ज्ञानदेवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ज्ञानदेवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ जुलै, २०२५

ज्ञानदेवी .

ज्ञानदेवी
*******
शब्द सोनियाचे अर्थ मोतीयाचे 
भाव अमृताचे काठोकाठ ॥१

स्वप्न भाविकांचे गीत साधकांचे 
गुज योगियांचे अद्भुत हे ॥२

सूर भिजलेले अक्षर मवाळ 
हरपला जाळ अंतरीचा ॥३

वाहे अविरत गंगौघ निर्मळ 
हरपला मळ चित्तातला ॥४

यारे सखायांनो सुख घ्या झेलून 
नाही रे याहून गोड काही ॥५

मज ज्ञानदेवी - हून अन्य पाही 
अगा प्रिय नाही ग्रंथ जगी ॥६

विक्रांता कृपेचा लाभुनिया कण 
कृतार्थ जीवन जाहले रे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ५ मे, २०२५

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी 
*****
आनंदाची वाट आनंदे भरली 
कृपा ओघळली अंतरात ॥१

ज्ञानदेवी माझ्या जीवाचा विसावा 
पातलो मी गावा आनंदाच्या ॥२

अर्थातला अर्थ उघडे मनात 
चांदणे स्पर्शात कळो आले ॥३

मिरवावे सदा तया त्या शब्दात 
जगावे चित्रात रेखाटल्या ॥४

इतुकीच इच्छा उमटे चित्तात 
निजावे पानात शब्द होत ॥५

विक्रांत हरखे  सुखात तरंगे 
भान झाले उगे  भावर्थात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, ३० जून, २०२४

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी
*******
शब्दा शब्दातून ओघळते कृपा 
ज्ञानदेव रूपा कान पाही ॥१
कैवल्याचे शब्द शब्दची कैवल्य 
होतो मनोलय ऐकतांना ॥२
उरते स्पंदन एकतारी मन 
सुखे कणकण आंदोलीत ॥३
 शब्दांचे लावण्य अद्भुत अपार 
ज्ञाना अंतपार लागतो ना ॥४
किती किती वाणू ग्रंथ ज्ञानदेवी 
अनावर होई वाचा माझी ॥५
मराठी होऊन जो न ग्रंथ वाचे 
फाटक्या भाग्याचे दरिद्री ते ॥६
विक्रांता भेटला ग्रंथ महामेरू 
कृपेचा सागरू ज्ञानदेव ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...