कविते बद्दल . लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविते बद्दल . लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

कविता सौरभ




कविता सौरभ
********

कविता सौरभ 
जयास कळला
कागद पुरला 
नाही त्याला 

शब्द धावती 
थकल्या वाचुनी
एकामागूनी
एक असे

येती कल्पना 
नभात फिरुनी
उपमा घेऊनी 
नवनव्या

आणिक मात्रा
वृत्त घोटली
नाहीत लागली 
पांघराया

श्रोता तयास   
जरी न भेटला
शब्द न थांबला 
रुजणारा

कृपा नशिबी  
जया लाभली
धन्य जाहली 
कविजन

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

शब्द
















शब्द
****


कुठली तरी एक कल्पना
कुठला तरी एक विचार
प्रकट होतो डोक्यात
उमलतो हृदयात
एक स्फुल्लिंग होत

शब्द जणू  असतात
वाट पाहत
अन पडतात
येऊन धडाधड
जणू समिधा होत

ज्ञानदेव नामदेव तुकाराम
समर्थ एकनाथ चोखोबा मुक्ताई
असे मायबाप उभे असतात
पाठीमागे
घेऊन आपली शब्दसंपत्ती
इतकी की
माझे दोन्ही हात अपुरे पडतात

पाडगावकर विंदा इंदिरा संत
शांताजी आरती प्रभू कुसुमाग्रज
वैद्य सुर्वे ढसाळ आणि बापट
आणि किती एक
परममित्र होत
दाखवतात मला वाट
उघडतात नवनवीन गुपित
कवितेच्या जगातील
शब्दांच्या विभ्रमाची
भावनांच्या प्रकटीकरणाची

खरंच या कवितेच्या जगात
खूप श्रीमंत आहे मी
असे क्वचित कुणी असतात
हे ही जाणून आहे मी

इयत्ता चौथीत लिहलेल्या
पहिल्या कवितेपासून
पन्नाशी उलटूनही तरीही
वाहणारा हा शब्दांचा प्रवाह
हि आकाशगंगा
मला टाकते भारावून
स्तिमित करून

भेटणारा प्रत्येक नवीन शब्द
वाटतो एक नवे नक्षत्र
अन मग मी त्याचा वेध घेत
पाहतो त्यास कुतुहलाने
राहतो निरखीत आनंदाने

हे वेड मला मिळालेय
वारसा म्हणून
माझ्या वाडवडिलांकडून
मुक्तेश्वरापासून
माझ्या छोट्या इशानपर्यंत
आलेले उतरून
म्हणूनच शब्द हेच माझं विश्व ,
वंश धर्म अन् जात आहे
हे मी सांगू शकतो अगदी ठासून


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १८ एप्रिल, २०१८

थकले गाणे




थकले गाणे

माझे थकले रे गाणे
घुमघुमूनी मनात
चंद्र बहर सरला
काल सजला शब्दात ।।

दूर क्षितिजा पर्यंत
धूळ फुफाट्याचे थर
ओल हिरवी कोवळी
स्वप्न गमते उधार ।।

अश्या भाकड जन्माचे
हवे कशाला नगारे
दुमदुमतात घोष
कान ऐकती बहिरे ।।

कुण्या कृपाळ मेघाचे 
घर डोंगरात दूर
झरा कुठला लपला
मौन समाधीत चुर ।।

ठेच मरणाची भीती
पाय तरीही चालती
ओल सरल्या थैलीचे
काठ ओठी बिलगती ।।

किती मातीने गिळले
किती हवेत उडाले
देशोदेशीचे महाल
किती सजले मोडले ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १८ मार्च, २०१७

माझी कविता







माझी कविता 

तू कविता होतीस माझी 
आताही तूच ते गीत आहे
छंद भरल्या शब्दात माझ्या 
प्राण उजळून गात आहे 

हे भेटणे तर एक बहाणा 
तू कधीचीच अंतरात आहे
किती युगे झाली तुटून
आठव सुंगधी वाहत आहे 

ओढ जीवाला होती तेव्हा 
तीच आज उसळत आहे 
येशील तू न येशील ओठात
मूर्ती तुझी मनमंदिरात आहे

अर्थहीन आयुष्याची जरी
पोकळी जीवनात आहे 
दिसतेस तू क्षितिजावरती
वाटते सुखाची बात आहे 

जगलो जरी तुझ्याच साठी
अजून लालसा मनात आहे
तुझी अबोल भिडस्त भाषा 
लाख शब्दांची बरसात आहे ।

श्रीमह्नमंगले शारदे वाग्देवते 
तव कृपा उज्वल पहाट आहे 
अंधारल्या जीवनाचा माझा 
हा किती सुंदर शेवट आहे 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

कवित्व






शब्द सुखाचे खुळे उमाळे
जगलो धुंद गात्री भिनले
स्वप्न पाहिले बहरून आले
कधी पेटले धडधड ज्वाले
शब्द अंतरी सखे जाहले
जाग मिटेस्तो साथ राहिले
शब्द कोवळे नाजूक ओले
जीव जडले  कधी भेटले
शब्द ताठर अवघडलेले
कधी सांडले नको असले।
तरीही त्यांनी काही दिधले
कणखरपण जीवन ल्याले  |
किती तयांचा ऋणी असे मी
तया वाचून काही नसे मी

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
Kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

काव्य चौर्य रसिकास




रसिक एक भेटला
अन मजसी वदला
रे तुझ्या कवितेतील
भाव मजला भावला

साऱ्याच कविता तुझ्या 
करतो मी फोरवर्ड
येतेय वाहवा मग
मजला बघ उदंड

वाटला आनंद थोडा
दु:ख हि अन दाटले
कविराज मनातले
खुट्ट बरेच जाहले

थोडेतरी श्रेय मला
नको काय मिळायला
काय जाते याचे असे
कविता या चोरायाला

तोच मनी एकू आली
वाणी एका वानियाची
शब्दश्रीचा  स्वामी महा
गाथा सांगे जीवनाची

जावू देरे तूच नाही
एकटा शिकार असा
नाव जावो शब्द राहो
सोडू नको तुझा वसा

लिहिणारा असे कोण
वाचणारा आणि कोण
ज्यास जे हवे तयास 
मिळणार त्याचे दान 

माझे तुझे काही नाही
कोण किती उरला रे
वाहू देत साचलेले
मुक्त सांग कोण झाले

कर्ज असे कुणाचे  हे 
भार शिरावर दिला
देणारा तो कुणी अन
घेणारा हि ठरविला

तया शब्दे शांत जालो
चीड व्यथा निवळली
घेणाऱ्या घे हवे ते रे
इवली तव ओंजळी

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे

kavitesathikavita.blogspot.in 

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...