गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

कवयित्री विनिता पाटील यांना श्रद्धांजली




कवयित्री विनिता पाटील यांना श्रद्धांजली
**********************

जीवन क्रूर असते
का मृत्यू ?
कळत नाही
रोज समोर दिसणारे
असंख्य मृत्यू  पाहूनही
प्रश्न सुटत नाही !

निर्व्याज मुलांसारखे
मृत्यू ओढून निजलेले
चेहरे पाहिले की
अस्तित्व थरारते
हवालदिल होते .

जीवनाने सळसळणारे झाड
पडताच उन्मळून
अहंकार जातो चूर चूर  होवुन .
अन परवशता घेते वेढून.

विनिता ...!

काव्य रसाने बहरून  आलेला
तुझा जीवन  वृक्ष
त्यावर सळसळणारे
प्रत्येक कवितेचे पान
शब्दाशब्दातून परावर्तीत होणारे
प्रतिभेचे किरण
अन त्याचा तो संपलेला प्रवास पाहून
सुन्न होऊन गेले मन

तू  होतीस
कवितेच्या समृद्धीवर
लौकिकाच्या लहरीवर
विराजमान झालेले
दिमाखदार काव्य सुमन ..
शब्दांच्या साम्राज्यात
आपले वतन प्रस्थापित केलेली सम्राज्ञी
वृत्त लय होते तुझ्यासमोर
अष्टोप्रहर मान झुकवून
पण
तू गेलीस अचानक
यत्किंचित व्हायरस चे आक्रमण
थोपवल्यावाचून

कधी कधी असे वाटते
जीवनातील दुःखांचे आक्रंदन
करते आमंत्रण
शब्दावाचून " त्याला "
आपला महा सखा म्हणवून
असेच काही तर
नसेल घडले तुझ्या बाबतीत
तुझ्या कवितेतील व्यथा
अन् तडफड पाहून

खरतर तू ज्या मनोभूमीवर होतीस
तिथे तुला खूप काही मिळायला हवे होते
पण अपेक्षा अन आस्वादकता
रसिक मनाला मिळालेले
वरदान आहे की शाप
हेच नाही उमजत

हे माझ्या काव्यजगतातील
मैत्रिणी
तुझ्या अश्या अचानक
चटका लावून जाण्याने
तुझ्या कवितेचे गडद ठसे
उमटले आहे माझ्या मनावर
हवे नको या पर्याया वाचून
म्हणून तू गेलीस तरीही
राहशील  माझ्या सोबत
तुझ्या शब्दातून डोकावत
तुझी विलक्षण कहाणी सांगत
दुःखाची सार्वकालीन चादर पांघरत
तुझ्या वेदनांवर

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरणार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...