा

सांज वेळ ती कातर
मग देहात भिनली
कानी गंभीर गर्जना
फक्त गाज ती उरली
**
कुणी आले तर आता
इथे यांच पाण्यातून
एक विचार उगाच
गेला मनाला शिवून

त्याच क्षणास वाटला
लाटा आकार वेगळा
भास म्हणून असाच
वेडा विचार हसला

तिच इवलाली भीती
झाली क्षणात सागर
वाटे घेरलेले जणू
काही नसून समोर

मागे वळलो लगेच
दिवा दूरचा पाहत
झोत वाऱ्यांचे जणू की
होते मागुती ओढत

पाय खोलवर होते
मग उगाच रुतत
वाट हरवून  गेली
प्राण आलेले कंठात

वाळू सरता सरता
जीव सुखावला थोडा
अरे सुटला सुटला
स्वर कानी  ये उडता

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...