ज्ञानेश्वरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ज्ञानेश्वरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ जुलै, २०२५

ज्ञानदेवी .

ज्ञानदेवी
*******
शब्द सोनियाचे अर्थ मोतीयाचे 
भाव अमृताचे काठोकाठ ॥१

स्वप्न भाविकांचे गीत साधकांचे 
गुज योगियांचे अद्भुत हे ॥२

सूर भिजलेले अक्षर मवाळ 
हरपला जाळ अंतरीचा ॥३

वाहे अविरत गंगौघ निर्मळ 
हरपला मळ चित्तातला ॥४

यारे सखायांनो सुख घ्या झेलून 
नाही रे याहून गोड काही ॥५

मज ज्ञानदेवी - हून अन्य पाही 
अगा प्रिय नाही ग्रंथ जगी ॥६

विक्रांता कृपेचा लाभुनिया कण 
कृतार्थ जीवन जाहले रे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ५ मे, २०२५

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी 
*****
आनंदाची वाट आनंदे भरली 
कृपा ओघळली अंतरात ॥१

ज्ञानदेवी माझ्या जीवाचा विसावा 
पातलो मी गावा आनंदाच्या ॥२

अर्थातला अर्थ उघडे मनात 
चांदणे स्पर्शात कळो आले ॥३

मिरवावे सदा तया त्या शब्दात 
जगावे चित्रात रेखाटल्या ॥४

इतुकीच इच्छा उमटे चित्तात 
निजावे पानात शब्द होत ॥५

विक्रांत हरखे  सुखात तरंगे 
भान झाले उगे  भावर्थात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

ज्ञानेश्वरी ११:३२४

ज्ञानेश्वरी ११:३२४

म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु ।
आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥ 
ज्ञानेश्वरी ११:३२४
*************
मागे सरू जाता नावडे संसार 
व्यर्थ नि असार जाणवतो ॥१

अडविते चित्त करे प्रतिकार
केर घरभर तैसा गमे ॥२

आणिक पुढती तू ही तो कळेना 
हाती गवसेना काही केल्या ॥३

अनंत अगाध नाही ज्यास पार
इंद्रीय गोचर नाही कदा ॥४

अशा संकटात पडलो मी घोर 
सुटून आधार मानलेले ॥५

बावरले मन गांगरले चित्त 
स्वरूपात दत्त केव्हा होशी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

कृपेची अक्षरे

कृपेची अक्षरे
**********
कृपेची अक्षरे मनी ओघळली 
सुखानंद झाली वृत्ती सारी ॥१

काय ते कळले मनात शिरले 
हृदयी जिरले ठाव नाही ॥२

विचारील कुणी सांग रे म्हणुनी 
नये ठरवूनी बोलता ते ॥३

सुखावतो वृक्ष झेलूनी पर्जन्य 
मृदा होते धन्य भिजुनिया ॥४

तैसे काही झाले मन चिंब ओले 
ज्ञानदेवी ल्याले कणकण ॥५

तयाच्या शब्दात जन्म सारा जावा 
पांगुळ मी व्हावा कडेवरी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ३० जून, २०२४

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी
*******
शब्दा शब्दातून ओघळते कृपा 
ज्ञानदेव रूपा कान पाही ॥१
कैवल्याचे शब्द शब्दची कैवल्य 
होतो मनोलय ऐकतांना ॥२
उरते स्पंदन एकतारी मन 
सुखे कणकण आंदोलीत ॥३
 शब्दांचे लावण्य अद्भुत अपार 
ज्ञाना अंतपार लागतो ना ॥४
किती किती वाणू ग्रंथ ज्ञानदेवी 
अनावर होई वाचा माझी ॥५
मराठी होऊन जो न ग्रंथ वाचे 
फाटक्या भाग्याचे दरिद्री ते ॥६
विक्रांता भेटला ग्रंथ महामेरू 
कृपेचा सागरू ज्ञानदेव ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...