अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

आधार

आधार
*****
दत्त जिवलग सोयरा धायरा 
झाला या पामरा पाठबळ .१

 त्याने मज धीर आला समरात
संसारी वाहत असताना .२

 घडे देणे घेणे लोक उपचार
 चाले व्यवहार तया कृपे .३

अन्यथा कसले मजलागी ज्ञान
न कळे वर्तन जगताचे .४

दत्त चालविता म्हणून चालतो 
जगती दिसतो संभावित .५

अन्यथा जगतो निरर्थ केवळ
जगण्याचा आळ वाहविता .६

ऐसा वृक्ष थोर केला उपकार
देऊन आधार  पामरा या . ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

करी पावन

करी रे पावन 
******"
करी रे पावन दत्ता माझे मन 
भक्तीत भिजून  जावू दे रे ॥

आणिक ते नाही मागणे मनात 
राही जीवनात भरूनिया ॥

नको नाव गाव नको धनमान 
अखंड चिंतन तुझे घडो ॥

अगा अत्रिसुता देई ध्यान दान
सगुण निर्गुण मर्जी तुझी  ॥

तव रूप नामी लाभावी उन्मनी
जगाचे सुटूनी खेळणी ही ॥

स्वीकारा स्वीकारा चित्ताची चाकरी
प्रभू गिरनारी योगीराजा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

स्वीकार

स्वीकार 
*******
करी रे स्वीकार माझा मायबापा
आगा दयारूपा माझे म्हणा 

नाही भोळी भक्ती नाही शक्ती मती 
परी उपरती खरी असे 

व्यर्थ माझे यत्न निरर्थ जीवन 
घेई रे ओढून कृपाकरा 

कळेना लायकी दत्ता माझी काय 
दिसेनात पाय का रे तुझे 

भाग्यविधाता तू लिही माझे माथा 
ठेवण्यास पदा योग्य करी

माझ्या स्मरणात रहा सर्वकाळ 
श्वास जपमाळ होऊनिया
 
विक्रांता पायीचा करी रज:कण 
भक्तीचा देऊन स्पर्श तुझ्या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

संसार

संसार
****
संसार सरेना भोगणे ठरेना 
जगणे पुरेना उपाधीला

 एक तुटताच नवे उभे शिर 
ऐसा कारभार वासनेचा 

तेच जगी ताट तेच जगी पोट 
येईना रे वीट जीवनाचा 

इंद्रिय कौतुके किती ही लाळावी
भजनी वाळावी वृत्ती किती

आगा दत्तात्रेया येऊनिया भान 
जाते विसरून पुन्हा पुन्हा 

दगडाची रेघ मार मनावर 
नाम तयावर कोर तुझे

विक्रांता करी गा चिरा पायरीचा
खांब वा दारीचा तुझ्या प्रभू

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

धिंडोरा

धिंडोरा
******
तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा   
दत्त दिगंबरा पानोपानी ॥

पाहिल्यावाचून  वर्णीतो रूपाला
गातसे कीर्तीला जागोजागी ॥

तुझिया कृपेचा देतो भरवसा 
पल्लवीत आशा करूनिया ॥

भरल्यावाचून माझी रिती झोळी 
करतो दिवाळी साजिरी मी ॥

मागे बहुतांची फळली रे भक्ती 
तया दत्त प्रीती फळा आली ॥

त्याच कथा गोड जीवी ठसवितो 
दास म्हणवतो आशेने मी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

श्रीदत्त

श्री दत्त
******
सारे व्यापूनी जगत 
व्यक्त अव्यक्त रूपात
विश्व पालक श्रीदत्त ॥१

शून्य होऊन निर्वात
गिळे सारे आसमंत 
शिव संहारक श्रीदत्त ॥२

चंद्र सुर्य प्रकाशात
खेळ खेळतो अद्भूत
ऐसा लीलाधर श्रीदत्त ॥३

नच कळता कळत 
ठसा उमटे चित्तात 
ऐसा अगम्य श्रीदत्त ॥४

जरी रुप नामातित 
परी पाहता मनात 
दिसे भक्तास श्रीदत्त ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६

दत्त पहावा

दत्त 
****
दत्त भजावा मनात दत्त पहावा जनात 
दत्त धरावा उरात 
सर्वकाळ 
दत्त जाणावा सुरात दत्त ऐकावा स्वरात 
दत्त वाचावा पदात  
अनुपम्य 
दत्त पूजावा मूर्तीत दत्त भजावा कीर्तित 
दत्त स्मरावा प्रीतीत 
सदोदित 
दत्त प्रेमाचा पुतळा दत्त लावण्याची कळा 
दत्त शांतीचाच मळा 
मुमुक्षास
दत्त गातागाता मन गेले प्रेमाने भरून 
दत्त कविता होवून 
आले असे 
दत्त मायबाप माझे दत्तकृपा छत्र माझे
दत्त जीवीचे प्रीतीचे 
आत्मभान 
ऐसे जाणूनिया दत्त झाला उगा हा विक्रांत 
बसे एकटक दत्त  
न्याहाळत 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

जगण्याच्या वाटा

जगण्याच्या वाटा 
*************
जगण्याच्या माझ्या वाटा 
दत्ता याव्या तुझ्या पथा 

वाहिलेला भार आता 
उतरावा तुझे हाता 

काय काय पोतडीत 
आलो मी रे साठवित

ज्ञान अहंकार मोठा 
देह जन्म वर्ण ताठा

मोडूनिया पाठ गेली 
पाऊले ही भार झाली 

तुझ्याकडे ती येणारी  
चाल आता मंद झाली

आता नको मोकलूस 
दूर दूर ढकलुस 

देई आता दृढ भाव
दावी चैतन्याचा गाव


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

कृपेची घागर

कृपेची घागर
***
कृपेची घागर ओत डोक्यावर 
जावा मनोमळ वाहूनिया  ॥१

घेई रे कृपाळा तुझा तू करून 
शुचित्व देऊन दगडा या  ॥२

जगत हे व्यर्थ मनी समजलो
तव पदी आलो दत्तात्रेया ॥ ३

चुकला विचार बाटला आचार 
करी रे स्वीकार प्रक्षाळून ॥  ४

माय तू स्नेहाळ प्रेमाची केवळ 
चुकल्या सांभाळ लेकरा या ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

बंध

बंध
***
मी नच कुणाचा जरी जाणतो रे 
तरी वाहतो रे बंध उरी    ॥

मित्र सखे प्रिय जपे नाती गोती 
जमे सभोवती गर्दी बहु ॥

वाहतो कर्मात उणा व्यवहारी 
जाणे पाने सारी शिशिराची ॥

कुणा उगा सोडू कुणा बळे धरू 
कुणा प्रीती करू सारे तुची ॥

तूच दिले दत्ता सारे प्रियजन 
अन वैरावीण ठेवियले ॥

ठेवियले तैसा राहीन मी दत्ता 
सदोदित चित्ता  परी रहा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

करुणा

करुणा
*******
 करुणा दत्ताची वचने प्रेमाची 
रत्ने शब्दांची मनी येती ॥
दत्तकृपेचा हा भरा ये सागर 
लाटा लाटा वर उसळती ॥
तोच लिहविता कर्ता करविता 
चालवे विक्रांता सर्वकाळ ॥
लिहिता लिहिता सुखाचा लहरी 
उठे मनावरी पुन्हा पुन्हा ॥
कधीतरी पण देवा शब्दाविण 
हृदयी येऊन भेटी द्या हो ॥
कळल्यावाचून मागतो मागणे 
तुज जे करणे तेच कर ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

सार्थ करी दत्ता

सार्थ करी दत्ता
************
विश्वाचे कारण तुच दयाघन 
आहे मी जाणून दत्तात्रेया 

परी तव कारणे केवळ जगणे
मीपण सरणे घडेचिना 

अशी माया ओढी मज जगजेठी 
अवघी तोकडी शक्ती पडे 

अगा अवघड संसार दुस्तर 
सांगे वारंवार  जगत हे

परी तुझी माया असे तुझी छाया 
तिला सारावया  कृपा तुझी

देवाच्या भक्तांची लाज देवालागी 
येऊनिया वेगी तारी आता

विक्रांत जीवनी वाहे अहेतूक 
येऊन कौतुक दावी देवा 

सार्थ करी दत्ता तुझे देवपण 
मजला देऊन आलिंगन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

हट्ट

हट्ट 
***
हाच हट्ट माझा  पुरा करी देवा 
यावे भक्तीभावा फळ माझ्या 

जाणतो कोरडा तूप तेलाविन 
आलो मी घेऊन नैवेद्य हा 

फुले बाजाराची कुठल्या काळाची 
बोटे व्यापाराची लागलेली 

धूप गंधाकडे नच लक्ष काही 
डोळ्यानी मी पाही तुज फक्त

तुजला स्मरता प्रेमात रंगता 
जाहलो चुकता उपचार 

नको अन्य काही मज तुजविण
हृदयी येऊन रहा फक्त

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १९ जुलै, २०२६

लालायीत

लालायित
******
तुझिया कृपेला झालो लालायीत 
म्हणून दारात उभा राही 

तुझिया प्रीतीत जाहलो आशिक 
होऊन बटिक दारी आलो

तुझिया नावाचा जाहलो व्यसनी 
म्हणून अंगणी ठाण दिले 

तुझिया प्रीतीने गेलो रे भाळून 
मन हे माळून दिले तुला 

तुझिया रूपाचे जाहले मोहन 
पाहिल्या वाचून जीव जडे 

अगा दयाघना कृपेच्या सागरा 
विक्रांत पामरा देई थारा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १५ जुलै, २०२६

वाट (नर्मदा काठावरील कविता)

वाट (नर्मदा काठावरील कविता)
*******
देही सजलेली वाट मळलेली 
उधळून माती नभी दाटलेली 

तीच तीच वाट जरी पायाखाली 
हर दिन नव्या स्पर्शी भिजलेली 

कधी अचानक पायाखाली काटे 
कधी हळुवार दव ओले दाटे 

घडे जिवलग भेटी रोज इथे 
रोज अलगुज प्रेम सुरावते 

इथे कुणी कुणा आहे बांधलेले 
आकाश धरेला आहे टेकलेले 

तृप्तीत सुखाच्या जीव घे उखाणे 
अन ओठावर रोज येते गाणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १४ जुलै, २०२६

उधारी

उधारी
*****
ठेवू नको देवा कुणाची उधारी 
माझ्या उरावरी येथे आता ॥ १

फिटू दे रे कर्ज माझे हे सव्याज 
नको देवा लाज आणू मज ॥२

कुणाच्या धनाचे कुणाच्या मनाचे 
ऋणानुबंधाचे माप नको ॥३

असो मोहमयी असू दे लाघवी 
कारणे आघवी येरझारा ॥४

द्वेष इर्षा वैर राहिली चुकून 
टाक रे पुसून अंश नको ॥५

मग मी दयाळा होत निरंजन 
जावा मिसळून तुझ्या तेजी ॥६

फिटो सारी देणे दे दिवाळखोरी 
विक्रांता भिकारी सुखे कर ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ११ जुलै, २०२६

सर


सर
****
कधी ओघळेल प्रभू प्रेम सर 
मनी झरझर तृषार्थ या  ॥

कधी ओलावेल मृतिका चित्तीची 
रुजेल भक्तीची बी बियाणे ॥

कधी विरूढेल ज्ञानाची पालवी 
भक्तीत लाघवी नटलेली ॥

कधी हे फळेल आत्मज्ञान उरी 
कृतार्थ कुसरी सजेल मी ॥

कधी मी पाहीन तुझे प्रेम सुख 
सुखराशी हाक ऐक माझी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ७ जुलै, २०२६

कृपा (नर्मदाकाठ च्या कविता )


कृपा (नर्मदाकाठ च्या कविता )
*******
माई तुझी कृपा अनंत अपार 
चाले पायावर देह माझा ॥
अगा हे चालणे असे तुझे देणे 
अन्य न मागणे मज काही ॥
चालती हे जन किती भराभर 
पाय करकर वाजवत ॥
तयांचे चालणे रोजचे जगणे 
सहज कापणे अंतर ते ॥
देह हा दुर्बळ वेदनांचे घर 
नेलेस तू पार कृपा तुझी ॥
याहून गं मोठा नसे चमत्कार 
वाहिलास भार सवे माझा ॥
अशक्य ते शक्य केलेस तु माय 
जाणतो मी भाग्य माझे इथे ॥
विक्रांत पुण्याचा जाहला प्रवाह 
विसावाला देह तीरी तुझ्या ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २२ जून, २०२६

कृपा तुझी


कृपा तुझी
******
ज्ञानदेवी वृत्ती 
झाली तदाकार 
जगाचा विसर पडोनिया 

आनंद सागरी 
आनंदाची लाट 
होवून परत जावे जैसे 

चालो आता खेळ 
जन्म मरणाचा
भाव भक्ती साचा अबाधित 

अगा माझे माय 
सदा ऐसे करी 
तुझिया पदरी निजो वृत्ती 
 
सुखाचे आभाळी 
सुखाचा अंकुर
झाला तरुवर कृपा तुझी

विक्रांत हे बीज 
आडवाटेवरी 
गेले खोलवरी जीवनाच्या 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज स्मरण

श्री. नृसिंहसरस्वती स्वामी महाराज स्मरण
(गुरुप्रतिपदा)

भक्त कल्पद्रुमा नरसिंह देवा 
आनंदाचा ठेवा भक्तास तू ॥१

इह परलोकी करुनी संतुष्ट 
सांभाळशी भक्त आले जे ते ॥२

कुणी पीडा झाले ऋणी अडकले
आपदी पडले संसाराच्या ॥३

देऊनी आधार सकाम भक्तीचा
चरित्र ग्रंथाचा  सांभाळले ॥४

कोणी मोक्षास्तव जाहले व्याकुळ 
पहाया प्रेमळ गुरुमुर्ती ॥५

तया तूच देवा दावलीस वाट 
दिले हृदयात स्थान स्थिर ॥६

सदैव निर्मळ भक्तीला विकला 
अंकित जाहला  निज भक्ता ॥७

विक्रांत तुझिया दारीचा सेवक 
निश्चित निशंक सर्वकाळ ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

द्वेष

द्वेष  **** मुळात माणसे द्वेष का करतात? द्वेष  करणे ही मनाची  माणसाची गरज आहे का? हा माणसाच्या मनाचा  अविभाज्य भाग आहे का? द्वेष...